ब्लॉक, फीलिक्स: (२३ ऑक्टोबर १९०५ -). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्रीय चुंबकीय परिशुद्ध मापनांकरिता नवीन पद्धतींचा विकास करण्यासाठी व त्यांच्या संदर्भात लावलेल्या शोधांबद्दल ब्लॉक यांना ⇨ एडवर्ड मिल्स पर्सेल यांच्याबरोबर १९५२ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले.
ब्लॉक यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील झुरिक येथे झाला. प्रथमतः अभियंता होण्याच्या उद्देशाने त्यांनी झुरिक येथील स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत प्रवेश केला पण एक वर्षानंतर त्यांनी भौतिकीचे शिक्षण घेतले आणि स्फटिकांतील इलेक्ट्रॉनांच्या पुंजयामिकीवर [→ पुंजयामिकी] व स्वतः विकसित केलेल्या धातवीय विद्युत् संवहनाच्या सिद्धांतावर प्रबंध सादर करून १९२८ मध्ये पीएच्. डी. पदवी मिळविली. हा प्रबंध घन पदार्थांच्या आधुनिक सिद्धांताला आधारभूत मानण्यात येतो. त्यानंतरच्या काही वर्षांत विविध यूरोपीय विद्यापीठांत साहाय्यक व अधिछात्र या नात्याने त्यांना डब्ल्यू. पाउली, एच्. ए. क्रॅमर्स, डब्ल्यू. के. हायझेनबेर्क, नील्स बोर व एन्रीको फेर्मी या सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. १९३२ – ३३ मध्ये ते लाइपसिक विद्यापीठात अध्यापक होते तथापि १९३३ मध्ये हिटलर सत्ताधारी झाल्यावर ब्लॉक यांनी जर्मनी सोडली. पुढील वर्षी अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठात ते साहाय्यक सहयोगी प्राध्यापक झाले. १९३६ मध्ये त्यांची तेथे भौतिकीच्या प्राध्यापकावर व १९६१ मध्ये भौतिकीच्या मॅक्स स्टाइन प्राध्यापक पदावर नेमणूक झाली. १९७१ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच विद्यापीठात ते गुणश्री प्राध्यापक म्हणून काम करू लागले. १९३९ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठ व लॉस ॲलॅमॉस येथे अणुऊर्जेच्या प्रारंभिक टप्प्यांवरील संशोधनात, तसेच हार्व्हर्ड विद्यापीठात रडार प्रतिउपाययोजना विकसित करण्यात काम केले.
स्टॅनफर्ड येथे सुरुवातीला एका साध्या न्यूट्रॉन उद्गमाच्या साहाय्याने संशोधन करीत असताना मुक्त न्यूट्रॉनांच्या चुंबकीय परिवलाचा [→ अणुकेंद्रीय व आणवीय परिबले] प्रत्यक्ष पुरावा लोहात प्रकीर्णन पावणाऱ्या (विखुरणाऱ्या) न्यूट्रॉनांच्या निरीक्षणावरून मिळू शकेल, असे त्यांना आढळून आले. १९३६ मध्ये त्यांनी यासंबंधी प्रसिद्ध केलेल्या निबंधात या आविष्काराद्वारे ध्रुवित (एकाच दिशेत परिवलन घटक असलेल्या) न्यूट्रॉनांच्या शलाकेची निर्मिती व निरीक्षण करता येईल असे प्रतिपादन केले. एल्. डब्ल्यू. अल्वारेझ यांच्या समवेत ब्लॉक यांनी बर्कली येथील सायक्लोट्रॉनाच्या [→ कणवेगवर्धक] साहाय्याने १९३९ मध्ये केलेल्या प्रयोगात न्यूट्रॉनच्या चुंबकीय परिबलाचे प्रथमच अचूक मूल्य मिळविले. महायुद्धात रडारसंबंधी केलेल्या कार्यामुळे इलेक्ट्रॉनिकीतील आधुनिक प्रगतीचा त्यांना परिचय झाला आणि त्यामुळे अणुकेंद्रीय व परिबलांसंबधी संशोधन करण्यासाठी विद्युत् चुंबकीय व अणुकेंद्रीय आविष्कारांचा संयोग करण्याची कल्पना त्यांना सुचली. १९४५ मध्ये स्टॅनफर्ड येथे या दृष्टीने संशोधनास सुरुवात करून त्यांनी डब्ल्यू. डब्ल्यू. हानसेन व एम्. ई. पॅकर्ड यांच्या सहकार्याने अणुकेंद्रीय अनुस्पंदावर [→ अनुस्पंदन] आधारलेली अणुकेंद्रांचे चुंबकीय परिबल मोजण्याकरिता अणुकेंद्रीय परिबलांचा अभ्यास करण्यासाठी वापरता येते. या पद्धतीचा उपयोग करून त्यांनी न्यूट्रॉन व कित्येक मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकाच्या चुंबकीय परिबलांचे मापन केले. याच सुमारास पर्सेल व त्यांच्या सहकाऱ्यांनीही स्वतंत्रपणे या पद्धतीचा शोध लावला. या पद्धतीने व्यक्तिगत अणुकेंद्रांचे चुंबकीय परिबल मोजता येत असल्याने अणुकेंद्रीय संरचनेच्या अभ्यासात ती अतिशय उपयुक्त आहे. निरीक्षित अणुकेंद्रे ज्या परिस्थितीत विवक्षित स्थानी असतात, तिचा या पद्धतीत वापरण्यात येणाऱ्या रेडिओ ग्रहणीला (रेडिओ तरंग ग्रहण करणाऱ्या साधनाला) मिळणाऱ्या संकेतांवर लक्षणीय परिणाम होत असल्याने घन, द्रव व वायू पदार्थांच्या संघटनासंबंधीची नवीन माहिती या पद्धतीने मिळू शकली. अनेकदा या माहितीचा रेणूंच्या रासायनिक संघटनाशी निकटचा संबंध असल्याचे दिसून आल्याने वैश्लेषिक रसायनशास्त्रात, तसेच जीवविज्ञानात ही पद्धत प्रभावी ठरली आहे. १९५४ नंतर ब्लॉक यांनी अणुकेंद्रीय चुंबकत्वावरील संशोधन पुढे चालू ठेवण्याबरोबरच ⇨ अतिसंवाहकता व नीच तापमानाशी निगडीत असलेल्या इतर आविष्कारांविषयी संशोधन केले.
यूरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (CERN) या जिनीव्हा येथील संघटनेचे १९५४ – ५५ मध्ये पहिले महासंचालक म्हणून त्यांनी काम केले. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे १९६५ मध्ये अध्यक्ष होते. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९४८ मध्ये त्यांची निवड झाली.
भदे, व. ग.