अर्धमागधी भाषा : संस्कृत व अर्वाचीन भारतीय आर्यभाषा यांच्यामधला दुवा ‘प्राकृत’ या नावाने ओळखला जातो आणि म्हणून या भाषांना ‘मध्यभारतीय-आर्यभाषा’ म्हणतात.

 

अर्धमागधी प्राकृत ही श्वेतांबर जैनांच्या धर्मग्रंथांची भाषा आहे. तिच्या नावाचा खुलासा दोन प्रकारे देता येतो : (१) ‘अर्ध मागध्याः इति अर्धमागधी’, म्हणजे जिच्यात मागधीची काही लक्षणे आहेत, सर्व नाहीत, ती किंवा (२) ‘अर्ध मगधस्य व्याप्य स्थिता’, म्हणजे जिने मगधाचा (पश्चिमेकडील) अर्धा भाग व्यापलेला आहे ती.

 

अर्धमागधीची ध्वनिपद्धती पुढीलप्रमाणे आहे:

स्वर 

व्यंजने 

ऱ्‍हस्व 

दीर्घ 

कंठ्य 

तालव्य 

मूर्धन्य 

दंत्य 

ओष्ठ्य 

अर्धस्वर 

द्रव 

ऊष्म 

महाप्राण 

अनुस्वार 

अ, इ, उ, ऍ, ओ

आ, ई, ऊ, ए, ओ

क, ख, ग, घ, ङ 

च, छ, ज, झ, ञ 

ट, ठ, ड, ढ, ण 

त, थ, द, ध, न 

प, फ, ब, भ, म 

य, व 

र, ल 

स 

ह 

संस्कृतशी तुलना केल्यास दिसून येईल, की या भाषेत ऋ, ॠ, लृ हे स्वर किंवा ऐ, औ हे संयुक्त स्वर नाहीत. ए व ओ हे स्वर ऱ्ह‍स्वही आढळतात. ऊष्म वर्णांपैकी फक्त स हाच तिच्यात आढळतो.

 

संस्कृत व अर्धमागधीची वर्णरचना बऱ्‍याच अंशी तीच असली,  तरी ज्या प्रकारे हे वर्ण या दोन भाषांत वापरले जातात त्यांत फार मोठा फरक आढळतो. काही वर्ण काही स्वरूपात आढळतच नाहीत उदा., स्वरमध्यस्थ क (संस्कृत : अशोक अर्धमागधी : असोग), तर संस्कृतमध्ये असणारी काही संयुक्त व्यंजने अर्धमागधीत आढळत नाहीत उदा., प्र, त्स, स्त इत्यादी (संस्कृत : प्रवचन, चिकित्सा, हस्त अर्धमागधी : पावयण, तिगिच्छा, हत्थ). कित्येकदा मात्र एखाद्या वर्णाचे एखाद्या परिस्थितीत अनियमितपणे असणे हे तो शब्द संस्कृतमधून उसना घेतल्याचे लक्षण आहे.

व्याकरणदृष्ट्या या दोन्ही भाषांतले महत्त्वाचे फरक पुढीलप्रमाणे : (१) अर्धमागधीत द्विवचन नाही. द्विवचनाबद्दल अनेकवचन वापरले जाते. (२) या भाषेत सहाच विभक्ती आहेत, मात्र संस्कृतप्रमाणे संबोधनही आहे. संस्कृतातील चर्तुर्थीशी मिळती विभक्ती नष्ट झाली असून तिची जागा षष्ठीने घेतली  आहे. (३) क्रियापदांच्या रूपांबाबत संस्कृतमध्ये आढळणारी विविधता व क्लिष्टता या भाषेत उरलेली नाही.

 

विभक्तिप्रत्ययांची कल्पना पुढील उदाहरणावरून येईल : 

ए. व. 

अ. व. 

प्रथमा 

द्वितीया 

तृतीया 

पंचमी  

षष्ठी 

सप्तमी  

संबोधन 

देवो, देवे

देवं

देवेण, देवेणं

देवा, देवाओ

देवस्स 

देवे, देवंसि, देवम्मि

देव 

देवा 

देवे, देवा

देवेहि, देवेहिं

देवेहिन्तो 

देवाण, देवाणं

देवेसु, देवेसुं

देवा 

 

क्रियापदांची कल्पना पुढील उदाहरणांवरून येईल : 

वर्तमान काळ ‘जाण’

प्र. पु. 

द्वि. पु. 

तृ. पु. 

ए. व. 

जाणामि 

जाणसि 

जाणइ 

अ. व. 

जाणामो 

जाणह 

जाणन्ति 

भविष्यकाळ ‘कर’ 

प्र. पु. 

द्वि. पु. 

तृ. पु. 

ए. व. 

करिस्सामि, करिस्सं

करिस्ससि 

करिस्सइ

अ. व. 

करिस्सामो 

करिस्सह 

करिस्सन्ति 

भूतकाळ ‘हस’

 प्र. द्वि. तृ. पु. 

ए. व. 

हसित्था

अ. व. 

हसिंसु

 

धातूंच्या वर्गांप्रमाणे प्रत्ययांमध्ये काही विशेष फरक होतात.

 

अर्धमागधीचा बराचसा शब्दसंग्रह संस्कृतोद्भव आहे. बाकीचे शब्द देशी म्हणजे आर्येतर भाषांतून आलेले आहेत.

 

संदर्भ : 1. Ghatage, A. M. Introduction to Ardhamagadhi, Kolhapur, 1941.

           2. Pischel, R. Grammatik der Prakrit-Sprachen, Strassburg, 1900.

 

कालेलकर, ना. गो.