फेस  : द्रवाच्या किंवा घन पदार्थाच्या पातळ पटलाचे वायुसभोवार वेष्टन झाले म्हणजे बुडबुडा बनतो. असे अनेक बुडबुडे एकत्र आल्यावर त्यांच्यात समतोल निर्माण होऊन द्रव अथवा घन पटलांनी एकमेकांपासून अलग झालेल्या बुडबुड्यांची , मधाच्या पोळ्यासारखी जी सुसंबद्ध रचना बनते तिला फेस किंवा फेन म्हणतात द्रवाचे पटल  असलेल्या फेसां ना सामान्‍यतः नुसतेच फेस म्हणतात अवश्य असेल तेथे त्यांचा उल्लेख  ‘ द्रव फेस ’  असा करतात. घन पदार्थाचे पटल असलेल्या फेसांचा नामनिर्देश घन पदार्थाच्या नावापुढे फेस हा शब्द लावून करतात उदा .,  रबर – फेस ,  प्लॅस्टिक – फेस इत्यादी . ‘ फेन ’ या शब्दाला घन पदार्थाचे नाव जोडूनही कित्येकदा त्यांचा उल्लेख केला जातो उदा .,  फेन काच  [ ⟶ काच ].

  

 फेस व पायसे  [ ⟶ पायस ]  यांमध्ये काही बाबतींत साम्य आहे .  पायसांमध्ये एक द्रव हे अपस्करण माध्यम  ( ज्यात दुसरा द्रव विखुरलेल्या रूपात असतो असे सलग माध्यम )  असते व दुसरा द्रव त्यात अप स्‍कारित प्रावस्थेच्या रूपात  ( सूक्ष्म बिंदूंच्या रूपात विखुरलेला )  असतो .  फेसांमध्येही द्रव पदार्थ हेच अपस्करण माध्यम असते  पण अपस्कारित प्रावस्था वायुरूप असून तिचे प्रमाण बरेच मोठे असते . 

 फेस हा पृष्ठ रसायनशास्त्रातील  [ ⟶ पृष्ठविज्ञान ]  एक लक्षणीय आविष्कार असून त्याला सैद्धांतिक तसेच व्यावहारिक दृष्टीनेही महत्त्व आहे .  काही प्रक्रियांमध्ये  [ उदा .,  फेन – प्लवन प्रक्रिया  ( बुडबुड्यांना चिकटलेले कच्‍च्‍या रूपातील खनिजाचे वा इतर पदार्थांचे कण वेगळे करून त्याचे संकेंद्रीकरण करण्याची प्रक्रिया  ⟶ प्लवन ),  आग निवारण इ .]  फेस फार उपयोगी पडतात. काही ठिकाणी त्‍यांचे नियंत्रण करावे लागते (उदा., यांत्रिक धुलाई), तर काही ठिकाणी ते उपद्रवकारक असल्‍यामुळे त्‍यांचा नाश करावा लागतो  [ उदा., ऊर्ध्वपातन (द्रव उकळून व तयार झालेली वाफ थंड करून द्रवातील घटक वेगळे करण्याची प्रक्रिया), बाष्पीकरण इ. ]. द्रवात विरघळलेले घटक फेसाच्या योगाने वेगळे करण्याची एक पद्धतही  ( फेस – विभाजन )  माहीत झाली आहे .  घन फेसांचा उपयोग फर्निचर धंद्यात  ( उदा .,  रबर – फेस )  आणि उष्णता निरोधनासाठी  ( उदा .,  प्लॅस्टिक – फेस )  केला जातो . 

