ब्राँटी, एमिलीः (३० जुलै १८१८-१९ डिसेंबर१८४८). इंग्रजी साहित्याच्या इतिहासात कादंबरीलेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तीन ब्राँटी भगिनींपैकी मधली. ब्राँटी घराणे मूळचे आयर्लंडमधले. ब्राँटी भगिनींचे वडील पॅट्रिक ब्राँटी ह्यांचा जन्म आयर्लंडमधला. तथापि केंब्रिजच्या सेंट जॉन कॉलेजात त्यांनी शिक्षण घेतले आणि पदवीधर झाल्या -नंतर ( १८०६) अँग्लिकन चर्चमध्ये ते एक मिनिस्टर(एक धर्माधिकारपद) झाले. १८१२ मध्ये मारिआ ब्रॅनवेल हिच्याशी त्यांचा विवाह झाला. ह्या दांपत्याला मारिआ, एलिझाबेथ, शार्लट, पॅट्रिक ब्रॅनवेल, एमिली जेन आणि ॲन अशी सहा अपत्ये झाली. मारिआचा अपवाद वगळता ह्या साऱ्यांचे जन्म यॉर्कशरमधील थॉर्नटन येथे झाले. १८२१ मध्ये ह्या भावंडांची आई निधन पावली. त्यानंतर तीन वर्षांनी मारिआ, एलिझाबेथ, शार्लट आणि एमिली ह्या चार बहिणींना कौअन ब्रिज येथे त्या वेळी नव्यानेच निघालेल्या ‘क्लर्जी डॉटर्स स्कूल’ ह्या निवासी शाळेमध्ये दाखल करण्यात आले. ह्या शाळेतील अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि अन्य प्रकारच्या दुःस्थितीमुळे मारिआ व एलिझाबेथ ह्या दोन बहिणी निधन पावल्या, असे म्हटले जाते. ह्या दुर्घटनांनंतर शार्लट आणि एमिली ह्यांना त्या शाळेतून काढून घेण्यात आले. ब्राँटी भगिनींपैकी शार्लट हिने लिहिलेल्या जेन आयर ह्या कादंबरीत ह्या शाळेचे वर्णन आलेले आहे. ह्या वर्णनाला आक्षेप घेण्यात आला होता ती बाब वादग्रस्त ठरली होती. ब्राँटी कुटुंबातील मुलांना मित्रमैत्रिणी नव्हत्या ती परस्परांच्या संगतीतच वाढली. कल्पनेत रमण्याची त्यांची प्रवृत्ती होती तीच वाङ्मयनिर्मितीच्या आकांक्षेत परिणत झाली. शार्लट, एमिली आणि ॲन ह्या तिघींनी आपल्या नावांच्या आद्य वर्णाच्या आधारे करर बेल, एलिस बेल आणि ॲक्टन बेल अशी टोपण नावे घेऊन आपल्या कवितांचा एक संग्रह प्रसिद्ध केला होता (१८४६). स्त्रियांचे लेखन म्हणून आपल्या कवितांचा उपहास होईल, अशी शंका आल्यामुळे पुरुषी वळणाची ही टोपण नावे त्यांनी घेतली होती. ह्या काव्यसंग्रहातील एमिलीच्या उत्कट, भावगेय कवितांतून एका समर्थ व्यक्तिमत्वाचा प्रत्यय येतो. हा काव्यसंग्रह यशस्वी ठरला नाही. तथापि पुढे कादंबरीलेखिका म्हणून ह्या तीन बहिणींना लौकिक प्राप्त झाला.
एमिलीने वदरिंग हाइट्स (१८४७) ही एकमेव पण आजही श्रेष्ठ गणली जाणारी कादंबरी लिहिली. हीथक्लिफ हा अर्नशॉ कुटुंबात वाढलेला एक अनाथ मुलगा आणि अर्नशॉ पतिपत्नींची कन्या कॅथरिन ह्यांच्या प्रीतीची ही कथा. वदरिंग हाइट्स हे अर्नशॉ कुटुंबाच्या निवासस्थानाचे नाव. कॅथरिनने हीथक्लिफवर उत्कटपणे प्रेम करणे, नंतर एडगर लिंटन नावाच्या अन्य तरुणाकडे आकर्षित होणे, त्या तरुणाशी तिचा होणारा विवाह, त्यामुळे हीथक्लिफच्या मनात निर्माण होणारी सूडभावना, एडगर लिंटनबरोबर विवाह झाल्यानंतरही कॅथरिनच्या मनात हीथक्लिफबद्दल असलेली ओढ, हीथक्लिफने सूडापोटी केलेली निष्ठुर कृत्ये, कॅथरिनचा आजाराने मृत्यू, वैफल्यग्रस्त हीथक्लिफने तिच्या मरणकाळी तिची भेट घेणे, त्या वेळी दोघांचे पुन्हा होणारे मनोमीलन, कॅथरिनने भूत होऊन वावरणे आणि तिच्या त्या अवस्थेतही हीथक्लिफने तिच्या भेटीसाठी तळमळत राहणे अशी वाटावळणे घेत जाणाऱ्या कथौघातून विविध स्तरांवरील मानवी विकारवासनांचा आदिम, झंझावाती संघर्ष आणि त्या संघर्षाचे वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनावर होणारे परिणाम ह्यांचे दर्शन ह्या कादंबरीत प्रत्ययकारीपणे घडविलेले आहे. नाट्यपूर्ण, काव्यात्म निवेदनशैली, लेखकाने निवेदनाच्या ओघात विविध घटनांवर भाष्य करण्याच्या प्रवृत्तीचा केलेला त्याग व कौशल्यपूर्ण रचनातंत्र ह्यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे वदरिंग हाइट्स ही समकालीन कादंबऱ्यांत वेगळी उठून दिसते. विविध अंगांनी ह्या कादंबरीचा अभ्यास आजही होत आहे. हीथक्लीफ आणि कॅथरिन ह्यांच्या ह्या प्रीतिकथेतून विविध रूपकार्थही काढले गेले आहेत. हॉवर्थ येथे क्षयाच्या विकाराने ती निधन पावली.
संदर्भः1. Dry, F. S. The Sources of Wuthering Heights, Cambridge, 1937.
2. Hatfield, C. W. Ed. The Complete Poems of Emily Jane Bronie, London, 1952.
3. Kavanagh, C. The Symbolism of Wuthering Heights, London, 1920.
4. Sanger, C. P. The Structure of Wuthering Heights, London, 1926.
5. Wise, T. J. Symington, J. A. The Brontes, 4 Vols., Oxford, 1932.
बापट, गं. वि.