भरतेश वैभव : जैन महाकवी रत्नाकरवर्णी (सोहावे शतक) याने १५६७ च्या सुमारास रचलेले प्रख्यात कन्नड महाकाव्य. कन्नड साहित्याच्या इतिहासात रत्नाकरवर्णी या कवीचे एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. जैन ⇨ महाकवी पंप आणि ⇨ रन्न, वीरशैव कवी ⇨ हरिहर, ब्राम्हण कवी ⇨कुमारध्यास या पंथीय महाकवींइतकीच श्रेष्ठ काव्यप्रतिभा लाभलेला रत्नाकरवर्णी हा एक आहे. ‘जैन काशी’ म्हणून प्रख्यात असलेल्या मृदबिद्रि (जि. द. कॅनरा) येथे एका क्षत्रिय कुटुंबात त्याचा जन्म झाला. साधारणतः १५५७ ते १५७० या कालावधीत त्याने आपल्या बहुतेक वाङमयीन कृती रचिल्या. रत्नाकरवर्णी, रत्नाकरसिद्ध, रत्नाकरअण्णा या तीन नावांनी त्याने आपल्या रचना पूर्ण केल्या आहेत. भरतेश वैभव, त्रिलोकशतक (सु. १५५७), अपराजितेश्वर शतक, रत्नाकराधीश्वर शतक आणि अण्णन पदगळु या त्याच्या विशेष प्रसिद्ध रचना होत.
भरतेश वैभव ही त्याची एक महान कलाकृती. या काव्यात रत्नाकरवर्णीने भरत-चक्रवर्ती (भरतेश वा भरतेश्वर) याच्या उदात्त जीवनाचे चित्रण केले आहे. भरतेश वैभवची निर्मिती होण्यापूर्वी भरत-चक्रवर्तीचे चरित्र स्वतंत्रपणे कोणीही लिहिलेले नव्हते तथापि संस्कृत व कन्नड भाषेतील ऋषभदेवाच्या चरित्रामध्ये मात्र ‘भरत-बाहुबली’ कथेत त्रोटक स्वरूपात भरत-चक्रवर्तींचे जीवन चित्रित होते. रत्नाकरवर्णीच्या या काव्याचे वैशिष्ट हे की भरत-चक्रवर्तींलाच त्याने या काव्याचा नायक केले आहे. त्याचे भव्योदात्त जीवन आणि त्याचे सात्त्विक व्यक्तिमत्व उलगडून दाखविणाऱ्या अनेक बारीक-सारीक घटना प्रसंगांचा तपशील सांगणारा रत्नाकरवर्णी हाच पहिला कवी होय. जैन संप्रदायातील भरत-चक्रवर्तीच्या पारंपारिक चरित्रचित्रणात फारसा फरक न करताही रत्नाकरवर्णीने अतिशय काव्यात्म आणि अर्थगर्भ असे हे चरित्र लिहिले आहे. तीन भागांत व ऐंशी संधीत विभागलेल्या ९,९०७ पद्यांचे हे काव्य त्याने १५६७ मध्ये अवघ्या नऊ महिन्यांत लिहून पूर्ण केले आहे.
ऋषभदेवाची मूळ कथा जिनसेनाचार्यांच्या पूर्व पुराणात येते. रत्नाकरवर्णीने मात्र या पारंपारिक कथेत बदल करून पूर्णतः आत्मनिष्ठ रचना केली आहे. भरत-बाहुबली यांच्या युद्धास सुरूवात होण्यापूर्वीचा कथाभाग पारंपारिक कथेपेक्षा काहीसा वेगळा, भव्य आणि विस्तृत असला तरी गाभा मात्रा पारंपारिकच आहे. युद्धप्रसंगाचे चित्रण परंपरेपेक्षा वेगळे व वैशिष्टयपूर्ण स्वरूपाचे आहे. रत्नाकरवर्णीच्या कथेत भरत व बाहुबली दोघेही युद्धास सज्ज होऊन समोरासमोर उभे राहतात आणि अचानक भरताच्या मनाला युद्घाची निरर्थकता जाणवते. रत्नाकरवर्णीच्या या कथेत भरताचे चित्रण एकदम उदात्त बनते. अजिंक्यत्व आणि अहंकार यांचा लवलेशही भरतामध्ये नाही. एखाद्या राजयोग्याप्रमाणे तो आपल्या भावाशी वर्तन करतो. पारंपारिक कथेत भरताचे व्यक्तिमत्व काहीसे काळवंडलेले होते, आपल्या कथेचा नायक असा काळवंडलेला असता कामा नये आणि पारंपारिक कथेचा संदर्भ सोडणेही योग्य नाही, असे रत्नाकरवर्णीला वाटले असावे. म्हणून त्याने अतिशय कौशल्याने बाहूबलीचे भव्यत्व कायम राखूनही भरताच्या व्यक्तिमत्वात उदात्तत्त्व ओतले आहे.
रत्नाकरवर्णी आपल्या कथेचा प्रारंभ भरताच्या असामान्य गुणांच्या वर्णानाने करतो. श्रोत्यांना उद्देशून तो म्हणतो ‘अगणित राज्यसुखांचा उपभोग घेऊनही, जगाच्या प्रशंसेस व प्रेमास पात्र ठरलेल्या व जिनयोगी बनून क्षणार्धात कर्मक्षय करून मोक्षप्राप्ती करुन घेतलेल्या भरत-चक्रवर्तीच्या वैभवी जीवनाची कथा ऐका!’ भरत-चक्रवर्तीचे राजवैभव व योगवैभव जगास दाखविणे हा आपल्या कथेचा उद्देश असल्याचे तो सांगतो.
