जंबुद्दीवपन्नत्ति : (१) श्वेतांबर जैनांच्या आगम-ग्रंथांपैकी एक. श्वेतांबर जैनांच्या सर्व आगम-ग्रंथांप्रमाणे हाही अर्धमागधीत आहे. श्वेतांबर आगम-ग्रंथवर्गीकरणानुसार सहावा उपांग-ग्रंथ म्हणून हा ओळखला जातो. ह्या ग्रंथात एकूण १७६ सूत्रे असून ती ७ वक्षस्कारांत विभागलेली आहेत. ह्यात जैनमतानुसार केलेले भूगोलवर्णन आढळते. ह्या वर्णनातील बराचसा भाग काल्पनिक-पौराणिक स्वरूपाचा आहे. भारतवर्षाविषयी लिहिताना चक्रवर्ती भरत व त्याचा दिग्विजय ह्यांचे विस्तृत वर्णन केले आहे. ह्या ग्रंथावर मलयगिरी, शांतिचंद्र इत्यादींनी टीका लिहिल्या. मलयगिरीची टीका उपलब्ध नाही. 

कुलकर्णी, वा. म.

(२) दिगंबर जैन ग्रंथकार पद्मनंदी (अकरावे शतक) ह्याने जैन शौरसेनीत लिहिलेला ग्रंथ. हाही भूगोलविषयक आहे. वीरनंदी ⟶ बलनंदी ⟶ पद्मनंदी अशी आपली गुरुपरंपरा ह्या ग्रंथाच्या कर्त्याने दिलेली आहे. तो स्वतःला गुणगणकलित, त्रिदंडरहित, त्रिशल्यपरिशुद्ध इ. म्हणवून घेतो. ह्या ग्रंथाची रचना पारियत्त (पारियात्र) देशांतर्गत बारानगरमध्ये झाली. हे बारानगर म्हणजे राजस्थानातील पूर्वीच्या कोटा संस्थानात असलेला ‘बारा’ नावाचा कसबा असावा. महावीराच्या उपदेशाधारे गणधरांनी रचिलेल्या श्रुतांगांपैकी दिटि्‌ठवाय  (दृष्टीवाद) ह्या बाराव्या श्रुतांगातील परिकर्मनामक विभागात विश्वस्थितिविषयक सूरपन्नत्ति, चंदपन्नत्ति, जंबुद्दीवपन्नत्ति  इ. ग्रंथ होते, असे दिगंबर जैनांची परंपरा मानते. पद्मनंदीने आपल्या गुरुपरंपरेतून आत्मसात केलेले श्रुतांगांचे ज्ञान, तसेच मूलाचार, ⇨ तिलोयपण्णत्ति, बृहत्क्षेत्रसमास, नेमिचंद्रकृत त्रिलोकसार  इ. ग्रंथ ह्यांच्या आधारे आपला ग्रंथ रचिला. 

ह्या ग्रंथाचे १३ उद्देश किंवा अध्याय असून त्यात एकूण २,४२९ गाथा आहेत. ह्यातील भूगोलवर्णनही पौराणिक स्वरूपाचेच आहे. सूरपन्नत्ति, चंदपन्नत्ति, जंबुद्दीवपन्नत्ति  ह्या श्वेतांबरांच्या उपांग-ग्रंथांतील अनेक गाथा ह्या ग्रंथात आढळतात. महावीरानंतर होऊन गेलेल्या आचार्यांची परंपराही ह्या ग्रंथात दिलेली आहे. 

तगारे, ग. वा.