भट्ट, विश्वनाथ मगनलाल : (२० मार्च १८९८- ?१९६८). प्रसिद्ध गुजराती साहित्यसमीक्षक, जन्म गुजरातमध्ये उमराला (जि. भावनगर) येथे. मुंबई विद्यापीठातून ते बी. ए. झाले (१९२०) नंतर त्यांनी काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे ते मुंबई येथील भारतीय विद्याभवनात काम करू लागले.
स्वच्छंदवादी प्रणालीतील ते समीक्षक असून सखोल सर्वंकष अभ्यास आणि मार्मिक विश्लेषण हे त्यांच्या समीक्षेचे होत. वीर नर्मद (१९३३) हे त्यांनी लिहीलेले नर्मदचे छोटेखानी जीवनचरित्र असुन ते गुजरातीत प्रमाणभूत मानले जाते. दलपत राम, मेघाणी, रमणलाल इ.समग्र वाड्मयाची त्यांनी मार्मिक समीक्षा केली आहे. त्यांच्या समीक्षेतील काहीसा विस्तार, पसरटपणा आणि अभिनिवेश हे दोष सोडल्यास विद्वत्ता, मार्मिक विश्लेषण आणि प्रमाणभूतता या गुणांमुळे गुजरातीत तिला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. चिकित्सक व प्रामाणिक समिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांचा समिक्षालेखनास ‘रणजिताम सुवर्ण चंद्रक’ देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. उत्तरायुष्यातील त्यांचा काही समीक्षा पूर्वग्रहामुळे झाकळलेली दिसते.
त्यांनी समीक्षापर व इतर सु. २२ ग्रंथ लिहिले. त्यांतील महत्त्वाचे काही ग्रंथ असेः समीक्षा-साहित्य समीक्षा (१९३७), विवेचन मुकुर (१९३९), निकषरेखा (१९४५), पूजा अने परिक्षा (१९६२), इत्यादी. चरित्र-वीर नर्मद (१९३३) संपादन-पारिभाषिक शब्दकोश (३ खंड,१९३०-३२) अनुवाद-टॉलस्टॉयच्या कृतीचे प्रेमनी दंभ (१९३१) व नवो अवतार (३ खंड, १९३२,३३,३४).
पेंडसे, सु. न.
“