भटके : उदरनिर्वाहाकरिता निवडलेल्या अगर वाट्यास आलेल्या व्यवसायानिमित्त अगर उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्य भटकत राहणारऱ्या लोकांना भटके म्हणतात. इंग्रजीत त्यांचा उल्लेख ‘नोमॅड्स’ असा करतात. नोमॅड हा शब्द ‘नोमी’ किंवा ‘नेमो’ (गुरे चारणे) या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. स्वतःचे कायम स्वरुपाचे घर किंवा शेतजमीन नाही परंतु गुरांचे कळप आहेत, असे लोक गुरांसाठी चराऊ कुरणांच्या शोधार्थ सतत भटकत असतात, अशा लोकांना उद्देशून नोमॅड हा शब्द वापरला जातो. हा शब्द किंवा संकल्पना फक्त जंगलात भटकणाऱ्या लोकांसाठीच वापरली जात नाही, तर एकाच ठिकाणी कायमचे वास्तव्य न करता सतत भटंकंती करणाऱ्या लोकांसाठीही ती वापरली जाते. खेचरे, गाढवे, तटटू, घोडे, उंट इत्यादींवर आपली मालमत्ता लादून स्वतःच्या इच्छेनुसार किंवा परिस्थितीच्या दडपणामुळे चांगली उपजीविका होऊ शकेल, अशा ठिकाणांच्या शोधात असे लोक सतत स्थलांतर करीत रहातात, डोंबारऱ्याचे खेळ, जादुचे खेळ, भविष्य कथन, किरकोळ व्यापार, कारागिरी, वैद्यकी इ. व्यवसाय ते करतात. सतत भटकणाऱ्या समूहांव्यतिरिक्त काही समूह हे अर्ध-भटके जीवन जगतात. अशा समूहांजवळ स्वतःचे घर किंवा थोडीफार शेतजमीन असते आणि शेतीचा हंगाम संपल्या नंतर जेथे उदरनिर्वाहाकरिता लागवडीला योग्य अशी जमीन उपलब्ध असेल, तेथे कुटुंबियांसह आणि सामानासह ते स्थलांतर करतात, हंगाम संपल्यानंतर ते आपल्या मूळ ठिकाणी येतात.
अमेरिका आणि युरोप खंडात असे भटके जीवन जगणाऱ्या जमातींना ⇨ जिप्सी म्हणतात. जिप्सी हा शब्द ईजिप्शियन ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे, असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. जिप्सी हे मूलतः भारतातून आले असावेत, असेही तज्ञांचे मत आहे. भारतातून दोन हजार वर्षांपूर्वी त्यांनी युरोप-अमेरिकेकडील देशांत स्थंलांतर केले, असे म्हटले जाते. जुलमी आक्रमणाला शरण न जाता आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आणि स्वाभिमानाला उणेपणा येउ नये, यांसाठी जिप्सींना स्थलांतर करावे लागले.
भटक्यांच्या निरनिराळ्या विकसित अवस्थांचा विचार केला,तर असे आढळून येते की ‘अन्नशोधक भटके’ ही मानवाची प्राथमिक अवस्था होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर (कंदमुळे, फळे आणि मासे) ते आपला निर्वाह करीत असत, पाषाण युगात मानवाला दगडी हत्यारे तयार करता येऊ लागली, त्यांचा उपयोग ते स्वरक्षणासाठी आणि प्रतिहल्ल्यासाठी करु लागले, धातूच्या आणि लाकडाच्या लवचिकपणाचा शोध लागल्यानंतर धनुष्यबाण, परशुसारखी काही हत्यारे त्यांना करता येउ लागली. या हत्यारांच्या साहाय्याने त्यांना शिकार करता येणे शक्य झाले. शिकार केलेल्या प्राण्यांच्या मांसाचा त्यांनी आपल्या अन्नात समावेश केला. ‘शिकारी भटके’ ही त्यांची ‘अन्नशोधक भटक्या’ नंतरची अवस्था होय.
