आयारंग : (आचारांग). अर्धमागधीतील एक जैन अंगग्रंथ. महावीराचा सूत्ररूप उपदेश असलेल्या बारा अंगग्रंथांत व सर्व आगमग्रंथांमध्ये प्राचीन. साधूसाध्वींच्या आचारासंबंधी बहुमोल उपदेश त्यात असल्यामुळे त्यास जैन आगमग्रंथांत सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे. या ग्रंथांच्या दोन श्रुतस्कंधांपैकी (खंडांपैकी) पहिला श्रुतस्कंध इ. स. पू. तिसऱ्या शतकातील आहे. त्यात आठ अध्ययने (प्रकरणे) असून प्रत्येक अध्ययन पुन्हा उद्देशकांत विभागलेले आहे. पहिल्या श्रुतस्कंधात मुख्यतः पुढील विषय आहेत : प्राणिमात्राच्या हिंसेचा त्याग, लोकविजय, देहदमन, संयमसाधना, श्रमणधर्माचे कसोशीने पालन, चारित्र्य, तपाचे विविध प्रकार, शीतोष्णादींचा परीषह (सहन करण्यासंबंधी उपदेश) व महावीराची सुरुवातीची श्रमजीवनचर्या. ही चर्या आर्यावृत्तात असून महावीराच्या कठोर संयमसाधनेचे जिवंत चित्रण येथे पाहावयास मिळते. बौद्ध वाङ्मयात परिचित असलेली गद्यपद्यामिश्रित शैली पहिल्या श्रुतस्कंधात दिसून येते. हा श्रुतस्कंध प्राचीनतम असला, तरी शैलीतील वैचित्र्यामुळे एककालीन व एककर्तृक नव्हे, असा काही विद्वानांचा तर्क आहे.

दुसरा श्रुतस्कंध चार चूलांचा किंवा परिशिष्टांचा आहे. तो सोळा अध्ययनांत विभागला असून ही अध्ययने पुन्हा उद्देशकांत विभागली आहेत. याची प्रतिपादनपद्धती आणि शैली पाहता हा बराच उत्तरकालीन वाटतो. हा परिशिष्टात्मक असल्यामुळे स्वयंपूर्ण असा पहिला श्रुतस्कंध हाच मूळचा व खरा आचारांग ग्रंथ असावा. या चार परिशिष्टांत पुढील विषय आले आहेत : पिंडैषणा, शय्या, ईर्या (विहार), भाषा, वस्त्रैषणा, पात्रैषणा, अवग्रहविषयक नियम, स्थान, आसने, स्वाध्यायभूमी, मलमूत्रविसर्जनासंबंधीचे नियम, इष्ट वस्तुग्रहण व शुश्रूषा करून घेणे यांसंबंधीची उदासीनता, पाच महाव्रतांच्या सम्यक् आकलनासीठी वा आचरणासाठी नियम, दीक्षाग्रहणापर्यंतचे महावीराचे जीवन व मोक्ष. कल्पसूत्र रचताना भद्रबाहूने या श्रुतस्कंधातील तिसऱ्या चूलेमध्ये आलेल्या महावीराच्या जीवनचरित्राचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. यातील काही भाग किरकोळ फेरफारांसह त्याने कल्पसूत्रात समाविष्ट केला आहे. शेवटच्या परिशिष्टातील अखेरची बारा पद्ये बौद्ध थेर गाथांची आठवण करून देतात.

पहा : अर्धमागधी साहित्य.

कुलकर्णी, वा. म.