दसवेयालिय : श्वेतांबर जैनांच्या आगमग्रंथांत अंतर्भूत झालेल्या चार मूलसूत्रांपैकी क्रमाने तिसरे सूत्र दसवेयालिय (संस्कृत रूप दशवैकालिक) ह्या नावाने ओळखले जाते. त्यातील बहुतेक भाग पद्यात असून थोडासा गद्यात आहे. अर्धमागधी भाषेत ते लिहिलेले आहे. महावीरानंतरचा चौथा आचार्य शय्यंभव (सेज्जंभव) हा ह्या सूत्राचा कर्ता. आपला मनकनामक (ह्या नावाचा ‘मणग’असाही एक पर्याय आहे) मुलगा अल्पायुषी आहे, असे जाणून त्याला मृत्युपूर्वी साधुधर्माचे यथार्थ ज्ञान व्हावे ह्या हेतूने त्याने ह्या सूत्राची रचना इ. स. पू. सु. ३७९ मध्ये केली. दसवेथालियात दहा अध्ययने किंवा अध्याय आहेत. विकाली म्हणजे संध्यासमयी ह्या अध्ययनांचा अभ्यास केला जात असे, म्हणून हे सूत्र दसवेयालिय  किंवा ‘दशवैकालिक’ होय, असा ह्या सूत्रशीर्षकाचा एक अर्थ लावला जातो. दिवसाच्या कोणत्याही वेळी अभ्यासता येतील अशी उपदेशात्मक दहा व्याख्याने एकत्रित करून रचिलेले सूत्र, असाही एक अर्थ सांगितला जातो. दहा अध्ययनांखेरीज ह्या सूत्रात ‘रतिवाक्य’आणि ‘विविक्तचर्या’ ह्या दोन चूलिकाही समाविष्ट आहेत. तथापि ह्या शय्यंभवाने लिहिलेल्या नसाव्यात, असे मानले जाते. आत्मप्रवाद, कर्मप्रवाद, सत्यप्रवाद, प्रत्याख्यान  ह्या जैनांच्या पूर्वग्रंथांतील भाग उद्‌धृत करून हे मूलसूत्र उभे केले असल्याचा निर्वाळा भद्रबाहूच्या निर्युक्तीतून मिळतो. तथापि जैनांचे पूर्वग्रंथ लुप्तच झालेले असल्यामुळे शय्यंभव त्या ग्रंथांचा किती प्रमाणात ऋणी आहे, हे सांगणे कठीण आहे.

दसवेलियातील दहा अध्ययनांची नावे अशी : (१) दुमपुप्फिया, (२) सामण्णपूत्र्वग, (३) खुद्दियायारकहा, (४) छज्जीवनिया, (५) पिंडेसणा, (६) धम्मट्ठकहा, (७) वाक्कसुद्धि, (८) आयारपण्णिहि, (९) विणयसमाही आणि (१०) सभिक्खू.

दसवेलियात जैन धर्माची थोरवी, साधूचा आचार, शुद्ध भिक्षा कोणती, चंचल साधूच्या मनात साधुधर्माबद्दल गाढ प्रेम कसे निर्माण करावे, श्रामण्य कसे प्राप्त होते इ. विषय आले आहेत. साधूच्या आचारांचे नियम वर्णन करताना काही अध्ययनांत काव्यात्मक, सूत्रात्मक, सुभाषितप्रचुर, प्रसन्न आणि मनोहर शैली आढळते. तथापि गद्य भागाची व आचाराचे सूक्ष्म नियम विस्ताराने सांगणाऱ्या काही अध्ययनांची शैली फारच रूक्ष आणि नीरस झाली आहे. असे असले, तरी आदर्श साधुजीवनाचे संक्षेपाने वर्णन करणारे हा एक प्रकरण ग्रंथच म्हणता येईल, हे निश्चित.

भद्रबाहूने ह्या सूत्रावर निर्युक्ती लिहिलेली असून अगस्त्यसिंह आणि जिनदासगणी महत्तर ह्यांनी चूर्णी लिहिलेल्या आहेत. ह्या सूत्रावर टीका आणि वृत्तीही लिहिल्या गेल्या आहेत. जर्मन पंडित व्हाल्टर शूब्रिंग ह्याने ह्या सूत्राचे इंग्रजी व लॉयमन याने जर्मन भाषांतर केले आहे. ह्या सूत्राचे गुजराती व हिंदी अनुवादही प्रसिद्ध आहेत.

 

कुलकर्णी, वा. म.