ब्रूसाइट: खनिज स्फटिक समांतर षट्फलकीय. सामान्यतः याचे प्रचिनाकार जाड व चापट वडीसारखे स्फटिक आढळतात. हे एक मृद्-खनिज असून याच्यावरून मृद्-खनिजांच्या संरचनात्मक एककाला ‘ब्रूसाइट पत्रक’ असे म्हणतात [⟶ स्फटिकविज्ञान मृद्-खनिजे]. थरयुक्त पुंजक्यांच्या, पत्रित व तंतुमय (नेमॅलाइट) रुपांतही हे आढळते. याचे तंतू व पत्रे सहज अलग वा सुटे होऊ शकतात पत्रे नम्य (लवचिक) तर तंतू स्थितिस्थापक (लावलेली प्रेरणा काढून घेतली असता मूळ स्थिती प्राप्त करून घेण्याचा गुणधर्म असलेले) असतात. ⇨ पाटन (०००) चांगले. मऊ व छेद्य (सहज कापता येण्यासारखे). कठिनता २.५ वि. गु. २.३८-२.४०. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक मेणासारखी ते काचेसारखी पाटनपृष्ठाची मोत्यासारखी व तंतूंची रेशमासारखी. रंग पांढरा, कधीकधी करडा, निळा, हिरवा. रा. सं. Mg(OH)2 बऱ्याचदा यात थोडे लोह व मँगनीज असते. हे सहजपणे वितळत नाही. हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते. बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडून हे सुचूर्ण्य (सहज भुगा होईल असे) व अपारदर्शक बनते. हे बहुधा रूपांतरित (दाब व तापमान यांच्या परिणामांमुळे बदल) झालेले चुनखडक व डोलोमाइट, सर्पेटाइन, सर्पेटाइनास छेदणाऱ्या शिरा व कधीकधी फिलाइट, सुभाजा (सहज भंग पावणारा रूपांतरित खडक) इ. खडकांमध्ये सर्पेटाइन, डोलोमाइट, मॅग्नेसाइट, क्रोमाइट व मॅग्नेशियमाची इतर खनिजे यांच्याबरोबर आढळते. हे मॅग्नेशियम सिलिकेटाचे अपघटन (मोठ्या रेणूचे लहान रेणूंत तुकडे) होऊन, पेरिक्लेजावर (Mgo) पाण्याची क्रिया होऊन किंवा डोलोमाइटाचे रूपांतरण होऊन तयार होते. इटली, अमेरिका, रशिया (उरल), स्वीडन, शेटलंड बेटे, कॅनडा इ. प्रदेशांत हे आढळते. उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) पदार्थांत आणि मॅग्नेशिया (Mgo), मॅग्नेशियम इ. मिळविण्यासाठी याचा उपयोग होतो. ऑर्चिबॉल्ड ब्रूस (१७७७-१८१८) या अमेरिकन खनिजवैज्ञानिकांनी या खनिजाचे १८१४ साली प्रथम वर्णन केल्यामुळे त्यांच्या नावावरून याला ब्रूसाइट हे नाव पडले.

पहा : मॅग्नेशियम.

ठाकूर, अ. ना.