 शुद्ध द्रव पदार्थांचा फेस होत नाही  त्याचप्रमाणे संतृप्त  ( ज्यांतील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमाल आहे अशा )  विद्रावांचेही फेस बनत नाहीत .  प्रथिने ,  सॅपोनिने ,  पित्तरसातील लवणे आणि मिथिल सेल्युलोज ,  पॉलिव्हिनिल अल्कोहॉल यांसारखी बहुवारिके  ( साध्या रेणूंच्या संयोगाने तयार झालेल्या प्रचंड रेणूंनी बनलेली संयुगे )  व कित्येक ⇨ पृष्ठक्रियाकारके  ( द्रवाच्या पृष्ठभागाच्या गुणध र्मां मध्ये ठळक बदल घडवून आणणारी कार्बनी संयुगे ),  तसेच ॲल्युमिनियम स्टिअरेटासारख्या जलद्वेषी  ( पाण्यात विरघळण्यास प्रतिकूल असलेला अणुगट ज्यांत आहे अशा )  पदार्थांच्या असंतृप्त जलीय विद्रावांपासून किंवा संधारणांपासून  ( द्रवामध्ये लोंबकळत्या स्वरूपात विखुरलेल्या ,  तळाशी न बसणाऱ्या सूक्ष्म कणांनी बनलेल्या मिश्रणांपासून )  फेस तयार होतात .  कित्येक कार्बनी द्रवांच्या मिश्रणांचेही फेस बनतात .  काही कार्बनी द्रवांत पाण्याचा अंश मिश्रित असला म्हणजे त्यांचा फेस होतो  उदा .,  नायट्रोबेंझिनात सु .  ० ·१ टक्का इतके पाणी असले ,  तर त्याचा फेस तयार होतो . 

 फेसजनक द्रवात काही पदार्थ मोठ्या प्रमाणात मिसळले असता त्यांचा जास्त फेस होतो  उदा .,  लॉरिल सल्फेटाच्या विद्रावाची फेस बनण्याची क्षमता त्यात २ ते १० टक्के लॉरिल अल्कोहॉल मिसळले असता वाढते .  अशा पदार्थांना फेस – संवर्धके म्हणतात .  काही पदार्थांमुळे फेसांचे स्थैर्य  ( टिकण्याचा काल )  वाढते म्हणून त्यांना फेस – स्थिरीकारके ही संज्ञा लावतात .  विशिष्ट द्रवांसाठी विशिष्ट पदार्थच संवर्धके किंवा स्थिरीकारके म्हणून उपयोगी पडतात .

  फेस बनविण्याच्या कृती  : इष्ट द्रवात वायू समाविष्ट करून फेस निर्माण केला जातो .  त्यासाठी दोन प्रकारच्या कृती वापरल्या जातात .  पहिल्या प्रकारात एका किंवा अनेक छिद्रांमधून द्रवात वायू प्रवाहित करणे ,  द्रव व वायू एकत्र हलविणे किंवा घुसळणे ,  छिद्रे असलेली तबकडी द्रवामध्ये वरखाली करणे किंवा तत्सम यांत्रिक कृती येतात .  दुसऱ्या प्रकारामध्ये द्रवात विरघळलेला किंवा मिसळलेला पण द्रवरूपात असलेला वायू मुक्त होऊन फेस बनवील ,  अशी योजना केलेली असते  उदा .  ⇨ वायुकलिल पद्धतीत प्रोपेन ,  ब्युटेन इ .  पदार्थ वायुकलिल पात्रात ,  दाब देऊन प्रथम द्रवावस्थेमध्ये ठेवलेले असतात .  पात्राला असलेली झडप उघडल्यावर ते वायुरूप होऊन द्रवात मिसळतात व फेसयुक्त फवारा बाहेर पडतो . 

  

 छिद्रांतून वायू प्रवाहित करण्याच्या कृतीने बुडबुड्यांच्या आकारमानाचे नियंत्रण करणे सोपे पडते .  हालवून ,  ढवळून किंवा घुसळून फेस बनविला असता विविध आकारमानाचे बुडबुडे असलेला फेस बनतो . 

