भगवद्‌गीता : म्हणजे गीता, हा हिंदुधर्माचा सर्वमान्य स्वतःप्रमाणे ग्रंथ. गीता हा भगवद्‌गीता शब्दाचाच संक्षेप आहे. संस्कृतमध्ये गीता हे उपपद असलेल्या सु. दोनशे गीता सापडतात. उदा. शिवगीता, गुरुगीता, हंसगीता, रामगीता इत्यादी. महाभारतात ‘अनुगीता’ आहे. भगवद्‌गीतेची महती स्थापन झाल्यामुळे इतरांनी गीता हा शब्द उचलला अनेक ‘गीता’ रचल्या.’गै’ म्हणजे गाणे या मूळच्या संस्कृत धातूपासून ‘गीता’ ह्या स्त्रीलिंगी शब्द बनला आहे. साधारणपणे जातम्, भूतम्, गतम् या शब्दांप्रमाणे गीतम् असा नपुसकलिंगी शब्द बनतो. गीता असा स्त्रीलिंगी शब्द बनण्याचे कारण गीतेच्या अभ्यायसमाप्तिसूचक वाक्यात सापडते. उपनिषत् या स्त्रीलिंगी संस्कृत शब्दांचे बहुवचनी रुप ‘उपनषतत्सु’ या विशेष्याचे ‘श्रीमतभगवद्‌गीता’ हे विशेषण म्हणून त्या वाक्यात वापरले आहे. गीत म्हणजे गाइलेले. श्रीमतभगवंताने गाईलेल्या उपनिषदातील” असा अर्थ. ‘इति श्रीमदभगवद्‌गीतासु उपनिषत्सु ब्रह्यविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ……..अध्यायः’ असे ते समाप्तीसूचक वाक्य प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आले आहे. त्याचा अर्थ: श्रीमद् भगवद्‌गीता हे उपनिषद म्हणजेच ब्रह्यविद्या असून योगशास्त्रही आहे तोच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यातला संवाद होय. ब्रह्म हे अंतिम सत्य त्याच्या साक्षात्काराने मोक्ष मिळतो. योग म्हणजे मनासह सर्व इंद्रियांचा संयम आणि असा संयम करुन एकाग्र मनाने परब्रह्माशी एकरुप होणे. योग हे ब्रह्मप्रप्तीचे साधन म्हणून भगवद्‌गीतेत वर्णिले आहे ⇨ महाभारतातील भीष्मपर्वाचा भगवद्‌गीता हा भाग. भगवद्‌गीतेचे १८ अध्याय, ७॰॰ श्लोक आहेत.

वेदान्ताची उपनिषदे, भगवद्‌गीता आणि ⇨ ब्रह्मसूत्रे ही ⇨ प्रस्थानत्रयी मानली आहे. म्हणून केवलाव्दैतवादी शंकराचार्य आणि त्यांचे अनुयायी, विशिष्टाव्दैतवादी ⇨ रामानुजाचार्य, त्यांचे गुरु यामुनाचार्य आणि त्यांचे अनुयायी , द्वैतवादी ⇨ मध्वाचार्यं आणि त्यांचे अनुयायी यांची आणि इतर ⇨ वल्लभाचार्यं इ. आचार्यांची गीतेवर भाष्ये आणि टिका आहेत. भारताच्या मराठी इ. प्रचलित सर्व साहित्यिक भाषांमध्येही गीतेची भांषातरे, भाष्य वा टिका वा अनुवाद, त्या भाषांच्या गेल्या हजार-बाराशेच्या वर्षाच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत. गीतेच्या अगणित पोथ्या छापखाना येण्यापूर्वी लिहिल्या जात होत्या भगवद्‌गीतेची आज उपलब्ध असलेली सर्वात प्राचीन व अधिकृत प्रत म्हणजे ⇨ शंकराचार्यांचे गीताभाष्य ही होय. या भाष्यात गीतेचा पहिला अध्याय वगळून दुसऱ्या अध्यायाच्या अकराव्या श्लोकापासून अठराव्या अध्यायातील अखेरच्या श्लोकापर्यंत जवळजवळ शब्दश स्पष्टीकरण आलेले आहे.

