ब्रॅग, सर (विल्यम) लॉरेन्स : (३१ मार्च १८९०-१ जुलै १९७१). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. स्फटिकांच्या आंतरिक संरचनेचे (स्फटिकांतील अणूंच्या मांडणीचे) क्ष किरणांच्या (राँटगेन किरणांच्या) साहाय्याने विश्लेषण करण्याची पद्धत त्यांनी त्यांचे वडील ⇨ सर विल्यम हेन्री ब्रॅग  यांच्या सहकार्याने विकसित केली आणि या कार्याबद्दल ब्रॅग पितापुत्रांना १९१५ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

ब्रॅग यांचा जन्म ॲडिलेड (दक्षिण ऑस्ट्रेलिया) येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण ॲडिलेडमधील सेंट पीटर्स कॉलेजात व त्यानंतर ॲडिलेड विद्यापीठात झाले. १९०८ मध्ये गणिताची पदवी संपादन केल्यानंतर ते १९०९ साली वडिलांबरोबर इंग्लंडला गेले व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये दाखल झाले. १९१२ मध्ये ते निसर्गविज्ञानाची ट्रायपॉस परीक्षा उत्तीर्ण झाले. दोन वर्षे वडिलांच्या बरोबर संशोधन केल्यावर १९१४ मध्ये ट्रिनिटी कॉलेजात निसर्गविज्ञानाचे अधिछात्र व अध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धात त्यांनी ब्रिटिश सैन्यासाठी ध्वनि परासमापनाकरिता (शत्रूच्या तोफांचे स्थान ध्वनीच्या साहाय्याने शोधून काढण्याच्या पद्धतीकरिता) तांत्रिक सल्लागार म्हणून फ्रान्स व बेल्जियम येथे काम केले. १९१९ मध्ये मँचेस्टर येथील व्हिक्टोरिया विद्यापीठात भौतिकीच्या लँगवर्दी प्राध्यापक पदावर त्यांची नेमणूक झाली व १९३७ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. त्यानंतर ते १९३७-३८ मध्ये नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे संचालक, १९३८-५३ मध्ये केंब्रिज येथे प्रायोगिक भौतिकीचे कॅव्हेंडिश प्राध्यापक आणि १९५४-६६ मध्ये रॉयल इन्सिट्यूशनचे संचालक होते.

