ब्रोमीन: सामान्य तापमानाला व दाबाला द्रवरूप असणारे एकमेव अधातवीय मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Br आवर्त सारणीच्या [इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यांच्या कोष्टकरूप मांडणीच्या⟶ आवर्त सारणी] ७ ब गटात याचा क्रम क्लोरिनानंतर लागतो. हे ⇨ हॅलोजन गटातील असून याचे गुणधर्म क्लोरीन व आयोडीन यांच्या दरम्यानचे आहेत अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ३५ अणुभार ७९.९०९ नेहमीच्या तापमानास हे उग्र व तिखट वासाच्या, गडद तांबड्या – पिंगट रंगाच्या द्रवरूपात असते उकळबिंदू ५८.८० से. गोठणबिंदू – ७.२० सें. वि. गु. २०० से. तापमानाला ३.१२३ स्थिर समस्थानिकांचे (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचे) द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) ७९ व ८१ हे नैसर्गिक असून सम प्रमाणात आढळतात किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचे द्रव्यमानांक ७५, ७६, ७७, ७८, ८०, ८२, ८३, ८४, ८५ व ८७ विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांतील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, ७ संयुजा (इतर अणुंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) १ तथापि काही संयुगांत ती ३, ५ व ७ आढळते याचे रेणू द्वि आणवीय (दोन अणूंचा बनलेला) असतो. हे विषारी आहे. भूकवचात सरासरी एक लक्ष भागांत ०.१६ भाग ब्रोमीन आढळते.
उपस्थिती : रासायनिक दृष्ट्या हे अतिशय क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त रूपात आढळत नाही संयुगांच्या रूपात विस्तृत प्रमाणात ते विखुरलेले आहे. चांदीच्या अनेक धातुकांत (कच्च्या रूपातील धातूत) ते अल्प प्रमाणात असते. कित्येक खाऱ्या झऱ्यांच्या पाण्यांत, खनिज पाण्यांत व समुद्राच्या पाण्यांत ते सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम व कॅल्शियम यांच्या लवणांच्या रूपात असते. अटलांटिक महासागराच्या पाण्यात ब्रोमिनाचे प्रमाण ०.०६५%, मृत समुद्रात सु. ०.५६% आणि खनिज खाऱ्या पाण्यात सु. ०.०५ ते ०.३०% आढळते. श्टासफुर्ट (जर्मनी) येथील लवणसाठ्यात १% मॅग्नेशियम ब्रोमाइड आहे.
अनेक सागरी प्राणी व वनस्पती आणि मानवी मूत्र यांमध्येही काही प्रमाणात ब्रोमीन संयुगांच्या रूपात असते.
इतिहास : ए. जे. बालार यांनी १८२६ मध्ये समुद्राच्या लवणशेषातून (समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन करून लवणांचे स्फटिक अलग करून उरणाऱ्या द्रव पदार्थातून) क्लोरीन प्रवाहित केले व मुक्त झालेले ब्रोमीन ऊर्ध्वपातनाने (बाष्प करून व ते थंड करून मिश्रणातील घटक अलग करण्याच्या क्रियेने) वेगळे काढले. याच विक्रियेने परंतु स्वतंत्रपणे हायडल्बर्ग येथील कार्ल लोविग यांनी १८२५ मध्ये ब्रोमीन मुक्त करून नंतर ऊर्ध्वपातनाऐवजी ईथर या विद्रावकाचा (विरघळविणाऱ्या द्रवाचा) उपयोग करून वेगळे काढले होते. तथापि ब्रोमीन हे एक नवीन मूलद्रव्य आहे हे बालार यांच्या कार्याचे निष्कर्ष प्रसिद्ध होण्यापूर्वी लोविग यांनी सिद्ध केले नव्हते व त्यामुळे ब्रोमिनाच्या शोधाचे श्रेय बालार यांनाच दिले जाते. दुर्गंध या अर्थाच्या bromos या ग्रीक शब्दावरून त्यांनीच त्याला ब्रोमीन हे नाव दिले. श्टासफुर्ट लवणसाठ्यांचा शोध लागेपावेतो १८५८ पर्यंत ब्रोमीन मिळविण्यासाठी बालार यांची पद्धतच वापरली जात असे.
