ब्लूमफील्ड, लेनर्ड: (१ एप्रिल १८८७ – १८ एप्रिल १९४९). अमेरिकन भाषावैज्ञानिक. आधुनिक भाषाविज्ञानामधील एका महत्त्वाच्या विचारसरणीचे प्रणेते. शिकागो येथे जन्म. प्रसिद्ध संस्कृतज्ञ मॉरिस ब्लूमफील्ड हे यांचे चुलते होत. हार्व्हर्ड, शिकागो या अमेरिकन व लाइपसिक, गटिंगेन या जर्मन विद्यापीठांतून त्यांनी शिक्षण घेतले आणि शिकागो (१९२७ – ४०) व येल (१९४० – ४९) विद्यापीठांतून अनुक्रमे जरमॅनिक फिलॉलजी आणि भाषाविज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून ते राहिले. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. १९४६ साली पक्षाघात झाल्यापासून त्यांचे लेखन वाचन संपुष्टात आले. न्यू हेबन येथे त्यांचे निधन झाले.
ॲन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ लँग्वेज (१९१४) हे त्यांचे पहिले महत्त्वाचे पुस्तक. त्यावर व्हिल्हेल्म व्हुंट या जर्मन विचारवंताच्या लोकमानसाच्या कल्पनेचा पगडा दिसतो. त्यांनी फिलिपीन्स बेटांतील तागालोग भाषा, अमेरिकन इंडियन लोकांच्या ⇨ अल्गोक्वियन भाषासमूहातील भाषा, इंडो यूरोपियन कुटुंबातील संस्कृत इ. भाषा यांच्यावर काम केले. अल्गाँक्वियन भाषांची त्यांनी ऐतिहासिक तुलना केली व ती पद्धत केवळ लिखित भाषांपुरती लागू होते, हा भ्रम दूर केला. पाणिनीबद्दलच्या त्यांचा आदर सखोल अभ्यासातून उत्पन्न झालेला होता.
विविध भाषांचा अभ्यास, पाणिनीचा ठसा आणि ए. पी. व्हाइस ह्या जर्मन वर्तनवादी मनोवैज्ञानिकाची विचारसरणी यांचा एकत्र परिणाम होऊन त्यांनी भाषेबद्दलच्या आपल्या कल्पना तपासून घेतल्या आणि लँग्वेज (१९३३) या पुस्तकाच्या रूपाने एका नव्या विचारसरणीचा पाया घालून पुढील कार्याला दिशा दिली. भाषेचे सर्वांना गोचर होणारे अंग आणि भाषाव्यवहाराचा संबंधितांच्या वर्तनावर होणारा परिणाम यांवर भिस्त ठेवावी व मनःकल्पितांचा पसारा आवरावा भाषेला निश्चित रचना असते व तिच्यामार्फत शब्दाकडून अर्थाकडे कसा प्रवास होतो हे पाहणे महत्त्वाचे ह्या रचनेची मांडणी गणिती काटेकोरपणे व्हावी एका भाषेच्या एका अवस्थेचे वर्णन झाल्यानंतरच मग भाषांची ऐतिहासिक तुलना अवश्य करावी, ही या विचारसरणीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. [→सपीर, एडवर्ड].
भाषाविज्ञानाची मूलतत्वे सामान्यांपर्यंत पोहोचवावीत आणि त्यांच्या भाषेसंबंधीच्या व्यावहारिक प्रश्नांची उकल करून दाखवावी, असा त्यांचा कटाक्ष असे. रशियन इ. परभाषा म्हणून शिकवणे आणि मुलांना इंग्लिश भाषेचे वाचन शिकवणे, यांसाठी त्यांनी सामग्री तयार केली.
संदर्भ : Bloch, Bernard, “Obituary” ,Language, Vol. 25, Baltimore, 1949.
केळकर, अशोक रा.