भद्रबाहु : (इ. स. पू. सु. ३२२). हे महावीरानंतरचे सहावे स्थविर होत. त्यांना शेवटचे श्रुतफेवली मानतात. त्यांच्या कालापर्यत श्वेतांबर आणि दिगंबर असे संप्रदाय सुरू झाले नव्हते व सर्वसाधारणपणे जैनसंध एकसंध होता. साहजिकच दोन्ही संप्रदाय त्यांना अतिशय मानतात. त्यांच्याविषयी परस्परविरूद्ध अशा परंपरा या दोन संप्रदायांत पाहावयास मिळतात. श्वेतांबरांच्या एका परंपरेचा सारांश असा आहेः वीरनिवार्णापासून सु. १६० वर्षानी पडलेल्या एका भयंकर दुष्काळानंतर जैन श्रमणसंघाने पाटलिपुत्र नगरीत एकत्रित होऊन श्रुतज्ञान व्यवस्थित करण्यास सुरूवात केली. एकमेकांस विचारून त्या श्रमणांनी अकरा अंगे व्यवस्थित केली. परंतु दिटिठवाय ह्या बाराव्या अंगाचा ज्ञाता तेथे विद्यमान नव्हता. तेव्हा संघाने अनेक साधूंसह स्थूलभद्रांना हे ज्ञान संपादन करण्यासाठी आचार्य भद्रबाहुंकडे पाठविले. त्या वेळी आचार्य भद्रबाहुंनी बारा वर्षाची विशेष प्रकारची योगमार्गसाधना केली होती व ते नेपाळात वास्तव करून राहिले होते. दिटिठवाय ग्रहण करण्यास स्थूलभद्रच तेवढे समर्थ ठरले. स्थूलभद्रांनी दहा ‘पूर्वा’ चे शिक्षण घेतल्यावर श्रुत-लब्धि-ऋद्धीचा प्रयोग केला. ही गोष्ट कळताच भद्रबाहुंनी पुढचे त्यांचे अध्यापन थांबविले. पुष्कळ आर्जवे केल्यावर त्यानी स्थूलभद्रांना राहिलेल्या चार ‘पूर्वा’चा सूत्रपाठ दिला पण तो दुसऱ्या कोणाला न शिकविण्याचे बंधन त्यांजवर त्यांनी लादले. परिणामतः या पाटलिपुत्र वाचनेच्या वेळी पहिली अकरा अंगे व बाराव्या अंगाची दहा ‘पूर्वे’ श्रमसंघाला व्यस्थित करता आली.

दिगंबराची परंपरा वेगळी आहे. मगध देशात बारा वर्षाचा भयंकर दुष्काळ पडणार म्हणून भद्रबाहुंच्या नेतृत्वाखाली अनेक जैन श्रमण दक्षिणेकडे निघून आले. मौर्य राजा चंद्रगुप्त गादीचा त्याग करून व भद्रबाहुंचे शिष्यत्व पतकरून त्यांजबरोबर दक्षिणेत आला.

श्रवणबेळगोळ येथे पोहोचल्यावर आपला अंत जवळ आल्याचे कळून भद्रबाहु तेथील कमी उंच टेकडीवर राहिले व संघातील अनुयायांना पुढे वाटचाल करण्याचा त्यांनी आदेश दिला. मात्र त्यांच्या सेवाशुश्रूषेसाठी त्यांचा शिष्य चंद्रगुप्त तेथेच राहिला. तेथे भद्रबाहु कालवश झाले. गुरूंच्या पावलांच्या ठशांची पूजा करीत चंद्रगुप्त श्रमण म्हणून काही वर्षे त्या ठिकाणी राहिला व संलेखनाव्रताच्या आचरणाने शेवटी निधन पावला. इकडे मगधात चतुर्दश पूर्वधर स्थूलभद्र संघप्रमुखपदी होते. दुष्काळाच्या खडतर परिस्थितीमुळे श्रुतज्ञान नष्ट होत चाललेले पाहून ते व्यवस्थित करण्यासाठी पाटलिपुत्र नगरीत ज्ञानी साधुंना त्यांनी एकत्र केले, अकरा अंगे व्यवस्थित केली व चौदा पूर्वाचे जे अंश ज्ञात होते ते एकत्र करून दिटिठवाय हे बारावे अंग रचले. दुष्काळ संपल्यावर भद्रबाहुंचे अनुयायी साधू मगधाला परतले असता त्यांना तेथील साधूंच्या आचारात भिन्नता आढळून आली. मगधातील साधू श्वेतवस्त्र धारण करीत असलेले त्यांनी पाहिले. ते स्वतः प्राचीन आचाराप्रमाणे नग्नच राहत होते. अखेरीस त्यांनी श्वेतांबर आगम पण मान्य केला नाही. अशा रीतीने हे दोन संप्रदाय उत्पन्न झाले.

भद्रबाहुंनी दशा, कप्प व वषहार या तीन छेदसूत्रांची रचना केली याविषयी सर्वाचे एकमत आहे. पञ्चकल्पचूर्णिकाराच्या मते आचारकल्पही (निशीथसूत्र) भद्रबाहुंनीच रचले. दशवैकालिकाप्रमाणे भद्रबाहुंचे हे ग्रंथ श्रमणांच्या आचाराबाबतीत प्रमाणभूत मानले जातात. उत्सर्ग-अपवादाची त्यांनी केलेली व्यवस्था हे या ग्रंथाचे वैशिष्टय होय. अपराधाबद्दलची दंडव्यवस्था आचार्यादी पदवीची योग्यता इ. बाबतींतील निर्णय सर्वप्रथम त्यांच्याच ग्रंथात आढळतात. संघाने हे प्रमाण मानले यावरून त्यांची थोरवी सिद्ध होते. श्रुतकेवली भद्रबाहू हेच निर्युक्तिकार होत, असे प्राचीनांचे मत आहे. ‘त्यांनी निर्युक्ति रचल्या होत्या ही गोष्ट खरी पण द्वितीय भद्रबाहूंनी (इ. स. चे सहावे शतक) उपलब्ध निर्युक्तींना सध्याचे स्वरूप दिले’ असे आधुनिकांचे मत आहे.

पहाः निज्जुति.

संदर्भः   1. Jacabi, H. Ed. Sthavlravalicarita or Plarlslstaparvan, Calcutta, 1932.

           2. मुनि पुण्यविजयजी, छेदसूत्रकार अने निर्युक्तिकार (श्री महावीर जैन विद्यालय, रजप्त महोत्सव स्मारक ग्रंथ), १९४१.

कुलकर्णी, वा. म.