लवणशेषाऐवजी प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यापासून ब्रोमीन मिळविण्याची पद्धत १९३४ च्या सुमारास प्रचारात आली. या सुमारास खनिज तेलामध्ये मिसळण्यासाठी एथिलीन ब्रोमाइड या संयुगाची मागणी वाढू लागल्यामुळे त्याच्या निर्मितीसाठी जास्त ब्रोमिनाची गरज भासू लागली आणि ती भागविण्याच्या प्रयत्नामुळेच या पद्धतीचा विकास झाला.
निर्मितीच्या पद्धती : लवणशेष किंवा खाऱ्या जलाशयांचे पाणी एका पोकळ मनोऱ्याच्या मध्यातून तुषाराच्या रूपात खाली सोडले जाते. ब्रोमीन क्षरणकारी (रासायनिक विक्रियेद्वारे इतर पदार्थांना झिजविणारे) असल्यामुळे मनोरा क्षरणरोधी मातीचा उपयोग करून बांधलेला असतो. मनोऱ्याच्या तळातून क्लोरीनयुक्त पाण्याची वाफ वर जाईल अशी योजना केलेली असते. त्यामुळे रासायनिक विक्रिया होते व खाऱ्या पाण्यातील ब्रोमाइडाचे अपघटन होऊन (घटक द्रव्ये अलग होऊन) मुक्त झालेले ब्रोमीन, वाफेत मिसळलेल्या रूपात बाहेर पडते. मिश्रण थंड केले म्हणजे ब्रोमीन व पाणी यांचे थर वेगवेगळे होतात. ब्रोमिनाचा थर काढून घेतात व पाण्याचा थर, त्यात काही प्रमाणात राहिलेले ब्रोमीन मिळविण्यासाठी परत मनोऱ्यात पाठवितात. येथे घडून येणारी रासायनिक विक्रिया पुढीलप्रमाणे असते.
MgBr2 + Cl2 ⟶ Mgcl2 + Br2
मॅग्नेशियम क्लोरीन मॅग्नेशियम ब्रोमीन
ब्रोमाइड क्लोराइड
अशुद्ध ब्रोमीन नंतर शुद्ध करतात.
प्रत्यक्ष समुद्राच्या पाण्यापासून ब्रोमीन मिळविण्याच्या पद्धतींतील तत्त्वे हीच आहेत परंतु तपशिलात काही फरक आहेत. उदा., एका पद्धतीत समुद्राचे पाणी गाळून स्वच्छ करतात आणि हायड्रोक्लोरिक व सल्फ्यूरिक अम्लाच्या मिश्रणाने अम्लधर्मी बनवितात. हे अम्ल मिश्रण या उत्पादन प्रक्रियेतच तयार झालेले असते. त्यानंतर ते वरील प्रकारच्या मनोऱ्यातून खाली सोडतात आणि त्याच वेळी तळातून वर जात असलेल्या क्लोरीनमिश्रित हवेच्या प्रवाहाशी त्याचा संपर्क घडवून आणतात. वर दिल्याप्रमाणेच रासायनिक विक्रिया होऊन ब्रोमीन निर्माण होते आणि ते व हवा यांचे मिश्रण तयार होते. हे मिश्रण नंतर दुसऱ्या एका मनोऱ्याच्या तळातून वर जाऊ देतात. येथे सल्फर डाय-ऑक्साइड मिश्रित पाण्याचा प्रवाह मनोऱ्यात वरून खाली पडत असतो. त्याच्याबरोबर ब्रोमिनाची विक्रिया होते आणि हायड्रोब्रोमिक अम्ल व सल्फ्यूरिक अम्ल यांचे मिश्रण तयार होऊन ते तळाशी जमा होते. ते दुसऱ्या विक्रिया संचात घेतात व त्यावर पुन्हा क्लोरिनाची विक्रिया घडवितात त्यामुळे ब्रोमीन मुक्त होते. ते वाफेच्या प्रवाहाने वरील पद्धतीत वर्णन केल्याप्रमाणेच वेगळे करतात आणि नंतर शुद्ध करतात.
