ब्रॅस्साँ, रॉबॅर : (२५ सप्टेंबर १९०७ -) फ्रेंच चित्रपटसृष्टीतील दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील एक प्रमुख चित्रपट दिग्दर्शक. जन्म फ्रान्समधील ब्रामाँ – लामॉत येथे. त्याचे बालपण पॅरिस व ओव्हेर्न्या येथे गेले. तो वाङ्मय व तत्त्वज्ञान या विषयांचा पदवीधर होता. चित्रकार व छायाचित्रकार म्हणूनही त्याने काही दिवस काम केले. सु. तीस पटकथांचे लेखन केल्यानंतर त्याने १९३४ साली लेझॉफर प्युब्लिक हा आपला पहिला चित्रपट दिग्दर्शित केला. दुसऱ्या महायुद्धात अठरा महिने युद्धकैदी म्हणून काढल्यानंतर १९४१ साली तो घरी परतला. त्यानंतर त्याने लेझांज द्युपेशे (१९४३), ले दाम द्यु बुआ द् बुलोन्य (१९४५), ल् जुर्नाल दं क्युरे द् कांपान्य (१९५१), अं काँदाने आ मॉर सॅतशापे (१९५६), पिकपॉकेट (१९५९), ल् प्रॉसॅ द् जान दार्क (१९६२), ओ आझार वाल्ताझार व मुशॅक्त (१९६६),यून फाम दूस (१९६९),कात्र नुई दं रॅव्हर (१९७१) आणि लांसलो द्यु लाक (१९७४) इ. चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
फ्रान्समधील एक प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रने क्लेअर याचा साहाय्यक म्हणूनही त्याने युद्धकाळात काम केले. ब्रॅस्साँने तुलनात्मक दृष्ट्या फारच थोड्या चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल असले, तरी चित्रपटसृष्टीतील त्याची कामगिरी फार यशस्वी आहे. ब्रॅस्साँवरील कॅथलिक धर्मतत्त्वांचा ठळक प्रभाव त्याने हाताळलेल्या धार्मिक विषयांवरून जाणवतो. वस्तुनिष्ठ चित्रण, संकलनतंत्राचा कमीत कमी वापर, वातावरणनिर्मितीसाठी नैसर्गिक ध्वनींचा उपयोग आणि शक्य तो प्रत्यक्ष स्थळी जाऊन केलेले चित्रण तसेच नव्या कलावंतांची योजना आणि पात्रांच्या अंतर्मनातील गुप्त दालने उघडी करून दाखविण्याचे कौशल्य, ही ब्रॅस्साँची काही वैशिष्ट्ये होत. द डेव्हील्स प्रोबॅब्ली (१९७६, इं. शी.) हा त्याचा नवा चित्रपट फ्रेंच युवकांच्या नैराश्यांचे चित्रण करणारा आहे. नॉत स्यूर ला सिनेमातोग्राफी (चित्रपटकलेवरील टिपणे, १९७५) या आपल्या ग्रंथात त्याने नावीन्यपूर्ण मते मांडलेली आढळतात.
बोराटे, सुधीर
“