भागवत धर्माचा भगवद्‌गीता हा मुख्य आधारभूत प्रमाणग्रंथ आहे केवळ ⇨ भागवत धर्माचाच नव्हे तर हिंदू धर्मातील सगळ्या धार्मिक संप्रदायाचा मान्य असलेला हा ग्रंथ आहे. ख्रिश्चनाचे बायबल व मुसलमांनाचे कुराण त्यांच्याप्रमाणे गीता हा हिंदूचा अत्यंत पवित्र धर्मग्रंथ म्हणून समजला जातो.

भारताच्या बाहेरही शेकडो वर्ष या ग्रंथांचे भक्त झाले आहेत. अरबी मुसाफिर ⇨ अल बीरूनी (९७३-१०४८) याला हा ग्रंथ फार पसंत पडला, लंङन येथे १७८५ साली विल्‌कीन्सन याने गीतेचे इंग्लिश भांषातर प्रसिद्ध केले. त्यामुळे युरोपमध्ये याची चांगली प्रसिद्धी होऊ लागली. ई. आर्नल्डने केलेले गीतेचे द सॉग सिलेस्टिअल हे भांषातररही प्रसिद्ध आहे. १८२३ साली ⇨ आउगुस्ट हिल्हेल्म फोन स्लेगेल (१७६७-१८४५) याने गीतेची परिशुद्ध आवृती लॅटिन भाषांतरासह १८२३ मध्ये प्रसिद्ध केली. हे भाषांतर जर्मन पंडित व्हिल्हेल्म फोन हंबोल्ट(१७६७-१८३५) याने वाचले आणि तो हर्षित झाला. तो म्हणाला महाभारतील भगवद्‌गीता हि घटना फार सुंदर आहे. आपणास माहीत असलेल्या साहित्यांच्या जगात बहुधा सर्वश्रेष्ठ अशी ही तत्त्वज्ञानात्मक कविता आहे, असे म्हणावे लागते. बर्लिन ॲकॅडेमीमध्ये त्याने या विषयावर विस्तृत असा शोधप्रबंध लिहिला व श्लेगेलच्या गीतांभाषातरावर विस्तृत समालोचना लिहिली. त्यानंतर आतापर्यत युरोपियन भाषामध्ये गितेचे पुनःपुन्हा भांषातरे होत राहिली.

[कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्ण व विषादग्रस्त अर्जुन : एक चित्र].

कौरवपांडवांच्या ऐन युध्दांच्या प्रसंगी भगवंतानी अर्जुनाला रणागणामध्ये दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा केला असताना दोंन्ही बाजूंची रणवाद्य गर्जू लागली तेव्हा हा उपदेश केला आहे. पिते-पिता-मह, गुरू, काका, मामा, भाऊ, पुत्र, पौत्र, सासरे आणि मित्र हे दोंन्ही पक्षात संग्रामार्थ सज्ज झालेले पाहून त्या भयंकर भावी संहाराचे चित्र त्यांच्या मनासमोर उभे राहिले आणि तो त्या दारूण विनाशाच्या भयाने गागंरला. त्यांच्या हृदयात करूणा उत्पन्न झाली. तो संहार डोळयाने पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा, असा विचार त्यांच्या अंतकरणात प्रवळ झाला. त्यांला असे दिसू लागले, की विजय मिळाला काय किंवा पराभव झाला काय, युद्ध संपल्यावर जगण्याची इच्छाच राहणार नाही. ज्याच्यांकरता जगायचे तेच नाशाला जाणार. एवढेच नव्हे, तर अगणित तरुण शूत्रांचा निपात झाल्यामुळे त्यांच्या स्त्रिया विधवा होवून अधर्म माजेल व त्या भ्रष्ट होतील, त्यामुळे वर्णसंकर होईल आणि सनातन कुलधर्म नष्ट होतील, त्याचा परिणाम पितरांना व विरांना नरकवास भोगावा लागेल, म्हणुन अर्जुन श्रीकृष्णाला या व्दिधा मनःस्थितीत म्हणाला की मी युद्ध करण्यास तयार नाही. या अर्जुनाच्या अवस्थेचे आणि त्या रणांगणाचे अत्यंत वेधक चित्र पहिल्या ‘अर्जुनविषादयोग’ या अध्यायात रेखाटले आहे. अशा संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक तत्व ज्ञानाच्या आधाराने भगवंतानी अखेरीस युद्धास प्रवृत्त केले आहे. या उपदेशाच्या प्रसंगीच अर्जुनाच्या प्रथम दृष्टोत्पत्तीस आले की श्रीकृष्ण हा साक्षात परमेश्वर आहे.