Br2 + SO2 + 2H2O ⟶ 2HBr + H2SO4
ब्रोमीन सल्फर डाय पाणी हायड्रोब्रोमिक सल्फ्यूरिक अम्ल
ऑक्साइड अम्ल
2HBr + Cl2 ⟶ 2HCl + Br2
हायड्रोब्रोमिक क्लोरीन हायड्रोक्लोरिक ब्रोमीन
अम्ल अम्ल
दुसऱ्या एका पर्यायी प्रक्रियेत वरीलप्रमाणेच प्रथम मुक्त रूपात आलेले ब्रोमीन सोडियम कार्बोनेटाच्या विद्रावातून प्रवाहित करतात. त्यामुळे खाली दिलेली रासायनिक विक्रिया होऊन सोडियम ब्रोमाइड आणि सोडियम ब्रोमेट यांचे मिश्रण बनते. नंतर त्यावर सल्फ्यूरिक अम्लाची विक्रिया केली म्हणजे ब्रोमीन मुक्त होते. ते वाफेच्या
प्रवाहाने वरीलप्रमाणेच काढून घेतात व ऊर्ध्वपातनाने शुद्ध करतात.
3Na2CO3 + 3Br2 ⟶ 5NaBr + NaBrO3 + 3CO2
सोडियम ब्रोमीन सोडियम सोडियम कार्बन डाय
कार्बोनेट ब्रोमाइड ब्रोमेट ऑक्साइड
5NaBr + NaBrO3 + 3H2SO4 ⟶ 3Na2SO4 + 3Br2 + 3H2O
सोडियम सोडियम सल्फ्यूरिक सोडियम ब्रोमीन पाणी
ब्रोमाइड ब्रोमेट अम्ल सल्फेट
शुद्धीकरण : ऊर्ध्वपातनाने मिळविलेल्या ब्रोमिनात क्लोरिनाची अशुद्धी असल्यास फेरस ब्रोमाइड किंवा कॅल्शियम ब्रोमाइड त्यात मिसळून ऊर्ध्वपातन करतात. कोरडे ब्रोमीन मिळविण्यासाठी संहत सल्फ्यूरिक अम्ल त्यात मिसळून ऊर्ध्वपातन करतात.
गुणधर्म : ईथर, कार्बन डाय-सल्फाइड, क्लोरोफॉर्म व ॲसिटिक अम्ल यांत ब्रोमीन विरघळते. पाण्यात त्याची विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) २०० से. तापमानास, १०० ग्रॅम पाण्यात ३.२ ग्रॅम आहे. पोटॅशियम ब्रोमाइड पाण्यात मिश्र केल्यास KBr3 हे जटिल (गुंतागुंतीची संरचना असलेले) संयुग बनल्याने त्याची विद्राव्यता वाढते.
याच्या रासायनिक विक्रिया सामान्यपणे क्लोरिनाच्या विक्रियांसारख्याच परंतु कमी तीव्र आहेत. [⟶ क्लोरीन].
गंधक, फॉस्फरस, आर्सेनिक, जस्त, कथिल व इतर धातू यांवर याची विक्रिया होऊन ब्रोमाइडे तयार होतात. पाण्याशी ब्रोमिनाची विक्रिया क्लोरिनाइतकी सहज होत नाही परंतु ⇨ऑक्सिडीभवन होईल असा पदार्थ उपस्थित असेल, तर हायड्रोब्रोमिक अम्ल निर्माण होते आणि ऑक्सिजन मुक्त होतो. त्यामुळे ब्रोमिनाचा जलीय विद्राव सौम्य विरंजक (रंग नाहीसा करणारा) आहे.