हळूहळू त्यांना गाई-म्हशींपासून मिळणारे दूध, शेळ्या-मेंढ्यांपासून मिळणारी लोकर, घोडे,उंट इत्यादींचा दुर्गम प्रदेशात प्रवासास आणि इतरांवर हल्ला करण्यासाठी होणारा उपयोग कळू लागला. प्राणिसृष्टिस आपल्या सेवेत जुंपण्यास त्यांनी सुरवात केली. पशुपालनापासून त्यांना फायदे मिळू लागले. पशुंचे संगोपन करणारे भटके हे ‘चारण भटके’ म्हणून ओळखले जाउ लागले. पशूंचा कळप बाळगून ‘चारण भटके’ पृथ्वीवरील सुपीक कुरणांचा शोध घेत भटकत होते. त्यांच्या जवळील पशूंचे रूपांतर पशुधनात झाले. पशुंचा क्रय-विक्रय होऊ लागला. पशूंचा क्रय-विक्रय करणारे भटके ‘व्यापारी भटके’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले.
शेतीच्या शोधानंतर त्यांनी बैल, रेडे यांसारख्या प्राण्यांना शेतीस जुंपले. शेतीमुळे त्यांच्या जीवनात थोडेफार स्थैर्य आले. तसेच गुरे आणि मेंढयांपासून मिळणा-या-लोकर, हाडे, कातडी, दूधऱ्यांवर ते आपला निर्वाह करु लागले. अशा प्रकारचे भटके हे ‘उत्पादक भटके’ म्हणून ओळखले जाऊ लागले. आपल्या व्यवसायाद्वारा लोकांना सेवा उपलब्ध करुन देणारे आणि त्यांची करमणूक करणारे भटके हे अनुक्रमे ‘सेवाकर्म करणारे भटके’ आणि ‘करमणूक करणारे भटके’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
व्यवसायानुसार भटक्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येते: उत्पादक काम करणारे सेवा कर्म करणारे, करमणूक करणारे, उत्पादक काम करणारे भटके हे गुरे आणि गुरांपासून मिळणारी उत्पादके (लोकर,हाडे,आणि कातडी), तसेच गुरांची विक्री किंवा त्यांची देवाण-घेवाण (अदलाबदल) यांवर आपली गुजराण करतात. कळपातील गुरांच्या गरजांशी त्यांचे भटकेपण निगडित असते. गुरांना चरण्यासाठी आवश्यक असलेल्या कुरणांच्या शोधात ते भटकतात. एका कुरणातील गवत संपले, की दुसरऱ्या कुरणाकडे ते वाटचाल करतात. हे भटके भारतात हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यांतील भरपूर कुरणांच्या प्रदेशात आढळून येतात. चांगपास आणि बाकरवाल ही त्यांची ठळक उदाहरणे देता येतील. गुरांच्या कळपापासून मिळणारऱ्या उत्पान्नास पूरक उत्पन्न शिकार, मासेमारी,औषधी वनस्पती आणि कंदमुळे गोळा करणे यांपासून मिळते.
सेवाकर्म करणारे भटके हे धान्य, मीठ आणि इतर वस्तू ज्या ठीकाणी स्वस्त उपलब्ध असतील तेथून खरेदी करतात आणि ज्या ठिकाणी त्या वस्तू दुर्मिळ असतील,तेथे थोडाफार नफा घेउन विकतात. तसेच दोर, चटया तयार करणे आणि विकणे, औषधे विकणे, लोहारकाम करणे, मोलमजुरी करणे चाकू, सुरी, कात्री यांना धार लावणे इ. कामेही ते करतात. अशा प्रकारचे भटके हे भारतात बंजारा, लमाण, बेलदार, गाडुला, घिसाडी-लोहार, शिकलगार म्हणून परिचित आहेत.
कर्नाकातील बुडुबुडीकी, गोंधळी आणि जोशी घरोघरी जाऊन भविष्य कथन व मदारी सर्पाचा खेळ, डोबांरी तारेवरची कसरत, नंदी वाले बैलांचा खेळ आणि काही जादूचे प्रयोग करतात. या मार्गांनी लोकांची करमणूक करणारे भटके उत्पादक व सेवाकर्म करणाऱ्या भटक्याहून भिन्न असून त्यांपैकी नॅटस, कालबेलिया आणि जोगी हे सर्पांचा खेळ करून पोट भरणारे आहेत. अशा लोकांना पूर्वि गावोगावी अन्नधान्य, जुने कपडे इत्यादी मोबदला म्हणून मिळत असे.
