रायपसेणिय : जैन आगमातील उपांगांपैकी क्रमाने दुसरे उपांग. ते अर्धमागधी भाषेत आहे. ‘राजप्रश्नीय’ हे त्याच्या अर्धमागधी नावाचे संस्कृत रूप बहुधा चूक असावे ह्या उपांग ग्रंथात मुळात राजा प्रसेनजिताची कथा असावी नंतर प्रसेनजिताऐवजी पएसी (प्रदेशी) राजाचे नाव घातले गेले असावे, असे काही विद्वानांचे मत आहे. स्थानांगसूत्रात (ठाणांग) ह्या ग्रंथाचे नाव रायप्पसेणइज्ज असे आले आहे, तर नंदीसूत्रात ते रायपसेणिय असे आढळते. मल्यगिरी ह्या टीकाकाराने रायपसेणिय हे नाव स्वीकारून राजाच्या प्रश्नासंबंधी विवरण करणारा ग्रंथ, असा त्याचा अर्थ केला आहे.

प्रदेशी राजा, सूर्याभदेव आणि दृढप्रतिज्ञ अशा वेगवेगळ्या नावांनी पुन्हा पुन्हा जन्मून एकच जीव संसारात कसा भ्रमण करतो आणि अखेरीस मोक्ष कसा मिळवतो, ह्याचे वर्णन ह्या ग्रंथात आले आहे.

२१७ सूत्रांच्या ह्या ग्रंथाचे दोन भाग आहेत. पहिल्यात सूर्याभदेवाच्या विमानाचे आणि वैभवाचे विस्तृत वर्णन आहे. सूर्याभदेव आपल्या परिवारासह महावीरांच्या दर्शनास जातो त्यांच्या समोर तो नृत्य व नाट्यप्रयोग करतो. सूर्याभदेवाच्या वैभवाने दिपून जाऊन गौतम महावीरांना अशा आशयाचे प्रश्न करतो,-‘देव म्हणून जन्माला येण्यापूर्वी सूर्याभदेव हा कोण होता? देवत्व व वैभव मिळविण्यासाठी त्याने काय केले?’

ह्या ग्रंथाचा दुसरा भाग गौतमाच्या ह्या पृच्छेचे उत्तर देण्यासाठी आहे. सूर्याभदेवाची पूर्वजन्मकथा त्यात विस्ताराने आली आहे. ती अशी : श्रावस्तीचा राजा प्रदेशी हा दुष्ट व दुर्वृत्त होता. त्याचा सारथी व मंत्री चित्र (चित्त) हा अत्यंत कार्यदक्ष, चतुर, मुत्सद्दी आणि धर्मशील वृत्तीचा होता. त्याने राजाची आणि पार्श्वनाथशिष्य केशी कुमारश्रवण ह्याची भेट युक्तीने घडवून आणली. ह्या भेटीत आत्म्याचे अस्तित्व व स्वरूप ह्यांसंबंधी खूपच चर्चा झाली. चर्चा संपताच राजाने स्वेच्छेने श्रावकधर्माचा स्वीकार केला. तो धर्माने वागू लागला पण संसाराकडे आणि राणीकडे त्याचे दुर्लक्ष झाले. राणीला त्याचा राग आल्यामुळे तिने विषप्रयोगाने राजास मारले. धर्माच्या व पुण्याच्या बळावर तो स्वर्गात सूर्याभदेव म्हणून जन्माला आला.

सूर्याभदेवाच्या पूर्वजन्माचा वृत्तांत ऐकल्यानंतर, त्या देवाचे भविष्यकालात काय होणार आहे, हे जाणून घेण्याची इच्छा गौतमास झाली आणि महावीरांनी त्याला सांगितले, की स्वर्गातून च्युत झाल्यानंतर सूर्याभदेव हा दृढप्रतिज्ञ ह्या नावाने पुन्हा पृथ्वीवर जन्मेल, धर्माने चालेल आणि श्रमणधर्म स्वीकारून मोक्ष मिळवील.

हे उपांग श्वेतांबर जैनांच्या आगमाच्या प्राचीन भागात मोडणारे असे आहे. औपपातिकाच्या (उववाइय) मानाने ह्याचे वाङ्मयीन मूल्य निश्चितच अधिक आहे. महावीरांच्या दर्शनासाठी सूर्याभदेवाच्या होणाऱ्या आगमनाचे पौराणिक पद्धतीने केलेले वर्णन लांबलचक आणि काहीसे नीरस झालेले असले, तरी प्रदेशी राजा व केशी कुमारश्रवण ह्या दोघांत आत्म्यासंबंधी झालेला संवाद चित्ताकर्षक आहे. आत्मा हा शरीराहून भिन्न आहे, असे केशीचे मत, तर आत्म्याला शरीराहून वेगळे अस्तित्व नाही, हे आपण प्रयोगांनी सिद्ध केल्याची खात्री राजा बाळगून असतो. बौद्धांच्या दीघनिकायात आलेल्या पायासिसुत्तातील संवादाचे ह्या संवादाशी आश्चर्यकारक साम्य आढळून येते. वेदिका, सोपान, प्रतिष्ठान, स्तंभ, सूचिका, प्रेक्षागृह, नाटकीय अभिनय आदींचे ह्या ग्रंथात आलेले वर्णन स्थापत्य, संगीत आणि नाट्यकला ह्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण होय.

मलयगिरीच्या टीकेसह हा ग्रंथ १९२५ साली प्रसिद्ध झाला.

कुलकर्णी, वा. म.