गीतेतील विस्तृत उपदेश साक्षात समरप्रसंगी करण्यात अवधी नसतो, म्हणून आधुनिक विचारवंतापैकी काहीच्या मते भगवद्‌गीता ही भारतामध्ये मुळात सद्यःस्वरुपात नसावी युद्ध हा तुझ्यासारख्या जन्मसिद्ध क्षत्रियाचा-विशेषत शूर व तेजस्वी क्षत्रियाचा-स्वधर्म आहे. म्हणून स्वधर्म हा भावी परिणामांचा विचार न करताच आचरला पाहिजे एवढेच तात्पर्य असलेला विचार अर्जुनाला भगवंतानी सागिंतला असावा.


इ.स.पू. पाचव्या-चौथ्या शतकाच्या सुमारास प्रचलित झालेल्या भागवत धर्माचे मुळात सेश्वर ⇨ सांख्य दर्शनावर आधारलेले हे वैष्णव उपनिषद असावे आणि त्यातच विस्तार सध्याची भगवद्‌गीता असावी, असे अनेक पश्चिमी संशोधकाचे मत आहे. इ.स.पू. दुसऱ्या शतकातील काही कोरीव लेख सापडले आहेत. त्यावरून असे दिसते की गांधार देशातील (अफगाणिस्तानातील) ग्रीक रहिवांशानी भागवत धर्माचा स्वीकार केला होता. भगवद्‌गीता मुळात छोटीच असली पाहिजे हे गृहित धरून जर्मन पंडित आ.र. गार्वे.(१८५७-१९२७) याने मूळची भगवद्‌गीता आणि त्यात नंतर भर पडलेली म्हणजे प्रक्षिप्त भगवद्‌गीता केवढी हे स्वतः प्रकाशित केलेल्या गीतेच्या पुस्तकात दाखवुन दिले, त्याच्या मते हा प्रक्षिप्त भाग म्हणजे वेन्दांत तत्वज्ञान आणि ब्राह्मणी वैदिकधर्म यासंबंधी वचने होत. प्रत्यक्ष ब्रह्मतत्वाचे व यज्ञसंस्थेचे जेथे आदराने विवरण केलेले आहे तो प्रक्षिप्त भाग होय, असे त्याचे आणि भारतीय साहित्याचा जर्मन इतिहासकार एम्‌. विंटरनिट्‌स (१८६३-१९३७) याचे मत आहे. अलीकडे पुणे येथील शिक्षणशास्त्रज्ञ ग.श्री खैर यांना मूळ गीतेचा शोध १९६७ हे पुस्तक लिहून गीतेचे तीन लेखक निरनिराळया वेळी झाले असावेत, असा अंदाज केला आहे. त्यातील पहिल्याने ब्राह्मप्राप्तीचे, दुसऱ्याने अव्यक्त अशा परम पुरूषाच्या प्राप्तीचे आणि तिसऱ्याने वासुदेव देवताच्या सगुण भक्तिचे ध्येय वाचकांपुढे मांडले, असे खैर म्हणतात.