 आ. १. द्रवाचा निचरा न झालेल्या फेसातील बुडबुडे

 फेस अस्तित्वात आल्यावर त्यामध्ये अनेक घडामोडी होऊ लागतात .  प्रारंभी बुडबुडे गोलाकृती असून त्यांची द्रव पटले बरीच जाड  ( सु .  १,००० मायक्रॉन  १ मायक्रॉन  =  १०-६  मी.)  असतात  परंतु त्यानंतर लगेच त्यातील द्रवाचा निचरा होऊ लागतो .  फेसामध्ये अनेक बुडबुड्यांची पटले जेथे एकत्र होतात त्या प्रदेशाला प्लेटो सीमा म्हणतात .  या ठिकाणच्या द्रवाचा दाब पटलातील इतर ठिकाणच्या द्रवाच्या दाबापेक्षा कमी असतो .  त्यामुळे फेस – स्तंभाच्या पटलामधील द्रव प्लेटो सीमेकडे खेचला जातो .  त्याप्रमाणे गुरुत्वाकर्षामुळेही पटलातील द्रवाचा  निचरा होत असतो .  या कारणामुळे पटलांतील द्रव उत्तरोत्तर कमी होऊन त्यांची जाडी घटते  ( १० ते ० ·०१ मायक्रॉन )  व त्यामुळे त्याची आघात सहन करण्याची शक्तीही कमी होते .  अशा प्रकारे निचरा झाल्यावर बुडबुड्यांचा आकारही बहुपृष्ठकी  ( अनेक पृष्ठे असलेला )  होतो .  बाष्पीभवन वाढले म्हणजेही पटले त्वरेने पातळ होतात .  पटलाची जाडी काही मर्यादेपेक्षा कमी झाली म्हणजे पटलाचा भंग होतो .  या जाडीला क्रांतिक जाडी म्हणतात  परंतु याबाबतीत एकमत नाही .  कारण पटलाचा भंग होणे हे केवळ त्याच्या जाडीवर अवलंबून नसते ,  असे दिसून आले आहे .  तापमानात वाढ झाल्यास निचरा होण्याचा वेगही वाढतो .  सावकाश निचरा होणारे फेस विवक्षित क्रांतिक तापमानास त्वरित निचरा होणारे बनतात .  हे संक्रमण अकस्मात व थोड्या तापमान – मर्यादेत घडून येते आणि व्युत्क्रमी  ( उलट्या दिशेने घडून येणारे )  असते ,  असे दिसून आले आहे . 


  आ. २. द्रवाचा निचरा झालेल्या फेसातील बुडबुडे

   बुडबुड्यामधील वायूचा दाब सभोवतालच्या हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो. हे दाबाधिक्य बुडबुड्यांच्या गोलांच्या त्रिजेच्या व्यस्त प्रमाणात असते व ते पुढील समीकरणाने व्यक्त करता येते . 

 P =  2 γ /  r 

 येथे P दाबाधिक्य , γ द्रवाचा पृष्ठताण  ( द्रवाच्या पृष्ठेच क्षेत्रफळ कमीत कमी करण्याची प्रवृत्ती असणारी व पृष्ठाच्या पातळीत कार्यकारी असणारी प्रेरणा )  व  r  बुडबुड्याची त्रिज्या आहे . 

 या वस्तुस्थितीमुळे लहान बुडबुड्यातील वायुदाब मोठ्या बुडबुड्यातील वायुदाबापेक्षा जास्त असतो.  फेसामधील विविध आकारमानांचे बुडबुडे एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर व द्रवाचा निचरा होऊन पटले पातळ झाल्यावर लहान बुडबुड्यातील वायू शेजारच्या मोठ्या बुडबुड्यात विसरण  ( कमी प्रमाण असलेल्या भागात वायूच्या रेणूंचे स्थानांतरण होणे )  पावू लागतो.  त्यामुळे मोठे बुडबुडे जास्त मोठे व लहान बुडबुडे जास्त लहान होऊ लागतात आणि ही क्रिया त्यांमध्ये समतोल निर्माण होईपर्यंत चालते.  फेसनिर्मितीसाठी वापरलेली कृती,  द्रवमिश्रणातील घटक व द्रवाचा निचरा यांवर बुडबुड्यांचे आकारमान व फेसात झालेले त्यांचे वितरण अवलंबून असते.