जर्मन भौतिकीविज्ञ माक्स फोन लौए यांनी १९१२ मध्ये एका निबंधाद्वारे असे प्रतिपादन केले होते की, स्फटिकांतून क्ष किरण नेले असता स्फटिकांतील अणूंच्या नियमित मांडणीमुळे त्यांचे विवर्तन होते [क्ष किरण विखुरले जाऊन त्यांच्या तीव्रतेत बदल होतो→ क्ष किरण] आणि यावरून स्फटिक त्रिमितीय ⇨ विवर्तन जालकाप्रमाणे कार्य करतात, असे दिसून येते. या शोधामुळे क्ष किरण कणरूप असण्याऐवजी विद्युत् चुंबकीय तरंग असावेत या दृष्टिकोनाला बळकट आधार  मिळाला. तथापि त्यावेळी वडील विल्यम यांना क्ष किरण तरंग नसून कणच आहेत अशी खात्री वाटत होती आणि फोन लौए यांचे प्रतिपादन तपासून पहाण्यासाठी व क्ष किरणांच्या तरंग सिद्धांताचे खंडन करण्यासाठी क्ष किरण वर्णपटमापक (अथवा विवर्तनमापक) हे उपकरण त्यांनी तयार केले. पितापुत्रांनी १९१२ सालच्या उन्हाळ्याच्या सुटीत लौए यांच्या निष्कर्षासंबंधी बरीच चर्चा केली पण केंब्रिजला अध्ययनासाठी परतल्यावर लॉरेन्स यांची दीर्घ विचारान्ती क्ष किरण हे तरंगच असल्याची खात्री पटली. महत्त्वाचे म्हणजे फोन लौए यांनी छायाचित्रणाद्वारे मिळविलेल्या विवर्तन आकृति बंधांतील विवर्तित बिंदूंचे वितरण हे क्ष किरणांच्या गुणधर्मांमुळे नसून स्फटिकांतील अणूंच्या विशिष्ट मांडणीमुळे निर्माण झालेले आहेत, असे लॉरेन्स यांना दिसून आले. यावरून हे आकृतिबंध स्फटिकांतील अणूंची मांडणी दर्शवितात, असे त्यांनी प्रतिपादन केले. या कल्पनेच्या आधारे त्यांनी सैंधवासारख्या साध्या स्फटिकांचे विश्लेषण करून क्ष किरण हे स्फटिकांतील आणवीय प्रतलांपासून आरशाप्रमाणे परावर्तित होतात असे दाखविले. हा नियम ‘ब्रॅग नियम’ याच नावाने ओळखला जातो आणि तो तरंगलांबी मोजण्यासाठी व स्फटिकांची जालकरचना निर्धारित करण्यासाठी उपयुक्त आहे. या नियमावरच विल्यम यांनी आपल्या क्ष किरण वर्णपटमापकाची रचना केली आणि त्याच्या साहाय्याने पितापुत्रांनी अनेक स्फटिकीय पदार्थांच्या संरचनांचे विश्लेषण करून या प्रभावी तंत्राद्वारे क्ष किरण स्फटिकविज्ञानाचा पाया घातला [→स्फटिकविज्ञान]. पहिल्यामहायुद्धानंतर लॉरेन्स यांनी मँचेस्टर येथे आपल्या प्रयोगशाळेत क्ष किरण स्फटिकविज्ञानाच्या साहाय्याने सिलिकेटे, धातू व मिश्रधातू यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्याकरिता एक संशोधन केंद्र स्थापन केले. त्यानंतर त्यांनी क्ष किरण विश्लेषण हे एक साधन म्हणून विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आणि त्यामुळे हजारो अणू असलेल्या कार्बनी (जैव) रेणूंचे विश्लेषण करण्यास ते उद्युक्त झाले. यातूनच माक्स पेरूट्झ व इतरांच्या सहकार्याने त्यांनी रक्तारुण (रक्ताचा लाल रंग उत्पन्न करणारे लोहयुक्त प्रथिन हीमोग्लोबिन), ब१२ जीवनसत्व आणि डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल [→ न्यूक्लिइक अम्ले] यांच्या संरचनेसंबंधी नंतर करण्यात आलेल्या कार्याचा पाया घातला.

लंडनच्या रॉयल सोसायटीने १९२१ मध्ये त्यांची सदस्य म्हणून निवड केली. ते अमेरिकन, फ्रेंच, स्वीडिश, चिनी, डच व बेल्जियन सायंटिफिक ॲकॅडेमींचेही सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक (१९३१) व रॉयल पदक (१९४६), मिनरल सोसायटी ऑफ अमेरिकाचे रोएबलिंग पदक (१९४८), तसेच मँचेस्टर, पॅरिस, कोलोन वगैरे विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या हे बहुमान मिळाले. १९४१ मध्ये त्यांना ‘नाइट’ हा किताब देण्यात आला. त्यांनी एक्स रेज अँड क्रिस्टल स्ट्रक्चर (वडिलांबरोबर १९१५), द क्रिस्टलाइन स्टेट (१९३४), इलेक्ट्रिसिटी (१९३६), ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ मिनरल्स (१९३७) आणि क्रिस्टल स्ट्रक्चर ऑफ मिनरल्स (जी. एफ्. क्लॅरिंगबुल यांच्या बरोबर १९६५) हे ग्रंथ लिहिले. रॉयल इन्स्टिट्यूशनचे संचालक असताना विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अतिशय प्रयत्न केले व सोप्या भाषेतील वैज्ञानिक व्याख्यानांद्वारे हजारो तरुणांना मार्गदर्शन केले. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.