क्षारांच्या(अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या संयुगांच्या) जलीय विद्रावाबरोबर होणाऱ्या विक्रियांनी ब्रोमाइडे आणि ब्रोमेट यांचे मिश्रण मिळते कारण प्रथम बनणारे हायपोब्रोमाइट हे अस्थिर असते.
3Br2 + 6 KOH ⟶ 5K Br + K BrO3 + 3 H2O
ब्रोमीन पोटॅशियम पोटॅशियम पोटॅशियम पाणी
हायड्रॉक्साइड ब्रोमाइड ब्रोमेट
ब्रोमीन ऑक्सिडीकारक असल्यामुळे त्याची विक्रिया होऊन सल्फ्यूरस अम्लाचे रूपांतर सल्फ्यूरिक अम्लात होते. तसेच पोटॅशियम आयोडाइडामधील आयोडीन, हायड्रोजन सल्फाइडामधील गंधक व अमोनियामधील नायट्रोजन ब्रोमिनाच्या क्रियेने मुक्त रूपात येतात.
कार्बनी संयुगावर ब्रोमिनाची विक्रिया तीन प्रकारे होते. (१) असंतृप्त (ज्यांतील कार्बन अणूंमध्ये दुहेरी वा तिहेरी बंध असल्याने ज्यांत इतर अणूंचा वा अणुगटांचा समावेश सहजपणे होऊ शकतो अशा) संयुगांशी ते समावेशनाने संयोग पावते. उदा.,
CH2 = CH2 + Br2 ⟶ CH2Br – CH2Br
एथिलीन ब्रोमीन एथिलीन डायब्रोमाइड
(२) संतृप्त संयुगांमधील हायड्रोजनाचे त्याने प्रतिष्ठापन (एका अणूच्या जागी अन्य अणू वा अणुगट येणे) होते. उदा.,
R – CH3 – CH3 + Br2 ⟶ R – CHBr – CH3 + HBr
संतृप्त संयुग ब्रोमीन ब्रोमीन प्रतिष्ठापित संयुगे
(R = अल्किल गट)
(३) आल्डिहाइड इ. ऑक्सिडीकरण होईल अशा संयुगांचे ऑक्सिडीकरण होते. उदा., आल्डिहाइडाचे अम्ल बनते.
R – CHO + Br2 + H2O ⟶ R – COOH + 2 HBr
आल्हिडाइड ब्रोमीन पाणी अम्ल हायड्रोब्रोमिक अम्ल
संयुगे : हायड्रोक्लोरिक अम्ल : हायड्रोजन आणि बाष्परूप ब्रोमीन यांचे मिश्रण प्लॅटिनम या उत्प्रेरकाच्या (विक्रियेत स्वतः भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या पदार्थांच्या) उपस्थितीत तापविले म्हणजे हे अम्ल बनते. प्रयोगशाळेत याची निर्मिती तांबडा फॉस्फरस व पाणी यांच्या मिश्रणावर ब्रोमीन थेंब थेंब सोडून करतात. प्रथम फॉस्फरसांची ब्रोमाइडे (PBr3 व PBr5) बनतात आणि त्यांचे जलीय विच्छेदन (पाण्याच्या विक्रियेने घटक अलग होण्याची क्रिया) होऊन हायड्रोब्रोमिक अम्ल तयार होते.
PBr3 + 3H2O ⟶ H3PO3 + 3HBr
फॉस्फरस ट्राय ब्रोमाइड पाणी फॉस्फरस अम्ल हायड्रोब्रोमिक अम्ल
PBr3 + 4H2O ⟶ H3PO4 + 5HBr
फॉस्फरस पेंटाब्रोमाइड पाणी फॉस्फोरिक अम्ल हायड्रोब्रोमिक अम्ल
हायड्रोब्रोमिक अम्ल वर्णहीन, तिखट वासाचे व हवेत वाफाळणारे आहे. ते ०० से. तापमानास १ मिलि. पाण्यात ६०० मिलि. इतके विपुल विरघळते.
