ब्राझील्या : दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देशाची नूतन राजधानी. लोकसंख्या ४,११,३०५ (१९८०). रीओ दे जानेरो या पूर्वीच्या राजधानीच्या वायव्येस सु. ९७० किमी. अंतरावर टोकँटीन्स, पाराना, साऊँ फ्रॅसीश्कू व कॉरूबा या नद्यांच्या शीर्षप्रवाह भागात ब्राझील्या वसविण्यात आले. ब्राझीलमधील उत्तर दक्षिण प्रदेशांचे ऐक्य घडवून आणण्याच्या दृष्टीने देशाची राजधानी मध्यवर्ती असावी, अशी मागणी १७८९ पासून सतत करण्यात येत होती. १८८९ साली देश गणतंत्र झाल्यापासून या मागणीला विशेष जोर आला. १९५६ मध्ये गॉइआस राज्यातील फुर्मॉझ, लूझ्याना व प्लानल्तीना या वसाहतींच्या ठिकाणी एकूण १,०३६ चौ. किमी. च्या क्षेत्रावर शहराच्या बांधकामास सुरुवात झाली. २१ एप्रिल १९६० रोजी ब्राझीलच्या शोधाच्या ४६० व्या वार्षिकोत्सवदिनी ब्राझील्या ही देशाची राजधानी बनली. मध्य ब्राझीलमधील एका सपाट पठारावर सस. पासून १,०३६ मी. उंचीवर वसविलेल्या या नगरीची आखणी ल्युसीओ कोस्टा व बांधणी ओस्कार नीमाइअर या दोन प्रसिद्ध ब्राझीलियन वास्तुविशारदांनी केली. येथील हवामान उत्साहवर्धक आहे.
ब्राझील्या शहर व त्याची आठ उपनगरे मिळून ५,८१४ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या एका संघीय जिल्ह्याची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याआधी हा जिल्हा गॉइआस राज्याचा भाग होता व खाणकाम, पशुपालनासाठी हा प्रदेश प्रसिद्ध होता.
भारतातील चंडीगढप्रमाणेच योजनाबद्ध रीतीने बांधलेल्या या आधुनिक राजधानीचा आकार साधारणतः विमानासारखा आहे. जवळच बांधण्यात आलेल्या १२२ मी. उंचीच्या धरणामुळे तयार झालेल्या सरोवराने शहर तिन्ही बाजूंनी वेढलेले आहे. या विमानाकाराच्या मुख्य भागात नागरी, सांस्कृतिक, करमणूक व व्यापारी विभाग, शासकीय इमारती आहेत, तर त्याच्या पंखांच्या भागात निवासी क्षेत्र आहे. पूर्वेकडील द्वीपकल्पीय भागात ११,७०० चौ. मी. जागेवर उभारलेले संगमरवरी राष्ट्रपतिभवन अत्यंत सुंदर समजले जाते. सरोवराकाठी राजदूतावासांची मालिकाच आहे. पूर्व भागातच ‘थ्री पॉवर्स’ चौकाच्या परिसरात कार्यकारी-न्यायिक व वैधानिक अशी तीन सभागृहे आहेत. ‘नॅशनल काँग्रेस बिल्डिंग’ या संसदगृहाच्या अंतर्भागात एका प्रचंड काँक्रीट मंचावर घुमट व बशीच्या आकाराच्या दोन वास्तुरचना असून जवळच सारख्या आकाराच्या प्रत्येकी २८ मजली दोन इमारती आहेत.
आधुनिक नगररचना व उत्कृष्ट वास्तुशिल्प या दृष्टींनी या शहराचे जगभर स्वागत झाले. ब्राझीलियन लोकांच्या दृष्टीनेही ही विशेष अभिमानाची गोष्ट ठरली. शहरात सर्वत्र उत्तम रस्त्यांचे जाळे पसरले असून महामार्गाने ते बेलेम, बेलारीझाँती, फॉर्तालेझा, पोर्तू आलेग्रे, रीओ दे जानेरो, साऊँ पाउलू इ. शहरांशी जोडलेले आहे. शहरात फक्त लहान उद्योगांनाच परवानगी दिली जाते. १९६२ पासून येथे ब्राझील्या विद्यापीठ सुरू झाले. चित्रपटगृहे, क्लब व तत्सम संस्था, खेळाची मैदाने, पोहण्याचे तलाव, प्राणिसंग्रहोद्यान, आरक्षित अरण्ये इत्यादींत वाढ करून शहर व उपनगरीय भागांतील मनोरंजनाच्या सुविधा वाढविण्यात येत आहेत. सरोवर व जवळपासच्या नद्या यांमध्ये मासेमारी व नौकाविहार यांच्या सोयी आहेत. ब्राझीलमधील इतर शहरांपेक्षा येथे पोहण्याच्या तलावांची संख्या अधिक आहे.
चौधरी, वसंत
“