ब्राइट, रिचर्ड : (२८ सप्टेंबर १७८९ – १६ डिसेंबर १८५८). इंग्रज वैद्य. वृक्कशोथ (मूत्रपिंडाची दाहयुक्त सूज) या विकृतीचे त्यांनी प्रथम वर्णन केल्यावरून तिला ‘ब्राइट रोग’ असे नाव देण्यात आले होते [⟶वृक्क].
ब्राइट यांचा जन्म ब्रिस्टल येथे झाला. १८०८ मध्ये एडिंबरो विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला परंतु १८१० मध्ये सर जॉर्ज मॅकेंझी यांच्याबरोबर निसर्गवैज्ञानिक म्हणून आइसलँडच्या मोहिमेवर काही महिने गेल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. या मोहिमेचे वर्णन करणाऱ्या ट्रॅव्हल्स इन आइसलँड या पुस्तकात त्यांनी वनस्पतिविज्ञान व प्राणिविज्ञान या विषयांवर एक प्रकरण लिहिले होते. मोहिमेवरून परतल्यानंतर लंडन येथील गाईज रुग्णालय या सुप्रसिद्ध वैद्यकीय संस्थेत दोन वर्षे शिक्षण घेऊन ते एडिंबरोला गेले व १८१२ मध्ये त्या विद्यापीठाची एम्. डी. पदवी त्यांनी मिळवली. १८१४-१५ या काळात त्यांनी यूरोपातील निरनिराळ्या रुग्णालयांना भेटी देऊन तेथील वैद्यकीय प्रगतीची माहिती मिळवली. काही दिवस बर्लिन व व्हिएन्ना येथे वैद्यकाचा अभ्यासही केला. १८२० मध्ये गाईज रुग्णालयात साहाय्यक वैद्य म्हणून त्यांची नेमणूक झाली व १९२४ मध्ये त्यांना पूर्ण वैद्यपदाचा दर्जा मिळाला. रुग्णालयात काम करण्याबरोबरच उपरुग्ण वैद्यक व औषधनिघंटू हे विषय ते शिकवीत असत.
रोगलक्षणे व मरणोत्तर तपासणीत आढळणारे अंतर्गत अवयवांतील फरक यांची सांगड घालण्याचा ते नेहमी प्रयत्न करीत. पूर्वी वैद्यकीय शिक्षणात सैद्धांतिक शिक्षणावर अधिक भर असे. ब्राइट यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे रोगनिदान व रोगाबद्दलची आधुनिक संकल्पना या विषयांचा पाय घातला गेला.
ब्राइट यांच्या संशोधनाचा वृत्तांत १८२७ मध्ये रिपोर्टस् ऑफ मेडिकल केसेस या ग्रंथाच्या प्रथम खंडात प्रसिद्ध झाला. त्यामध्ये एका लेखात त्यांनी ह्रदय विकृतीत किंवा यकृत विकृतीत आढळणारे सार्वदेहिकशोफ (शरीरातील पेशीसमूहांत द्रव साचणे) हे लक्षण आणि वृक्कशोथ या विकृतीत आढळणारे तेच लक्षण यांमधील फरक स्पष्ट केला. श्वेतक मूत्रता (मूत्रातून अल्ब्युमीन हे प्रथिन बाहेर टाकले जाणे) या लक्षणाचा व वृक्कातील विकृतिविज्ञानीय बदलांचा संबंध दाखविणारे हे पहिले शास्त्रज्ञ होते. त्यांनी वर्णिलेल्या चिरकारी (दीर्घकालीन) वृक्कशोथ या विकृतीला त्यामुळे त्यांचे नाव मिळालेले आहे.
ब्राइट यांच्या संशोधनाचा आणखी वृत्तांत वरील ग्रंथाच्या दुसऱ्या खंडात १८३१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यात त्यांनी केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या [⟶ तंत्रिका तंत्र] विकृतींचे वर्णन केले होते. गाईज हॉस्पिटल रिपोर्ट्स हे नियतकालिक स्थापन करण्यात त्यांनी मोठी मदत केली. १८३६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या नियतकालिकाच्या पहिल्या खंडात उदरगुहीय अर्बुदे (उदाराच्या पोकळीत नवीन पेशींची अत्यधिक वाढ होऊन तयार होणाऱ्या व शरीरक्रियेला निरुपयोगी असणाऱ्या गाठी), ज्वर इ. विषयांवर त्यांचे लेख होते. १८४३ मध्ये गाईज रुग्णालयाचा राजिनामा देऊन त्यांनी खाजगी व्यवसाय सुरू केला. त्यांच्या काळात ते एक नावाजलेले विशेषज्ञ होते.
विकृतिविज्ञानीय शारीर (शरीररचनाशास्त्र) आणि वैद्यक या विषयांचे ते उत्तम शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. १८१८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ट्रॅव्हल्स फ्रॉम व्हिएन्ना या पुस्तकात त्यांनी स्वतः उत्तम चित्रे काढली होती. टॉमस ॲडिसन यांच्या समवेत त्यांनी लिहिलेले एलेमेंट्स ऑफ द प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन (१८३९) हे पाठ्यपुस्तक सुप्रसिद्ध आहे. ते लंडन येथे मरण पावले.
भालेराव, य. त्र्यं.