जस्त, लोखंड, तांबे इ. धातू यात विरघळून त्यांची ब्रोमाइडे बनतात आणि हायड्रोजन वायू मुक्त होतो. धातूंची ऑक्साइडे, हायड्रॉक्साइडे आणि कार्बोनेटे यांवर या अम्लाची विक्रिया होऊनही ब्रोमाइडे बनतात.
सिल्व्हर ब्रोमाइड व पोटॅशियम ब्रोमाइड यांचा उपयोग छायाचित्रणात होतो. सोडियम, पोटॅशियम व अमोनियम यांच्या ब्रोमाइडांचा उपयोग औषधात शामके (केंद्रीय मज्जा संस्थेवर शांतिकारक परिणाम घडवून आणणारी द्रव्ये) म्हणून केला जातो.
ऑक्सि-अम्ले : हायपोब्रोमस (HOBr) आणि ब्रोमिक अम्ल (HBrO3) ही ब्रोमिनाची ऑक्सि-अम्ले होत. हायपोब्रोमस अम्ल अस्थिर आहे. ब्रोमेटे (ब्रोमिक अम्लाची लवणे) तापविली असता वेगवेगळ्या प्रकारे अपघटन पावतात परंतु क्लोरेटे तापविली असता परक्लोरेटे बनतात, तशी ब्रोमेटापासून परब्रोमेटे मात्र बनत नाहीत.
ऑक्साइडे : ब्रोमीन मोनॉक्साइड (Br2O), ब्रोमीन डायऑक्साइड (BrO2) आणि ब्रोमीन ट्राय ऑक्साइड (Br2O3) ही ब्रोमिनाची ऑक्साइडे ज्ञात आहेत.
ब्रोमीन हॅलाइडे : इतर हॅलोजनांबरोबर संयोग होऊन ब्रोमिनाची हॅलाइडे बनतात, उदा., BrF, BrF3 व BrF5 ही ब्रोमोफ्ल्युओराइडे, Brcl हे ब्रोमोक्लोराइड आणि BrI हे ब्रोमोआयोडाइड. ब्रोमोक्लोराइड हे संयुग क्लोरिनापेक्षा पाण्यात जास्त विद्राव्य आणि जास्त प्रभावी जंतुनाशक आहे आणि सांडपाणी व वाहितमल यांमध्ये जंतूंचा नाश करण्यासाठी त्याचा उपयोग करणे जलप्रदूषणाच्या दृष्टीनेही हितकारक ठरेल, असे आधुनिक संशोधनात निष्पन्न झाले आहे.
कार्बनी संयुगे : एथिलीन डायब्रोमाइड हे एक महत्त्वाचे कार्बनी संयुग असून ते एथिलिनावर ब्रोमिनाची समावेशक विक्रिया होऊन बनते. प्रत्याघाती पदार्थ (ठिणगी प्रज्वलन एंजिनात विस्फोट वा ठोके निर्माण होण्यास प्रतिरोध करणारा पदार्थ) म्हणून पेट्रोलात टेट्रा एथिल-लेड हे संयुग मिसळतात. मोटारीच्या एंजिनात इंधनाचे ज्वलन झाले म्हणजे त्यापासून शिसे निर्माण होते. ते एंजिनात साठले, तर अनिष्ट परिणाम होतो. तो टाळावा यासाठी पेट्रोलात एथिलीन डायब्रोमाइड मिसळतात. त्यांमुळे शिशाचे लेड ब्रोमाइड या बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणाऱ्या) संयुगात रूपांतर होते व ते निष्कास वायूंबरोबर बाहेर पडते. मिथिलीन क्लोरोब्रोमाइड हे संयुग अग्निशामक द्रव म्हणून विमाने व इतर वाहनात उपयोगी पडते. ब्रोमोफॉर्म आणि ॲसिटिलीन टेट्राब्रोमाइड मापन योजनांमध्ये वापरतात. मिथिल ब्रोमाइड शेतजमिनीतील कीटक व तणबीजे नष्ट करण्यासाठी उपयोगी पडते. मिथिल अल्कोहॉल व हायड्रोब्रोमिक अम्ल यांच्या रासायनिक विक्रियेने तयार होते. टेट्राब्रोमोबिस्फिनॉल-ए ज्वालाप्रतिरोधक म्हणून एपॉक्सी रेझिनांमध्ये वापरतात. काही कार्बनी ब्रोमो संयुगे उदा., N – ब्रोमोसक्सिलिमाइड, विशेष प्रकारची विक्रियाकारके म्हणून व काही संयुगे संश्लेषणात (घटक एकत्र आणून कृत्रिम रीतीने संयुगे बनविण्याच्या प्रक्रियेत) मध्यस्थ पदार्थ म्हणून उपयोगी पडतात.
