णायाधम्मकहाओ  :  श्वेतांबर जैनांच्या अंगग्रंथांपैकी क्रमाने सहावा ग्रंथ. हा अर्धमागधी भाषेत लिहिलेला आहे. नायाधम्मकहाओ  ह्या नावानेही हा ग्रंथ ओळखला जातो. णायाधम्मकहाओचे संस्कृत रूप ज्ञाताधर्मकता अथवा ज्ञातृधर्मकथा असे होते. ज्ञातृपुत्र भगवान महावीराच्या धर्मकथा अथवा त्याच्या धर्माशी संबद्ध अशा कथा, असा ह्या ग्रंथशीर्षकाचा एक अर्थ सांगितला जातो. त्याचा दुसरा अर्थ नायाधम्मकहाओमधील ‘नाय’ (उदाहरणे) ह्या शब्दाच्या आधारे सोदाहरण सांगितलेल्या धर्मकथा (धम्मकथा) असा दिला जातो.

ह्या ग्रंथाची विभागणी दोन श्रुतस्कंधांमध्ये करण्यात आलेली आहे. पहिल्यात एकूण १९ अध्ययने असून प्रत्येक अध्ययनात एक स्वतंत्र, संपूर्ण अशी बोधकथा देण्यात आलेली आहे. ह्या धर्मकथा श्वेतांबर जैनांच्या असल्या, तरी त्यांतून आलेला नीत्युपदेश सर्व धर्मीयांना आवाहक असाच आहे. दुसर्‍या श्रुतस्कंधात एकूण १० वर्ग असून प्रत्येक वर्ग काही अध्ययनांचा मिळून तयार झालेला आहे व एकूण अध्ययने २०६ आहेत. रचना, शैली आणि मांडणी ह्या दृष्टींनी पाहता, हा श्रुतस्कंध श्वेतांबर जैनांच्या उवासगदसाओ (उपासकदशा) आणि अणुत्तरोववाइयदसाओ (अनुतरौपपातिक) ह्या अनुक्रमे सातव्या व नवव्या अंग्रग्रंथाशी अधिक निकटचा आहे, असे मत विंटरनिट्ससारख्या विद्वानांनी व्यक्त केलेले आहे. ह्या दुसर्‍या श्रुतस्कंधाच्या पहिल्या वर्गातील पहिल्या अध्ययनात काली ह्या देवतेची कथा समग्रपणे दिलेली असून बाकीच्या सर्व कथा (एकूण २०५) त्यांतील स्थळांची आणि व्यक्तींची बदललेली नावे सोडून कालीच्या कथेप्रमाणेच समजाव्यात, असे म्हटले आहे. णायाधम्मकहाओवर अभयदेव सूरीने टीका लिहिली आहे.

कुलकर्णी, वा. म.