स्टर्जन, विल्यम : (२२ मे १७८३—४ डिसेंबर १८५०). इंग्रज अभियंता व संशोधक. स्वत:च्या वजनापेक्षा अधिक वजन तोलून धरू शकणार्‍या विद्युत् चुंबकाचा त्यांनी शोध लावला. या प्रयुक्तीमुळेच तारायंत्र, विद्युत् चलित्र आणि आधुनिक तंत्रविद्येतील मूलभूत अशा इतर अनेक प्रयुक्त्यांचे शोध लागले.

स्टर्जन यांचा जन्म व्हिटिंग्टन (लँकाशर) येथे झाला. त्यांनी १८०२—२० या कालावधीत लष्करामध्ये सेवा केली. त्यावेळे स लष्करातील अधिकार्‍यांनी लॅटिन, ग्रीक आणि गणित शिकविल्यामुळे ते विज्ञानाची पुस्तके वाचू शकले. त्यांनी न्यू फाउंडलंड येथे मोठ्या गडगडाटी वादळांची निरीक्षणे केली. त्यामुळे त्यांना विद्युत् आविष्कारांबद्दल आणि निसर्गविज्ञान या विषयांमध्ये जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यांनी स्वत: अध्ययन केले.

वूलविच येथे चर्मकार म्हणून काम करीत असताना स्टर्जन यांनी विद्युत् प्रयोगांची व्याख्याने देण्यात बराच काळ घालविला. १८२४ मध्ये ते ॲडिसकोंब ( सरे ) येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये अधिव्याख्याते झाले. पुढील वर्षीच त्यांनी १.२५ सेंमी. लांबी असलेला आणि घोड्याच्या पायातील नालेचा आकार असलेल्या मृदू लोखंडाच्या कांबीचा विद्युत् चुंबक प्रदर्शित केला. कांब व तारा यांमध्ये निरोधन निर्माण करण्या- करिता कांबीवर लाखेचे लेपन करण्यात आले होते. एका विद्युत् घटातील विद्युत् प्रवाह वापरल्यास २०० ग्रॅ. वजनाचा विद्युत् चुंबक ४ किग्रॅ. वजनाचे लोखंड तोलून धरू शकत होता. १८३२ मध्ये त्यांनी विद्युत्चलित्र तयार केले, तसेच अलीकडील आधुनिक विद्युत् चलित्रात अंगभूत भाग असलेल्या दिक्परिवर्तकाचा शोध लावला. १८३६ मध्ये त्यांनी विद्युत् प्रवाह मोजू शकणार्‍या फिरते वेटोळे असलेल्या ⇨ गॅल्व्हानोमीटर प्रयुक्तीचा शोध लावला. त्यांनी व्होल्टाइक विद्युत् घटमालेत सुधारणा केल्या आणि तापविद्युत् सिद्धांतावर सुद्धा संशोधन केले.

स्टर्जन यांनी ५०० पेक्षा अधिक वेळा पतंगाच्या साहाय्याने वातावरणाचे निरीक्षण केल्यानंतर दाखवून दिले की, शांत हवामान असताना पृथ्वीच्या सापेक्ष वातावरणात अपरिवर्तनीय धन विद्युत् भार तयार होत असतो, तसेच वाढत जाणार्‍या उंचीप्रमाणे धन विद्युत् भारही अधिक होत राहतो.

स्टर्जन हे वूलविच लिटररी सोसायटी आणि मँचेस्टर लिटररी अँड फिलॉसॉफिकल सोसायटी या संस्थांचे सदस्य होते. १८४०—४४ या कालावधीत ते मँचेस्टर येथील रॉयल व्हिक्टोरिया गॅलरी ऑफ प्रॅक्टिकल सायन्सेसचे अधीक्षक होते. १८२५ मध्ये त्यांना रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स या संस्थेकडून विद्युत् चुंबक प्रयुक्तीचा शोध लावल्याबद्दल रौप्य पदक मिळाले. स्टर्जन यांनी इंग्लंड येथे १८३६ मध्ये ॲनल्स ऑफ इलेक्ट्रिसिटी हे पहिले विद्युत् नियतकालिक सुरू केले.

स्टर्जन यांचे प्रेस्टविच ( मँचेस्टर ) येथे निधन झाले.

सूर्यवंशी, वि. ल.