अभिज्ञान: (अस्तित्व ओळखणे). तापविल्याने ब्रोमिनाची तांबड्या रंगाची वाफ होते व त्यावरून त्याचे अभिज्ञान होते. तथापि नायट्रोजन पेरॉक्साइड वायूचा रंगही तसाच आहे. म्हणून ती वाफ ब्रोमिनाचीच आहे याची खात्री करून घेण्यासाठी ती पाण्यातून प्रवाहित करतात व नंतर त्या पाण्यात कार्बन डायसल्फाइड मिसळून हलवितात. कार्बन डायसल्फाइडला तांबडा रंग आला, तर ब्रोमिनाचे अस्तित्व सिद्ध होते. विद्रावातील ब्रोमिनाचे घनफळात्मक मापन करण्यासाठी विद्रावात अतिरिक्त पोटॅशियम आयोडाइड मिसळतात. आयोडीन मुक्त रूपात येते. त्याचे मापन ज्ञातमूल्य सोडियम थायोसल्फेटाने करून आकडेमोडीने विद्रावातील ब्रोमिनाचे वजन ठरविता येते.
उपयोग : मूलद्रव्य रूपातील ब्रोमीन मुख्यतः एथिलीन डायब्रोमाइड बनविण्यासाठी वापरले जाते. एखाद्या रेणूत ब्रोमीन समाविष्ट करून व नंतर त्याचे प्रतिष्ठापन करून जटिल संयुगे तयार करणे सुलभ असल्यामुळे कार्बनी रासायनिक संश्लेषणामध्ये त्याचा उपयोग केला जातो. रासायनिक विश्लेषणात एक विक्रियाकारक म्हणून आणि काही ऑक्सिडीकरण विक्रियांत ब्रोमीन उपयोगी पडते. रंगधंद्यातही त्याचा उपयोग होतो. विरंजनात, निर्जंतुकीकरणात, संचायक विद्युत् घटांत, आग विझवणाऱ्या द्रव्यांचे बाष्पीभवन करण्यासाठी, प्रशीतनक, विद्रावक व वातानुकूलन इत्यादींसाठी ब्रोमीन आणि त्याची संयुगे वापरण्यात येतात.
वापरण्यातील धोके : डोळे, नाक व घसा यांच्या श्लेष्मल (बुळबुळीत) आवरणावर ब्रोमिनाचा अनिष्ट परिणाम होतो. याच्या संपर्काने त्वचा भाजते व जखमा होतात म्हणून हे वापरताना फार खबरदारी घ्यावी लागते. एक लक्ष भाग (घनफळाच्या) हवेत ५० ते १०० भाग ब्रोमीन असेल, तर जीवास त्वरित धोका संभवतो. हेच प्रमाण एक लक्ष भागात ०.१ भागापेक्षा कमी असलेल्या हवेत ८ तास श्वसन करणे सुरक्षित असते. म्हणून ब्रोमीन वापरणाऱ्या कारखान्यातील हवेत ब्रोमीनाचे प्रमाण सुरक्षित मर्यादेबाहेर जाणार नाही अशी काळजी घेतली जाते. त्वचा आणि डोळे यांचा ब्रोमिनाशी संपर्क होणार नाही अशा दृष्टीनेही योजना केलेल्या असतात.
