भक्तमाल : वैष्णव संप्रदायाच्या भक्तांचा परिचय करून देणारा नाभादास (नाभाजी) विरचित ब्रज भाषेत रचलेला एक महत्त्वपूर्ण पद्य ग्रंथ. हिंदीतील तो आद्य चरित्रग्रंथ असून तुलसीदासांच्या रामचरित मानससारच्या खालोखाल तो लोकप्रिय आहे.
नाभादास हा रामानंद संप्रदायाचा अनुयायी होता म्हणून स्वाभाविकपणेच भक्तमालमध्ये रामानंदी संप्रदायाच्या भक्तांचा विशेष परिचय आढळतो. नाभादासाने आपली गुरूपरंपरा रामानंद ⟶ अनंतानंद ⟶ कृष्णदास पयहारी ⟶ कील्हदास ⟶ अग्रदास अशी दिली आहे. त्याच्या जन्मस्थान, जन्ममृत्यूच्या तारखा, माता-पिता जात इ. चरित्र तपशीलांबाबत अधिकृत माहिती मिळत नाही. अभ्यासकांत ह्या तपशीलांबाबत मतमतांतरे आहेत. ह्या अभ्यासकांत श्यामसुंदरदास, मिश्रबंधू, रामचंद्र शुक्ल, क्षितिमोहन सेन, दीनदयालू गुप्त, महावीरसिंग गहलोतप्रभृतींचा समावेश होतो. नाभादासाच्या प्रख्यात भक्तमालवर प्रियादासाने जी भक्तिरसबोधिनी नावाची पहिली टीका लिहिली, तिचा काल १७१२ (संवत् १७६९) हा निश्चित आहे. ही टीका सु. शंभर वर्षांनंतर लिहिली. त्यावरून नाभादासाचा काल सतराव्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो. भक्तमालमध्ये १६४३ पर्यंतच्या भक्तांचीच चरित्रे आली आहेत. त्यावरुन सु. १६५८ हा भक्तमालचा रचनाकाल अभ्यासक मानतात. नाभादास जन्मांध होता व लहानणीच त्याचे वडील निवर्तले. तेव्हा दुष्काळ पडला होता आणि पालनपोषण करू न शकल्याने आईने त्याला वनात सोडून दिले. कील्हदास व अग्रदास आपल्या तेथून चालले असता ते अंध बालक त्यांच्या दृष्टीस पडले व त्यांनी त्यास उचलून घेतले. पुढे त्याला दृष्टी प्राप्त झाली व अग्रदासाने आपल्या संप्रदायाची दीक्षा दिली, अशी दंतकथा सांगितली जाते. परंपरेनुसार नाभादास डोम अथवा महाराष्ट्रीय ब्राह्मण असावा, असे मानले जाते. प्रियादासाने तो हनुमानवंशीय महाराष्ट्रीय ब्राह्मण होता, असे म्हटले आहे.
नाभादासाच्या तीन कृती उपलब्ध आहेत : रामाष्ट्ययाम, रामभक्तीसंबंधी स्फुट पदे आणि भक्तमाल. यांतील पहिल्या दोन कृती गौण असून त्याच्या भारतभर झालेल्या कीर्तीचा स्तंभ भक्तमालच होय. भक्तमालची सर्वांत प्राचीन प्रत कोणती ? त्याच्या मूळ रूपात किती पद्ये होती ? यांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्याचे चिकित्सक व शास्त्रीय संपादनही अद्याप झाले नाही. काही अभ्यासकांच्या मते त्याच्या मूळ प्रतीत तुलसीमालेतील मण्याच्या संख्येप्रमाणे १०८ पद्ये असावीत. १७१३ मधील उपलब्ध प्रतीत १९४ पदसंख्या आहेत, तर रामचंद्र शुक्ल त्यात ३१६ पद्ये असल्याचे मानतात.
भक्तमालची रचना नाभादासाने त्याचे गुरू अग्रदास यांच्या आज्ञेवरून केली असल्याचे ग्रंथातच नमूद केले आहे. नाभादास हा तुलसीदासांचा समकालीन होता व ⇨ तुलसीदासांच्या हयातीतच त्याची एक महान व ज्येष्ठ भक्त म्हणून कीर्ती होऊ लागली होती. भक्तमाल दोन भागात विभागला असून पूर्वार्धात कलियुगपूर्व भक्तांची चरित्रे आणि उत्तरार्धात चार प्रमुख भक्तिसंप्रदायांतील महान भक्तांची आणि निश्चितपणे कुठल्याही संप्रदायाचे म्हणता येणार नाहीत अशा काही भक्तांची चरित्रे आली आहेत. सु. २०० भक्तांची चरित्रे त्यात आहेत. ऐतिहासिकतेच्या दृष्टीने उत्तरार्ध विशेष महत्वाचा आहे. नाभादास हा रामानंदी संप्रदायाचा कवी असल्याने त्यात रामानंदी भक्तांची विशेष माहिती मिळते.
ब्रज भाषेत रचलेला हा ग्रंथ पद्यरूप आहे. विशेषतः छप्पय म्हणजे सहा ओळींच्या छंदाचा त्यात वापर केला आहे. एकूण १९८ छप्पय रचना त्यात आहेत. या छंदावर व भाषेवर कवीचे प्रभुत्व दिसते. त्याची शैली भारदस्त व सुसंस्कारित आहे. भक्तमालवर हिंदीत शेकडो टीका लिहिल्या गेल्या असून त्यांतील प्रियादासकृत भक्तिरसबोधिनी ही टीका प्राचीनतम मानली जाते. इतर भारतीय भाषांतही मूळ ग्रंथ व भक्तिरसबोधिनीच्या आधारे अनेक अनुवाद, टीका व संतचरित्रे लिहिली गेली आहेत. मराठीत भक्तिरसबोधिनीवर भक्तिप्रेमामृत नावाची टीका मार्तंडबुवा नावाच्या कवीने १८८९ मध्ये लिहिली आहेत. सामान्यतः ती भक्तमाला म्हणून ओळखळी जाते. मराठी संतचरित्रकारांनीही भक्तमालच्या आधारे अनेक संतचरित्रे लिहिली आहेत. भक्तमालविषयीच्या आदरभावातून व त्याच्या अफाट लोकप्रियतेतून मध्ययुगीन भारतीय साहित्यात त्याची एक परंपराच निर्माण झाल्याचे दिसते. बंगालीतही वृंदावन येथील लालदास बाबजी नावाच्या कवीने मूळ भक्तमाल आणि त्यावरील प्रियादासाची टीका यांच्या आधारे भक्तमाल ग्रंथाची रचना केली असून ती बंगाली वैष्णवांत विशेष लोकप्रिय आहे. लालदासाने त्यात स्वतचीही बरीच भर घातली आहे.
भक्त व भक्तकवी यांची चरित्रे जतन करुन ठेवण्यात भक्तमालचा वाटा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. प्रियादास, वैष्णवदास, लालदास, बालकराम, मलूकदास, मार्तंडबुवा, ‘रूपकला’ यांच्या भक्तमालवरील दर्जेदार टीका त्याची प्रतिष्ठा व माहात्म्य वाढण्यास उपकारक ठरल्या. सीतारामशरण भगवानप्रसाद ‘रूपकला’ यांनी लखनौ येथून १९५१ मध्ये काढलेली भक्तमालची सटीक आवृत्ती सर्वोत्कृष्ट मानली जाते. हिंदीतील आद्य चरित्रग्रंथ म्हणून त्याचे आगळे स्थान आहे.
सुर्वे, भा. ग.