ब्लाव्हॅट्स्की, हेलेना प्यिट्रॉव्हन्य: (१२ ऑगस्ट १८३१ – ८ मे १८९१). ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ च्या दोन संस्थापकांपैकी एक विख्यात अध्यात्मवादी महिला. त्यांचा जन्म रशियातील यिकट्यिरीनरलाफ म्हणजेच आधुनिक नेप्रोपट्रॉफ्स्क या गावी झाला. त्यांचे वडील कर्नल पीटर व्हान हान हे रशियन तोफखान्यावरील अधिकारी होते आणि आई हेलेना हान ही स्त्री-मुक्तीचा पुरस्कार करणारी लेखिका होती. वयाच्या १७ व्या वर्षी रशियन सैन्यातील जनरल ब्लाव्हॅट्स्की या एका वयस्क अधिकार्याबरोबर त्यांचा विवाह झाला परंतु त्या लवकरच विभक्त झाल्या.
मनात अध्यात्माची ओढ निर्माण झाल्यामुळे त्यांनी तुर्कस्तान, ग्रीस, ईजिप्त, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, भारत, जपान, जावा इ. देशांतून प्रवास केला. हिंदू व बौद्ध धर्मांतील गूढ तत्त्वांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. गूढविद्येच्या प्राप्तीसाठी त्यांनी १८५६ व १८६८ अशी दोनदा तिबेटला भेट दिली. पुढे त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व पतकरले. १८७५ साली कर्नल हेन्री स्टील ऑल्कट यांच्या सहकार्याने त्यांनी अनेरिकेत न्यूयॉर्क येथे ‘थिऑसॉफिकल सोसायटी’ची स्थापना केली. त्या स्वतः या संस्थेच्या कार्यवाह बनल्या. १८७९ साली ते भारतात आले आणि त्यांनी १८८२ साली मद्रासजवळील अड्यार येथे सोसायटीचे जागतिक केंद्र स्थापन केले. याच वर्षी श्रीमती ब्लाव्हॅट्स्की यांच्या संपादकत्वाखाली थिऑसॉफिस्ट ही पत्रिका सुरू करण्यात आली.
तिबेटमधील काही महात्म्यांकडून आपल्याला संदेश मिळतो, असा त्यांचा दावा होता. त्या वेगवेगळया प्रकारचे चमत्कारही करीत असत. परंतु ‘ लंडन सोसायटी फॉर सायकीकल रिसर्च’ या संस्थेने १८८५ साली या चमत्कारांची छाननी करून हे चमत्कार म्हणजे एक थोतांड असल्याचे जाहीर केले होते.
गूढ विद्या, विश्व व मानव यांचा संबंध इत्यादींचे विवेचन करणारे बरेचसे लेखन त्यांनी केले आहे. द सिक्रेट डॉक्ट्रिन (१८८८) हा त्यांचा ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. आयसिस अन्व्हेल्ड (१८७७), द की टू थिऑसॉफी (१८८९) आणि द व्हॉइस ऑफ द सायलेन्स (१८८९) हे त्यांचे इतर काही प्रसिद्ध ग्रंथ होत. त्यांचे लेखन कलेक्टेड रायटिंग्ज या नावाने सोळा विभागांत प्रकाशित झाले आहे. ⇨ॲनी बेझंट यांनी त्यांचे शिष्यत्व पतकरले होते. त्यांचा मृत्यू लंडन येथे झाला. त्यांचे अनुयायी त्यांची पुण्यतिथी श्वेतपद्माष्टमी म्हणून पाळतात आणि त्या दिवशी लाइट ऑफ एशिया आणि भगवद्गीता हे ग्रंथ वाचतात.
संदर्भ : 1. Symonds, J. Madame Blavatsky, London, 1959.
२. चिपळूणकर, वा. ल. काही थोरांचा अल्प परिचय, पुणे, १९६०.
साळुंखे, आ. ह.
“