परंतू आज जे गीतेचे समग्र स्वरूप आहे ते सर्व विचारात घेता, त्यातील विचारांचा ऐतिहासिक क्रम कोणता,मूळचा भाग कोणता व नंतरचा भाग कोणता या गोष्टी निसंशय असा निर्णय करणे दुरापास्त आहे. त्याचप्रमाणे गीतेचा उपक्रम आणि उपसंहार लक्षात घेता. गीतेत ज्ञानमूलक भक्तिप्रधान ⇨ कर्मयोगाचाच आदेश हा मुख्य आहे. हे गीतारहस्यकार ⇨ लो.टिळक (१८५६-१९२०) यांचे मत सरळ मान्य करावे लागते, हे जरी खरे असले, तरी काही ठिकाणी सांख्य योग किंवा ज्ञानयोगाचा, काही ठिकाणी विशेषत अखेरच्या अठराव्या अध्यायात भक्तियोगाचा अंतिम संदेश भगवंतानी दिला आहे. असे स्पष्ट दिसते. ज्ञानयोग, कर्मयोग व भक्तियोग यापैकी कोणताही योग हा प्रधान उद्दिष्ट मानले, तरी ज्ञानयोगाला किंवा स्थितप्रज्ञ दर्शनाला कर्मयोगाची आणि भक्तियोगाची जोड द्यावीच लागते. ज्ञानापासून आणि भक्तिपासून या तीन योगांपैकी कोणताही योग वेगळा करता येत नाही. अचल समाधी हा त्यांचा गाभा आहे. सुख दुःखाची द्वंद्वांच्या पलीकडची अनासक्त अवस्था हे या सर्व योगांचे शुद्ध अधिष्ठान आहे. या अधिष्ठानाचे परमशांती किंवा ब्रह्मनिर्वाण हे अंतिम स्वरुप आहे. प्राचीन काळापासून आतापर्यंत अनेक भाष्यकार झाले आहेत. शंकराचार्यपूर्व भाष्यकारांच्या मते ज्ञानकर्म समुच्चय, शंकराचार्यमते निष्काम कर्मजन्य चित्तशुद्धीने निष्पन्न होणारी संन्याससहित ज्ञाननिष्ठा, रामानुज, मध्व, ⇨ निंवार्क ⇨ ज्ञानेश्वर इ.आचार्यांच्या मते ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करीत साक्षात्काररुप झालेली भक्ति किंवा योगी ⇨ अरविंदाच्या मते कर्म, पातंजलयोग, ज्ञान व भक्ति याचा समुच्चय म्हणजे पुर्णयोग. यापैकी कोणते तरी एक गीतातात्पर्य आहे.

अर्जुनाच्या संमोहाचा किंवा संग्रमाचा निरास करण्याकरता आत्मतत्त्वाच्या विवारणापासून भगवंतानी प्रारंभ केला. भगवान म्हणतात ‘या युद्धात हत्या होणार आहे त्यात नाशवंत शरीरेच नष्ट होणार आहेत, आत्मा नव्हे. या शरीरातील आत्मा सनातन नित्य अविनाशी असाच आहे. म्हणून त्यांसबंध शोक करण्याची जरूर नाही, युद्ध हा क्षत्रियाचा स्वधर्म आहे. या युद्धात क्षत्रियानां मृत्यू आला, तर स्वर्गाचे द्वार त्यांच्याकरता उघडले असते. विजय झाला तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होते’ या दुसऱ्या अध्यायातील उपदेशामध्ये कृष्ण हा ऋषीसारखा उपदेश करतो, त्यानंतर तो स्वतःच परमेश्वर असून तो परमेश्वरच उपदेश करीत आहे, असे दिसते. फलाची अपेक्षा न धरता निष्काम बुद्धीने स्वधर्माने आचरण करावे या सिध्दांताचा धागा अथपासून इतिपर्यंत दिसतो, परंतू त्याबरोबरच वैराग्यमूलक नैष्कर्म्याचा उपदेशही वारंवार केलेला आढळतो. स्थिर बुद्धीचा अनिकेत म्हणजे गृहत्याग केलेला संन्यासीही आदर्श पूरुष म्हणून वर्णिलेला आहे. हा ⇨ ज्ञान मार्गी योगी होय. हा एकांतस्थळी बसतो, नासाग्र दृष्टी करुन सर्व इंद्रियांचा व मनाचा संयम करुन सुखदूखादी द्वंद्वाच्यापासून अलिप्त राहून ध्यानमग्न होतो. मातीचे ढेकूळ, धोंडा आणि सुवर्ण हे सगळे इंद्रियगोचर पदार्थ त्याला सारखेच ! त्याची समाधिस्थितीच त्याला ⇨ साक्षात्कारद्वारा निर्वाणपदाला नेऊन पोचवते. त्यांची सर्व पातके भस्म होतात. सर्व पापपुण्यांच्या पलीकडे तो जातो. परंतू या स्थितीत न पोहचलेले जे ध्यानयोगमार्गाचे अनुष्ठान करत असतात, आणि त्या उच्चतम स्थितीला पोहचण्याच्या आगोदरच मृत्यू पावतात, त्यांचे त्यानंतर काय होते ? त्यांची ही सगळी साधना वाया जाते काय ? असा प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला. त्यावर भगवंतानी उत्तर दिले. स्वतःचे जसे पूर्वकर्म असेल त्याचप्रमाणे म्हणजे कर्मानुरूप पुढील जन्म मनुष्यास प्राप्त होत असतो. [⟶ कर्मवाद]. या नियमानुसार योग साधना अर्धवट सोडून या जगातून गेलेला मनुष्य, पवित्र श्रीमंत कुलात अथवा योग्यांच्याच कुलात जन्मतो आणि मागील जन्माचा योगाभ्यास त्याला योगसाधनेकडे ओढतो, प्रवृत्त करतो व तो सिद्धावस्थेस पोहोचतो. [⟶ योग योग दर्शन].