‘भोगविजय’ हा भरतेश वैभव काव्याचा पहिला भाग. या भागाच्या प्रारंभी कवीने एखाद्या राजर्षिप्रमाणे भरत-चक्रवर्तीचे वर्णन केले आहे. स्वतःला ‘शृंगार हंसराज’ म्हणवून घेणाऱ्या रत्नाकरवर्णीचा हा ‘भोगविजय’ शृंगाररसाने ओथंबलेला आहे. भरतेशाचे संसारी जीवन अतिशय व्यापक असल्याचे व्यापक असल्याचे सांगताना त्याला शहाण्णव हजार राण्या असूनही त्याने आपल्या सर्व राण्यांचे सारखेच प्रेम संपादन केले होते, असे तो सांगतो. त्यातील शृंगार मात्र कुठेही खालच्या पातळीवर येत नाही. त्याच्या शृंगार व हास्यवर्णनात एक प्रकारचे पावित्र्य आणि मांगल्य असल्याचे जाणवते. पतिपत्निंचे आदर्श प्रेम कोणत्या प्रकारचे असावे, हेच भरत-चक्रवर्तीच्या कौंटुंबिक जीवनचित्रणातून कवीने दाखविले आहे. भरतेशाच्या अगधि प्रेमाच्या सामर्थ्याचे सूचक वर्णन करून रत्नाकरवर्णीने त्याग व भोग यांतील रहस्य उकलून दाखविले आहे. भरतेश व त्याची मेव्हणी मकरंदा यांच्या संवादात रत्नाकरवर्णीने जे चातुर्य दाखविले आहे त्यातून त्यांची विदग्धता, मानवी स्वभावाची अचूक पारख, त्याचे कल्पनासामर्थ्य, अकृत्रिम भाषाप्रभुत्व, सौंदर्यलालसा इ. गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात.
रत्नाकरवर्णीचा हा भरतेश अनासक्त कर्मयोगी, स्थितप्रज्ञ, अंतिम सत्य जाणणारा, योग आणि भोग यांचा समन्वय साधणारा, प्रणय सुखाचा आस्वाद घेऊन क्षणार्धात त्यापासून संपूर्णता अलिप्त होणारा आहे. कवी म्हणतो ‘भोगात पूर्ण मग्न होऊनही क्षणात त्याचा त्याग करून योगावस्थेत तन्मय झाल्यानंतर, क्षणापूर्वीच्या वासना विसरण्याचे सामर्थ्य भरताला लाभले आहे. अंगावरील एक वस्त्र उतरून दुसरे वस्त्र जेवढया सहजतेने परिधान करावे तेवढ्या सहजतेने आपल्या मनातील क्षणापूर्वीची भावना काढून टाकून त्या ठिकाणी नवीन भावनेची प्रतिष्ठापना तो करतो’.
भरतेश हा जिनेश्वर म्हणजे तीर्थंकर नव्हे तो सिद्धपुरूष आहे. त्यामुळे तीर्थंकरांप्रमाणे त्याची पंचकल्याणपूजा बांधता येत नाही. तथापि कवीला भरतेश हा तीर्थंकरांच्या योग्यतेचा आहे हे दाखवायचे आहे. त्यासाठी कवीने भोगविजय, दिगविजय, योगविजय, अर्ककीर्तीविजय आणि मोक्षविजय ह्या पाच विजयांचा समावेश भरतेशाच्या जीवनकथेत करून कवीने आपले वैशिष्टय जसे दाखविले आहे तसेच भरतेशाचे व्यक्तिमत्वही उंचावले आहे. म्हणूनच भरतेश कथेतील या पाच विजयांत भोगजीवन, त्यागजीवन आणि योग यांचा त्रिवेणी संगम साधला आहे, असे कन्नड महाकवी द. रा. बेंद्र म्हणतात.
रत्नाकरवर्णीचे वर्णनसामर्थ्य अमर्याद आहे. तथापि सांप्रदायिक कवीहून तो पूर्णतया वेगळाही आहे. जेवढे योग्य, औचित्यपूर्ण आहे, तेवढ्याचेच वर्णन मी करणार आहे, असे सांगून अध्यात्म हे माझ्या कथेचे प्रयोजन असल्यामुळे अष्टादश वर्णनाचे बंधन मी मानीत नाही, असे तो म्हणतो. भरतेश वैभव हे काव्य सुखद वर्णानाने ओतप्रोत भरून गेले आहे. याच्या जोडीला स्त्रीसौंदर्य, वाद्य, गीत, नृत्य, नाटक, शृंगार यांचे अप्रतिम वर्णन त्याच्या या काव्यात आढळते. त्याच्या काव्याची भाषा ही सर्वसामान्यांची भाषा आहे आणि रचना सहज आणि सोपी आहे. त्याच्या या काव्यातील लय आणि गेयता कौतुकास्पद आहे. ‘सांगत्य’ (मराठीतील ओवीसारखी रचना) या छंदाचे सौंदर्य त्याने त्यात पराकोटीला नेले आहे. दोड्डय्या (चंद्रप्रभचरित), बाहुबली (नागकुमारचरित), ब्रह्मकवी (वज्रकुमारचरित), चंद्रम (गोमटेश्वरचरित), चिदानंद कवी (मुनिवंश अभ्युदय) इ. कवींनाही त्याच्या रचनेचे अनुकरण करण्याचा मोह झाला. कन्नडमधील पंप, हरिहर, कुमारव्यास या महाकवींच्या मालिकेतही रत्नाकरवर्णीचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
पहा: रत्नाकरवर्णि.
पाटील, एस्. पी. (क) मगदूम, डी. डी. (म.)