साठवण : ब्रोमीन बाटल्यात, मोनेल मिश्रधातूच्या ड्रममध्ये, तसेच निकेल व शिसे यांचे आतून आवरण असलेल्या मोठ्या टाक्यांत साठवितात. टँटॅलमाखेरीज सर्व धातूंच्या बाबतीत आर्द्र ब्रोमीन क्षरणकारी आहे. शुष्क (एक लक्ष भागांत २ वा त्या पेक्षा कमी भाग पाणी असलेल्या) ब्रोमिनाचा कोठी तपमानाला (सर्वसाधारण तापमानाला) मोनेल, निकेल व शिसे यांवर मूलतः क्षरणकारी परिणाम होत नसल्याने या धातूंच्या पात्रात ब्रोमीन ठेवता येते. तथापि शुष्क ब्रोमीन हवेतील आर्द्रता चटकन शोषून घेत असल्याने धातवीय पात्र वापरावयाचे झाल्यास त्यात हवा शिरणार नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक असते. पोलादाची व अगंज (स्टेनलेस) पोलादांची पात्रे ब्रोमीन साठविण्यास असमाधानकारक आहेत.
उत्पादन : ब्रोमिनाचे उत्पादन प्रामुख्याने अमेरिकेतील मिशिगन, ओहायओ, प. व्हर्जिनिया व कॅलिफोर्निया या राज्यांत, यूरोपमध्ये जर्मनी व फ्रान्स या देशांत आणि पॅलेस्टाइनमध्ये मृत समुद्राच्या लवणशेषापासून केले जाते.
भारतात टाटा केमिकल्स, मीठापूर (उत्पादनक्षमता ४७५ टन प्रतिवर्षी), हिंदुस्थान सॉल्ट लि., खाराघोड (उत्पादन क्षमता १५० टन प्रतिवर्षी) व ब्रोम्खो प्रा. लि., कांडला (उत्पादनक्षमता ५० टन प्रतिवर्षी) हे कारखाने ब्रोमीन व ब्रोमीन संयुगाचे उत्पादन करतात. याशिवाय ध्रांगध्रा केमिकल वर्क्स, ध्रांगध्रा कच्छ सॉल्ट अँड अलाइड इंडस्ट्री, कांडला आणि सौराष्ट्र सॉल्ट वर्क्स, पोर्ट ॲल्बर्ट व्हिक्टर हे आणखी तीन कारखाने उभारण्यात येत आहेत. टाटा केमिकल्स, मीठापूर येथे १९७० – ७१ मध्ये २४४ टन ब्रोमीन व २१३ टन ब्रोमाइडे, १९७५ – ७६ मध्ये ४३९ टन ब्रोमीन व १३५ टन ब्रोमाइडे तयार झाली. भारतात १९६९ – ७० मध्ये ६.८ टन ब्रोमाइडे व २०१.७९ टन ब्रोमीन, ७६ – ७७ मध्ये १३.३ टन ब्रोमाइडे व सु. ३०४ टन ब्रोमीन आणि १९७८ – ७९ मध्ये ११४.९ टन ब्रोमीन यांची आयात करण्यात आली. भारतातून ब्रोमिनाची निर्यात होत नाही.
संदर्भ : 1. Faith, W. L. Keyos, D. B. Clark, R. L. Industrial Chemicals, London, 1957.
2. Jolles, Z. E. Bromine and Its Compounds, London, 1966.
3. Parkes, G. D., Ed. Mellor’s Modern Inorganic Chemistry, London, 1961.
4. Partington, J. R. General and Inorganic Chemistry, New York, 1966.
मिठारी, भू. चिं.
“