उत्तरज्झयण : श्वेतांबर जैनांच्या चार मूलसूत्रांपैकी पहिले. याचा काळ इ. स. पू. तिसरे वा दुसरे शतक असावा. उत्तरज्झयण मधील ‘उत्तर’   या पहिल्या पदाच्या अर्थाबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. काहींच्या मते उत्तर म्हणजे उत्तम, प्रमुख तर काहींच्या मते उत्तर म्हणजे पाठ्यक्रमात आचारांग सूत्रानंतर पठनात येणारी अध्ययने वा अध्याय. आणखी काहींच्या मते उत्तर म्हणजे प्रश्नाचे उत्तर. या अर्थाला अनुकूल अशी एक परंपरा आहे. अंतकाळ समीप आला असता महावीरांनी गौतमाकडून न विचारल्या गेलेल्या छत्तीस प्रश्नांची उत्तरे (व्याख्याने) दिली. ती व्याख्याने म्हणजेच छत्तीस अध्यायांचा हा आगमग्रंथ. 

हे मूलसूत्र मुख्यतः पद्यात आहे. ते एककर्तृक आणि एककालिक नाही, असे आधुनिक विद्वानांचे मत आहे. त्यातील काही अध्ययने बरीच प्राचीन असून काही उत्तरकालीन आहेत असे दिसते. प्राचीन अध्ययने ही सुभाषिते, संवाद, उपमा, दृष्टांत, कल्पितकथा, आख्याने, नैतिक उपदेश यांनी परिपूर्ण आहेत. विषयनिरूपण व शैली यांच्या दृष्टीने ती महाभारत, धम्मपद व सुत्तनिपात यांना फार जवळची आहेत. त्यांत वैराग्य, त्याग, शील, संयम यांचा प्रभावी उपदेश असून पाखंडी मतांचा ओझरता निर्देश आहे. यज्ञ-यागादी वैदिक कर्मकांड, चातुर्वर्ण्य व अस्पृश्यता यांचे आवेशपूर्ण खंडन आणि श्रमणधर्माचा जोरदार पुरस्कार त्यांत केला आहे. बाविसाव्या अध्ययनात आलेल्या राजीमतीच्या कथेतून शीलाचा व पातिव्रत्याचा उदात्त आदर्श दाखविला आहे. या कथेत रथनेमी, अरिष्टनेमी व श्रीकृष्ण यांचा समकालीन संबंध दाखविला असल्यामुळे, बाविसावे तीर्थंकर ऐतिहासिक व्यक्ती असावेत, असे काही संशोधक मानतात. तेविसाव्या अध्ययनातील पार्श्वनाथ व महावीर यांच्या दोन शिष्यांमधील संवाद जैन धर्माच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नंतर समाविष्ट केलेल्या अध्ययनांत समिती व गुप्ती, सामाचारी तपोमार्ग, कर्मप्रकृती, लेश्या, जीवाजीवांचे वर्गीकरण यांसारखे जैन सिद्धांत-विषय वर्णिले आहेत. 

श्रमणाची कर्तव्ये सांगणे, उपदेश व उदाहरण द्वारा श्रमणधर्माची प्रशंसा करणे, संघातील नवीन साधूंना आध्यात्मिक जीवनमार्गातील धोके दाखविणे व जैन सिद्धांताची  माहिती देणे हा ग्रंथाचा उद्देश दिसतो. या महत्त्वाच्या मूलसूत्रावर भद्रबाहूने ‘निज्जुत्ती’  व जिनदास महत्तराने ‘चुण्णी’ रचिली आहे. संस्कृतातही या मूलसूत्रावर शांतिसूरी व देवेंद्र यांच्या अनुक्रमे शिष्यहिता व सुखबोधा ह्या सुबोध टीका आहेत. धर्मकाव्य म्हणून हा आगमग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. 

कुलकर्णी, वा. म.