 बुडबुड्यांचा पटलांचा भंग झाला म्हणजे फेस नाहीसा होतो .  द्रवाचा निचरा होऊन केवळ जाडी कमी झाल्यामुळे मात्र पटले भंग पावत नाहीत ,  हे वर आलेच आहे .  पटले अभंग राहण्याची कारणे अनेक आहेत .  काही पटले पातळ असली ,  तरी त्यांची पृष्ठ श्यानता  ( दाटपणा )  उच्च असते व त्यामुळे ती टिकतात . 

 अल्कोहॉलांचे व इतर अनेक पृष्ठक्रियाकारकांच्या जलीय विद्रावांचे फेस स्थिर असतात .  याचे कारण त्यांमधील बुडबुड्यांच्या पटलांच्या पृष्ठभागाचे संघटन आतील द्रवाच्या संघटनांपेक्षा वेगळे असते आणि पृष्ठताण आतील द्रवाच्या पृष्ठताणापेक्षा कमी असतो .  या कारणांमुळे पटलपृष्ठास आघाताने भेग पडली व त्याखालचा द्रव उघडा पडला ,  तर त्या द्रवाचा पृष्ठताण पटलपृष्ठाच्या पृष्ठताणापेक्षा जास्त असल्यामुळे भेगेच्या कडा एकमेकींकडे ओढल्या जातात व भेग त्वरित भरून येते .  पृष्ठ – स्थितिस्थापकता  ( ताण काढून घेतल्यानंतर पृष्ठ मूळ स्थितीत परत  येण्याचा गुणधर्म )  हेही फेस स्थिर बनण्याचे एक कारण आहे .  एखाद्या पृष्ठक्रियाकारक द्रवाचे पटलपृष्ठ आघात होऊन ताणले गेले म्हणजे त्याचे क्षेत्रफळ वाढल्यामुळे त्या भागातील पृष्ठक्रियाकारकाची संहती  ( प्रमाण )  कमी होते व त्यामुळे पृष्ठताण वाढतो व त्याचा परिणाम म्हणून पृष्ठपटल जास्त ताणले जाण्यास विरोध होतो . 

  प्रतिकार व नाश  : फेसजनक द्रवात जे मिसळल्यास फेसनिर्मिती स विरोध करतील किंवा बनलेल्या फेसाचा नाश करतील असे अनेक पदार्थ माहीत आहेत व व्यवहारात वापरले जातात .  हे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे कार्य करतात .  ते द्रवामध्ये असलेला फेसजनक घटक अधिशोषणाने  ( पृष्ठभागावर शोषून घेण्याच्या क्रियेने )  काढून घेतात व त्यामुळे फेस निर्माण होत नाही .  काही ठिकाणी द्रव व वायू यांच्या आंतरपृष्ठावर या पदार्थांचे अधिशोषण अग्रहक्काने होते व त्यामुळे मूळच्या फेसजनक पदार्थाचे पटल दू र सारले जाऊन या पदार्थाचे पटल त्याच्याजागी येते पण याच्या पटलाच्या अंगी फेस बनण्यास आवश्यक असलेली पटल स्थितिस्थापकता नसते व त्यामुळे फेस नाहीसा होतो .  कित्येक पदार्थांची फेसजनक घटकाशी रासायनिक विक्रिया घडून येते व फेस बनण्यास अयोग्य पदार्थ बनतो आणि त्यामुळे साहजिकच फेस होत नाही .  फेस नाहीसा करण्याची आणखीही एक यंत्रणा आहे .  ती उकळत्या द्रवात होणारा फेस नाहीसा करणाऱ्या काही पदार्थांच्या बाबतीत  ( उदा .  उच्च रेणुभाराची डायअमाइडे )  दिसून येते .  या पदार्थांमुळे ,  ज्या उष्ण भागांशी द्रवाचा संपर्क होऊन बुडबुडे बनतात व फेस होतो ते भाग आर्द्रशील  ( ओले होण्यास योग्य )  बनतात .  त्यामुळे बुडबुडे जास्त मोठे होतात आणि त्यामुळे ते त्वरेने फुटतात .  त्यांपासून फेस बनण्यास अवसरच मिळत नाही .

