ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याची राजधानी व प्रमुख बंदर. लोकसंख्या १०,२८,९०० (१९८० अंदाज). हे टेलर पर्वताच्या दक्षिण उतारावर, मॉर्टन उपसागरास मिळणाऱ्या ब्रिस्बेन नदीमुखापासून आत २२ किमी. वर तिच्या दोन्ही तीरांवर वसलेले आहे. राज्याचे प्रमुख प्रशासकीय, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र म्हणून हे विशेष प्रसिद्ध आहे. हे लोहमार्ग, रस्ते यांचे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ब्रिस्बेनचे जलवाहतुकीतही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जॉन ऑक्स्ली याने या भागाचे १८२३ मध्ये समन्वेषण केले व १८२४ मध्ये या ठिकाणी कैद्यांचे ठाणे उघडण्यात आले. १८३४ मध्ये या वसाहतीत न्यू साउथ वेल्स वसाहतीचा तत्कालीन गव्हर्नर सर टॉमस मॅक्डूगॅल ब्रिस्बेन याचे नाव देण्यात आले. १८४२ नंतर येथील नागरी वस्ती वाढत गेली. १८५९ पर्यंत हे न्यू साउथ वेल्समध्ये समाविष्ट होते, परंतु नंतर हे क्वीन्सलँडमध्ये समाविष्ट होऊन राज्याची राजधानी बनले. दुसऱ्या महायुद्धकाळात दोस्त राष्ट्रांचे एक प्रमुख ठाणे म्हणून ब्रिस्बेनला महत्व होते. महायुद्धोत्तर काळात उद्योगधंदे, व्यापार इत्यादींमुळे याची प्रगती झाली.
राज्यातील ५०% निर्यात येथून होते. तीमध्ये प्रामुख्याने लोकर, साखर, दुग्धपदार्थ, मांस, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ इत्यादींचा समावेश असून आयातीत ट्रॅक्टर, वाहने, उपकरणे, यंत्रसामग्री इत्यादींचा अंतर्भाव होतो. मूनी तेलक्षेत्राशी हे नळाने जोडण्यात आलेले असून, येथील खनिज तेलशुद्धीकरण व्यवसाय महत्त्वाचा आहे. तसेच जहाजबांधणी, रसायने, खते, यंत्रसामग्री, रबर वस्तू, सिमेंट इ. उद्योगांचाही येथे विकास झालेला आहे. आसमंतातील शेतमालाची एक जंगी बाजारपेठ म्हणून ब्रिस्बेन प्रसिद्ध आहे.
क्वीन्सलँडचे ब्रिस्वेन हे प्रमुख शैक्षणिक केंद्र असून, क्वीन्सलँड विद्यापीठ (स्था. १९०९) विशेष उल्लेखनीय आहे. शहरात नगरभवन, संसदभवन (१८५९), क्वीन्सलँड म्यूझीयम, कलावीथी (१८९५), अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीड्रल, बोवेन पार्क, व्हिक्टोरीया पार्क इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.
गाडे, ना.स.
“