भारतातील भटक्या जमाती प्रायः हिंदू धर्माचे अनुकरण करताना दिसून येतात. व्यवसायानिमित्त भटकत असताना स्थानिक हिंदू धर्मीयांशी या भटक्यांचा सतत संपर्क येत राहिल्यामुळे कळत नकळत त्यांच्याकडून हिंदू संस्कार अंगीकारले गेले असावेत. हिंदू धर्मातील पाप-पुण्य या संकल्पनांवर त्यांचा विश्वास दिसून येतो लग्नविधीही हिंदू धर्मीयाप्रमाणेच कमी-अधिक प्रमाणात असतात, राजा व राज्यसत्ता यांनी अंगीकारलेल्या धर्माचा प्रभावही काही भटक्या जमातीवर झालेला दिसुन येतो. उदा., काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील गुज्जरसारख्या काही भटक्या जमातींनी इस्लाम धर्म स्वीकारला.
भारतातील भटक्या जमातीमध्ये मुख्यत्वे पितृसत्ताक कुटूंबपद्धती असून एक पत्नीत्वाची प्रथा रूढ आहे. परंतु पहिली पत्नी दीर्घकाळ आजारी असेल, तिला वंध्यत्व आले किंवा तसेच काही महत्वाचे कारण असेल, तर दुसरी पत्नी करण्याची मुभा त्यांना आहे. भटक्यातील मुसलमान एकापेक्षा अधिक बायका करतात परंतु एकच पत्नी करण्याकडे प्रायः सर्व भटक्यांचा कल दिसून येतो. मुसलमान भटके वगळता इतर भटक्यांमध्ये हिंदू विवाहपद्धती रूढ आहे पण गांधर्व विवाह व वधुवरांच्या इच्छेनुसार जोडीदाराची निवड करता येत नाही विधवा विवाह, घटस्फोट आणि विभक्त कुटुंबपद्धती या गोष्टींनाही काही भटक्या जमातीत परवानगी दिली जात नाही.
भारतातील पारंपारिक सामाजिक-आर्थिक व्यवहारात भटक्यांचे स्थान नगण्य आहे. प्राचीन काळी वस्तूंचे किंवा सेवांचे मूल्य हे प्रामुख्याने पैशाच्या रूपात न ठरता धान्याच्या रूपात ठरिवले जात असे. वस्तू आणि सेवा यांच्या परस्पर विनिमयाच्या स्वरूपात पार पाडले जात. भटक्या जमातींचा त्यांच्या व्यवसायानिमित्तच गावकऱ्याशी संपर्क येई. हा संपर्क स्थायी स्वरूपाचा नव्हता. त्यामुळे गावगाड्यातील आर्थिक व्यवहारातही भटक्या जमातींना फारसे महत्त्वाचे स्थान लाभलेले दिसून येत नाही.
आधुनिकरणामुळे गावगाडयातील पारंपारिक अर्थव्यवस्था कोलमडू लागली लागली आहे. वस्तूंचे आणि सेवांचे मुल्य मुख्यत्वे पैशांच्या स्वरूपात ठरविले जाऊ लागले. जातिनिष्ठ व्यवसायामुळे एकजिनसी असणारा समाज व्यावसायिक दृष्टया त्याच व्यावसायात अद्यापही मोठया प्रमाणात गावगाडयात दिसून येत असला, तरी त्यांच्यातील एकजिनसी पणा बदलत्या अर्थव्यवस्थेमुळे कमी होताना दिसून येतो. व्यावसायिक संबंध हे सेद्रिंय न राहता करारपात्र होताना दिसतात. आधुनिकरणाचा गावगाडयावर जसा परिणाम झाला,तसा भटक्या जमाती वरही झालेला दिसून येतो. औद्योगिकीकरणासाठी जंगलतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात आली. जंगलतोडीमुळे गवताची कुरणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागली. जळणासाठी जंगलतोड होऊ लागली व गर्द झाडाझुडपांनी व्यापलेले रानोमाळ रूक्ष दिसु लागले. भटक्यांच्या व्यवसायावर याचा परिणाम होणे अपरिहार्य आहे. गुरांना चरण्यासाठी लागणारी कुरणे अपुरी पडू लागली. त्यामुळे गुरांचे कळप बाळगणे कठीण होऊ लागले आणि म्हणून गुरांपासून मिळणारी उत्पादने थंडावली. जंगलात लागवडीखाली असणाऱ्या जमिनीबाबत बंधने आली म्हणून भटक्यानां जमिनी कसणे दुरापास्त होऊ लागले. परिणाम: भटके व्यावसायहीन होऊन मोलमजुरी किंवा टाकाऊ उद्योग करू लागले, तर काही भीक मागून जीवन जगू लागले.
