देवर्द्धिगणि : (इ.स.चे पाचवे शतक). विद्वान जैन आचार्य. ‘देवर्द्धिगणी क्षमाश्रमण’ ह्या नावाने ते प्रसिद्ध आहेत. वर्धमान महावीराच्या निर्याणानंतर दुष्काळ, ज्ञानी साधूंचे निधन ह्यांसारख्या कारणांमुळे जैन धर्मग्रंथांची मौखिक परंपरा खंडित झाली आणि त्यांना सुव्यवस्थित रूप देण्याची आवश्यकता तीव्रतेने जाणवू लागली. त्या दृष्टीने कालानुक्रमे पाटलिपुत्र, मथुरा व वलभी येथे जैनांच्या परिषदा भरविण्यात आल्या. स्थूलभद्र आणि आर्यस्कंदिल ह्यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे पाटलिपुत्र आणि मथुरा येथे परिषदा झाल्या. वलभी येथे झालेल्या दोन परिषदांपैकी पहिली नागार्जुनांच्या आणि दुसरी दैवर्द्धिगणींच्या अध्यक्षतेखाली झाली. ह्या परिषदांना ‘वाचना’ असे म्हणतात. देवर्द्धिगणींच्या अध्यक्षतेखालील वलभीवाचना इ. स. ४५३ मध्ये किंवा ४६६ मध्ये झाली असावी, असे दिसते. देवर्द्धिगणींनी त्या वेळी हयात असलेल्या स्थविर साधूंना वलभीमध्ये एकत्र आणून आणि त्यांच्या साहाय्याने जैनांच्या आगमग्रंथांचे काळजीपूर्वक संकलन करून ते पुस्तकबद्ध केले ते करीत असताना अनेक पाठभेदांचा वा वाचनाभेदांचा समन्वय घडवून आणला. ‘जैनागमांचे पुस्तकारोहण’ ह्या नावाने ही घटना ओळखली जाते. तथापि जैन आगमग्रंथांच्या संदर्भात देवर्द्धिगणींनी केलेल्या कार्याबाबत एक वेगळे मतही मांडले जाते. हेमचंद्र सूरीने योगशास्त्रावरील आपल्या टीकेत असे म्हटले आहे, की आर्यस्कंदिल आणि नागार्जुन ह्यांनी जैन आगम ग्रंथबद्ध केले होते तथापि त्या दोघांचे पाठ एकमेकांशी पूर्णतः जुळेनात देवर्द्धिगणींनी ह्या पाठभेदांचा समन्वय करून आर्यस्कंदिलांच्या नेतृत्वाखाली झालेल्या माथुरीवाचनेच्या आधारे जैन आगमांचे सुव्यवस्थित संकलन करण्याचा प्रयत्न केला. नागार्जुनांच्या वाचनामधील पाठभेद नागार्जुनीय पाठभेद म्हणून त्यांनी नोंदवून घेतले. देवर्द्धिगणींनी संचलित केलेले ग्रंथ केवळ श्वेतांबर जैनच प्रमाण मानतात.

श्वेतांबर जैनांच्या नंदी  या चूलिकासूत्राचा कर्ता देववाचक आणि देवर्द्धिगणी एकच होत, असे काही विद्वानांचे मत आहे.

कुलकर्णी, वा. म.