अत्यंत पापी, दुराचारी मनुष्याचासुद्धा उद्धार होऊ शकतो, असे भगवंतानी आश्वासन दिले, त्याचा मार्ग ⇨ भक्तिमार्ग होय. परमेश्वराची अनन्य भक्ती केल्याचा योगाने पुण्यशील ब्राह्मण आणि भक्त राजर्षीच परमपदाला पोहचतात असे नाही, तर स्त्रिया, वैश्य व शुद्रसुद्धा भगवद्‌भक्ती करत असताना प्राणिमात्राबद्ल निर्वेर बुद्धी प्रेम व करूणा आणि ईश्वरशरणता म्हणजे ईश्वरार्पण बुद्धी स्थिरावली की परमेश्वर त्याचा उद्धार निश्चयाने करतो.

कर्म भक्तीशी जुळते, परंतू कर्माची पुर्ण वैराग्यनिष्ठ ज्ञानमार्गाशी तशी सुसंगती निश्चीत करणे कठीण आहे. भगवद्‌गीतेमध्ये अंतर्विरोधी विधाने पुष्कळ आहेत. भाष्यकार व टीकाकार त्यांच्यात सुसंगती स्थापन्याचा प्रयत्न करतात. एक अत्यंत स्पष्ट अंतर्विरोधी विधान असे ज्याला कर्मात अकर्म दिसते आणि अकर्मात कर्म दिसते तो माणसामधला (खरा) बुध्दिमान होय. तो योगी आणि सर्व कर्तव्ये पार पाडणारा होय (गीता ४-१८). याचा अर्थ शंकराचार्यानी उलगडून दाखवला आहे. ब्रह्मसाक्षात्कार ज्याला झाला आहे, त्याच्यां दृष्टीने कर्म हे केवळ भास,म्हणून ते अकर्म होय आणि ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला नाही अशा स्वस्थ बसलेल्या मनुष्याच्या ठिकाणी कर्म दिसतेच कारण कर्माची अहंकारादी बीजे त्या मनुष्याच्या ठिकाणी असतातच.

सर्व भाष्यकारांच्या मते संपूर्ण गीताशास्त्राचा निःश्रेयस पर्यवसायी सारभूत अर्थ सांगणारा आदेश असा.  

“मत्कर्मकृन्मत्परमो मदभक्तः संगवर्जितः ll

सर्वभूतेषु यःस मामेति पांडव ll (गीता ११.५५)

अर्थ : ” माझ्याकरता कर्मे करणारा, मीच ज्याचे अंतिम उदिष्ट आहे, माझा भक्त, आसत्किरहित, प्राणिमात्राबद्ल निर्वेर वृत्तीचा असा जो तो, हे पांडवा, माझ्यापाशी येतो”.

संदर्भ : 1. Dasgupta, surendra Nath A History of Indian philosopliy, vol. 2, Londan. 1952.

           2. Winteritz M.Indian Literature, vol.1 Calcutta, 1927.

           ३. टिळक, बाळ गंगाधर, श्रीमदभगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, पुणे, १९६३.

           ४. शंकराचार्य, श्रीमदभगवद्‌गीताभाष्यम्‌, आष्टेकर प्रत पुणे, १९१६.

जोशी, लक्ष्मणशास्त्री