आधुनिकरणाचा भटक्यांच्या आचारविचारांवर अद्याप परिणाम झालेला नाही. अलिप्तपणामुळे त्यांच्यात मागासलेपणा दिसून येतो. म्हणून त्यांना भेडवसाणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय लक्षात घेणे आवश्यक ठरते.
विमुक्त जमाती : परिस्थितीच्या दबावामुळे किंवा आर्थिक विपन्नावस्थेमुळे काही भटक्या जमाती गुन्हेगारीकडे वळल्या आणि गुन्हेगारी जमाती म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. पुढे पिढ्यान् पिढ्या गुन्हेगारी करून चरितार्थ चालविणे, हाच त्यांचा व्यवसाय होऊन बसला. प्रत्येक पिढीत कुटुंबातील लहान मुलांना लहानसहान गुन्हे कसे करावे, व वय वाढत जाईल तसतसे मोठे गुन्हे कसे करावे याचे प्रशिक्षण व्यवसाय म्हणून त्यांना देण्यात येत असे आणि हा वारसा प्रत्येक कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालविला जात असल्याचे आढळून आलेले आहे. थोडक्यात, नंतरच्या प्रत्येक पिढीतील व्यक्तीचे गुन्हेगारी विश्वात होणारे सामाजिकीकरण त्यांना गुन्हेगारीकडे मार्गस्थ करते असे दिसून येते.
गुन्हेगार जमातीतील विशिष्ट जमाती या विशिष्ट प्रकारचे गुन्हे करीत असत. उदा., पुर्वीच्या मध्य प्रांतातील (विद्यमान महाराष्ट्र राज्यातील भंडारा, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर हे जिल्हे आणि मध्य प्रदेशातील महाकोशलसारखे भाग) गोपाळ आणि मारवाडी-कंजार जमाती या फक्त गुरांचीच चोरी करीत असत. कोरवा ही जमात घर फोडी आणि चोरी करणे भ्याडपणाचे कृत्य मानी. तसेच गुन्हे केव्हा आणि कसे करावयाचे या संबंधीसुद्धी काही संकेत वा नियम असत. पंजाबमधील टॅगू हे रात्रीच्या वेळी कधीही गुन्हे करीत नसत. भामटे ज्या खेडयात राहत तेथे कधीहि चोरी करीत नसत. पूर्वीच्या संयुक्त प्रांतातील (विद्यमान उत्तर प्रदेशातील ) सानोरहिया हे आपल्या घराजवळ कधीहि चोरी करीत नसत.वर्तणुकीचे नियम आणि नैतिकता ते काटेकोरपणे पाळीत असत.
गुन्हेगारी जमाती या गावगाडयापासून अती दूर जंगलात वास्तव्य करणाऱ्या असल्यामुळे आणि उपजीविकेचे साधन नसल्यामुळे गावगाडयातील आर्थिक व्यवहारात भटक्यां जमातीप्रमाणेच या जमाती नाही कोणतेच स्थान नव्हते. लमाण, बंजारा, वडार इ. अपवाद वगळता उपजीविकेची साधने या जमातींजवळ नव्हती.
