निसीह : श्वेतांबर जैनांच्या सहा छेदसूत्रांपैकी क्रमाने आणि महत्त्वाच्या दृष्टीने पहिले. अर्धमागधी भाषेत त्याची रचना झालेली आहे. जैन साधुसाध्वींच्या हातून आचारनियमांचा भंग झाला असता त्यांना कोणते प्रायश्चित्त द्यावे वा शासन करावे, ह्याचे प्रतिपादन छेदसूत्रांत आढळते. गुन्हा करणाऱ्या साधूच्या वा साध्वीच्या ज्येष्ठतेला शिक्षा म्हणून छेद देणे, ही कल्पना ह्या सूत्रांना छेदसूत्रे म्हणण्यामागे असावी. श्वेतांबर जैनांचा पहिला अंगग्रंथ ⇨ आयारंग (आचारांग) ह्याच्या द्वितीय श्रुतस्कंधाची निसीह ही एके काळी पाचवी चूला (परिशिष्ट) होती व तिचे नाव ‘आयारपकप्प’ (आचारप्रकल्प) असे होते. तथापि पुढे ही चूला आयारंगपासून वेगळी करून तिला स्वतंत्र छेदसूत्राचे स्थान देण्यात आले.

‘निशीथ’ हे ‘निसीह’ ह्या शब्दाचे संस्कृत रूप. त्याच्या अर्थाबद्दलही अभ्यासकांत मतभेद आहेत. उदा., निशीथ म्हणजे मध्यरात्र. मध्यरात्रीप्रमाणे जे अप्रकाशरूप, अप्रकाशनीय, रहस्यमय, गोपनीय असेल, ते निशीथ असा एक अर्थ. जे कशाचे तरी निसीदन किंवा निराकरण करते ते ‘निशीथ’, असा आणखी एक अर्थ सांगण्यात येतो. हे आचारप्रकल्पशास्त्र अष्टविधकर्ममलाचे निराकरण करते आणि त्यात सांगितलेली प्रायश्चित्ते आचरणशुद्धी घडवून आणू शकतात, असे ह्या अर्थाच्या समार्थनार्थ म्हटले जाते.

ह्या छेदसूत्राचा कर्ता कोण, हा प्रश्नही अजून अनिर्णितच आहे. निशीथ चूर्णिकारांच्या मते हे सूत्र गणधरकृत आहे. आचारांगनिर्युक्तीवर टीका लिहिणाऱ्या शीलांकाच्या मते हे सूत्र चतुर्दशपूर्वधर (१४ पूर्वग्रंथांचे ज्ञान असणाऱ्या) स्थविराने रचिले. पंचकल्पभाष्य चूर्णिकाराच्या मते ही रचना चतुर्दशपूर्वी (१४ पूर्वग्रंथांचे ज्ञान असणाऱ्या) भद्रबाहूची आहे. निशीथ चूर्णीच्या अंती दिलेल्या प्रशस्तीप्रमाणे विशाखाचार्याने हे सूत्र लिहिले. कल्याण विजयगणीच्या मते आर्यरक्षिताने हे सूत्र रचिले. ह्या सूत्राची रचना वीरनिर्वाणानंतर १५० ते १७५ वर्षे ह्या कालावधीत झाली असावी, ह्याबद्दल मात्र दुमत नाही.

निसीहाचे एकूण २० उद्देश असून सूत्रे सु. १,५०० आहेत. हे छेदसूत्र गोपनीय मानले गेले आहे. दीक्षा घेतल्यापासून कमीत कमी तीन वर्षे झाल्याखेरीज त्याच्या वाचन-अध्ययनाचा अधिकार कोणास दिला जात नाही. ज्याला हे सूत्र अवगत नाही किंवा जो ते विसरला, त्याला कधीही आचार्यपद दिले जात नाही. निसीहची तुलना बौद्धांच्या ⇨ पातिमोक्ख ह्या ग्रंथाशी केली जाते. ह्या ग्रंथात बौद्ध भिक्षुभिक्षुणींच्या हातून घडणाऱ्या विविध दोषांची प्रायश्चित्ते सांगितली आहेत. कर्तव्यविचार मोलाचा असला, तरी काही विशिष्ट परिस्थितीत अकर्तव्य हेच कर्तव्य ठरू शकते, ह्याची जाण ठेवून निसीहात अपवादविधींचे विवेचनही आहे. तथापि ही विशिष्ट परिस्थिती नेमकेपणाने ओळखणे सामान्य साधकाला शक्य नसल्यामुळे असे अपवाद सर्वांना सांगणे योग्य होणार नाही, अशा भूमिकेतून हे अपवाद देखील गोपनीय ठरले आहेत. निसीहातील सूत्रांवर त्या व सूत्रांवरील निर्युक्तीवर संघदास गणीचे भाष्य आहे. ह्या भाष्यावर जिनदास गणी महत्तराने विशेषचूर्णी –विसेसनिसीहचुण्णी –रचिली आहे.

कुलकर्णी, वा. म.