मोगल सत्तेच्या अखेरच्या काळात आणि इंग्रजी सत्तेच्या सुरूवातीच्या काळात अखंड भारतात एकसूत्री राज्यसत्ता अस्तित्वात नव्हती इंग्रज सत्ताधीश आपले राज्य आणि व्यापार-उदीम वाढविण्यात मग्न असल्यामुळे भारतात (हिदुस्थानात) त्यांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी फार वेळ मिळत असे. एतद्देशीय राजे अपापसांत आणि नंतर इंग्रजाबरोबर सतत लढण्यात गुंतल्यामुळे प्रशासन फारसे कार्यक्षम नव्हते. याचा परीणाम असा झाला की संरक्षणाच्या बाबतीत खेडयांना स्वतःवरच अवलंबून रहावे लागत असे. या काळात उत्तर भारतात ठगांचा आणि दरोडेखोरांचा सुळसुळाट माजला होता. त्यामुळे जीवन अस्ताव्यस्त झाले होते. इंग्रजी सत्ता येथे स्थिरस्थावर झाल्यानंतर १८७१ साली क्रिमिनल ट्राइब्ज अँक्ट करण्यात आला. भारतात सर्व कर्मे जातधर्म म्हणून केली जातात.कारण तेथे जातीचे प्राबल्य आहे. म्हणून गुन्हेगार पुर्वजांचे वंशजही गुन्हेगारच असणार या अनैसर्गिक आणि अशास्त्रीय आधारावर हा कायदा करण्यात आला. या कायद्यानुसार भटक्या लोकांचे समूहच्या समुह गुन्हेगार टोळया ठरिवण्यात आले. त्यांच्या वर जाचक संचार निर्बंध लादण्यात आले आणि बंदिस्त वस्त्यांत त्यांना अडकवून ठेवण्यात आले.
स्वतंत्र भारतात हा कायदा मागे घेण्यात आला. गुन्हेगार टोळ्या किंवा गुन्हेगार जमातींना विमुक्त जमाती असे संबोधण्यात येऊ लागले. वातरिया, मीना, ढेया, सिंगीकाट आणि कंजारभाट (राजस्थान) बावरिया, मीना डोम (उत्तर प्रदेश) येनाडी, कट्टेरा, डोंगदिशारी, पेड्डातीगोल्ला, कट्टिपापालू, निराशिकारी, पामुला, डोमारा, मांडुला. कोरवा आणि एरूकला (आंध्र प्रदेश) सानसीया (दिल्ली व हरियाणा) गोंधळी, जोशी, मराडी, चित्रकथी, वासुदेव, नंदीवाले, तिरमाळ, बेरड, रामोशी, पारधी, वडार (महाराष्ट्र) वाघरी (गुजरात) करवाल आणि गुलगुली (बिहार व उत्तर प्रदेश) सिगिकाट व ढेया (राजस्थान आणि जम्मू व काश्मीर) जोगी (बंगाल) आदिपंतारम (तमिळनाडू) आणि भारताच्या सर्वच भागांत कमीअधिक प्रमाणात आढळणारी बंजारा या भटक्या विमुक्त जमाती आहेत.
भटक्या जमातींचे आणि विमुक्त जमातींचे जीवन भटके असल्यामुळे त्यांच्यासाठी योजिलेल्या कल्याणकारी योजनांची फलश्रुती सर्वसामान्यपणे त्यांना मिळाली नाही, असे म्हटले जाते. जोपर्यंत जमिनी देऊन त्यांना एकाच ठिकाणी स्थायिक केले जात नाही किंवा स्थायिक होण्यासाठी बिगरशेती व्यवसाय उपलब्ध करून दिले जात नाहीत, तोपर्यत त्यांच्यामध्ये इष्ट बदल घडवून आणणे अवघड आहे.
केंद्र व राज्य शासन, सामाजिक संघटना, आदिम जाती सेवक संघ, पर्वतीय आदिम जाती सेवक संघ, सर्वोदयी संघटना, महाराष्ट्र भटक्या विमुक्त जातिसंघ इ. संस्था भटक्यांच्या कल्याणाकरिता यत्नरत आहेत.
भटके आणि अर्ध-भटके यांच्यासाठी पंचवार्षिक योजनांद्वारे जे कल्याणकारी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, त्यांमध्ये मुख्यतः भटक्यांचे पुनर्वसन करून त्यांना उर्वरित समाजजीवनाशी निगडित करणे, हा महत्त्वाचा उद्देश आहे.
केंद्र व महाराष्ट्र शासनपुरस्कृत अनेक योजना या वर्गाच्या उन्नतीकरिता आखण्यात आलेल्या आहेत. त्या तीन विभागांत मोडतातः शैक्षणिक योजना, आर्थिक विकास योजना, गृहनिर्माण व अन्य योजना. सर्व स्तरांवरील शिक्षणशुल्क, परीक्षाशुल्क व माध्यमिक शिक्षणोत्तर शिष्यवृत्त्या, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील विद्यार्थ्यांना पाठयवेतन तसेच वसतिगृहे, आश्रमशाळा व बालवाडया सुरू करणे वगैरे योजना शैक्षणिक योजनांत समाविष्ट आहेत. जमीन बांधबंदिस्ती, जमिनीचे समतलनीकरण तसेच सिंचन विहीरींचे बांधकाम, जुन्या सिंचन विहीरींची दुरुस्ती, शेतीच्या अवजरांची खरेदी, विहीरीवर विजेचे व तेलाचे पंप बसविणे वगैरेंसाठी अनुदान व कर्जपुरवठा यांचा आर्थिक विकास योजनेत समावेश होतो. सहकारी गृहनिर्माण संस्था व वैयक्तिक घरबांधणीकरिता कर्ज व अनुदान, पिण्याच्या पाण्याची सोय, मागासवर्ग वस्त्यांत रस्तेबांधणी आणि विजेचे दिवे बसविणे आदी योजनांचा तिसऱ्या वर्गात समावेश होतो. माध्यमिक शिक्षणोत्तर शिष्यवृत्तीवर केंद्रशासन खर्च करते. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व भटक्या विमुक्त जाती-जमाती यांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या १९८१-८२ च्या अर्थसंकल्पात सु. ८२ कोटी रुपायांची तरतूद करण्यात आली होती.
अद्यापही अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने करण्याची गरज आहे. भटक्यांचे भटकेपण सुटण्यासाठी आणि सुस्थिर व व्यवस्थित जीवन जगणे त्यांना सुलभ व्हावे म्हणून आतापर्यंत जे उपाय सुचविण्यात आले आहेत, त्यांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे :
(१) कायमच्या वास्तव्यासाठी भटक्यांना जमिनी देणे, (२) त्यांच्याजवळ असलेल्या गुरांना चरण्यासाठी गवती कुरणे उपलब्ध करुन देणे, (३) दुग्धव्यावसायिकांचे सहकारी संघ स्थापन करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, (४) त्यांच्या मेंढपाळ व्यवसायास प्रोत्साहन देणे, (५) घरे बांधण्यासाठी त्यांना पुरेशी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, (६) वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, (७) त्यांच्यातील जे धडधाकट असतील त्यांना सैनिकी सेवेत दाखल करून घेण्याचे प्रयत्न करणे, (८) भटक्या आणि विमुक्त जातींच्या जनगणनेच्या वेळी विस्तृत नोंदी करणे, (९) त्यांच्या कल्याणासाठी ज्या उपाय- योजना करण्यात येतील त्यासाठी पुरेसा आर्थिक निधी वेळोवेळी उपलब्ध करून देणे, (१०) त्यांच्यासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटनांचे किंवा सेवाभावी संस्थांचे कार्यक्षेत्र विस्तृत करण्यासाठी त्यांना आवश्यक असलेली मदत शासनाने करणे, (११) व्यवसाय प्रशिक्षण देणारी केंद्रे मोठया संख्येने स्थापन करणे, (१२) भटक्यांच्या प्रश्नंसंबंधी अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन सहानुभूतिपूर्वक असणे आवश्यक आहे.
संदर्भः 1. Misra, P. K. Nomadic Gaudalia Lohar of Eastem Rajasthan, Calcutta, 1980.
2. Raghavaiah, V. Tribes of India, Vol. Il, New Delhi,1972.
3. Shashi, S.S. The Nomads of the Himalayas, Delhi, 1979.
भोसले, दौलतराव
“