  

 बुडबुड्यांवर आघात झाल्याने त्यांचे आकार विकृत होतात व द्रव पटल भंग पावते आणि त्यामुळेही फेस नाहीसा होतो . 

 लाक्षणिक भेदाभेद  : ( १ )  फेसामध्ये असणाऱ्या द्रव व वायू यांच्या आकारमानांचे गुणोत्तर , ( २ )  फेसाची घनता , ( ३ )  फेसाचा व्याप  ( एक ग्रॅम वजनाच्या फेसाचे आकारमान ), ( ४ )  द्रवाची निचरा होण्याची त्वरा , ( ५ )  फेसाची श्यानता , ( ६ ) फेसाचे स्थैर्य , ( ७ )  बुडबुड्यांचे आकारमान व  ( ८ )  फेसातील त्यांचे वितरण यांवरून निरनिराळ्या फेसांतील साम्यभेद ठरविता येतात .  या मूल्यांचे मापन करण्यासाठी विविध योजना करतात व निरनिराळी उपकरणे वापरतात . 

  उपयोग  :   ( १ )  फेन – प्लवन प्रक्रिया  : धातुकांपासून  ( कच्‍च्‍या रूपांतील धातूंपासून )  शुद्ध धातू मिळविण्यासाठी ती खाणीतून खणून काढतात ,  तेव्हा ती खडकांचे तुकडे ,  दगडमाती इ .  निरुपयोगी पदार्थांबरोबर  ( अपखनिजांबरोबर )  मिसळलेली असतात .  अशा मिश्रणातील अपखनिजे शक्य तितकी वगळून धातुकाचे प्रमाण ज्यामध्ये उच्च आहे असे मिश्रण मिळविणे आवश्यक असते .  या कामासाठी फेसांची योजना केलेल्या प्रक्रिया बहुमोल ठरल्या आहेत  [ ⟶  प्लवन ]. 

  

  ( २  )  आग विझविण्यासाठी फेस  : आगी विझविण्यासाठी सामान्यतः पाणी वापरले जाते  परंतु पेट्रोलसारख्या ,  पाण्यापेक्षा हलक्या द्रव पदार्थाला लागलेली आग विझविण्यासाठी पाणी उपयोगी पडत नाही .  कारण अशा आगीवर पाण्याचा वर्षाव केला ,  तर ते तेलापेक्षा जड असल्यामुळे तळाशी जाते आणि जळत असलेले तेल पृष्ठभागावर असल्यामुळे त्याला हवेचा पुरवठा चालू राहतो व आग तशीच राहते .  इतकेच नव्हे ,  तर पाण्याच्या फवाऱ्याच्या आघाताने तेल सभोवार उडून आग पसरण्याचाही संभव असतो .  कार्बन डाय – ऑक्साइडयुक्त पाण्याचा फेस बनवून त्याचा वर्षाव आगीवर केला ,  तर फेस तेलापेक्षा हलका असल्यामुळे तेलाच्या पृष्ठभागावर ठाण मांडून बसतो .  त्यामुळे ज्वलनास आवश्यक असलेला हवेचा पुरवठा तुटतो .  फेसातील कार्बन डाय – ऑक्साइडही आग विझविण्यास साहाय्य करतो .  या ठिकाणी लागणारा फेस दाट ,  उच्च तापमानास टिकणारा आणि जळणाऱ्या पदार्थांच्या संपर्काने नष्ट होणार नाही ,  असा असावा लागतो  [ ⟶  आगनिवारण ].  प्रथिने आणि त्यांचे अंशतः जलीय विच्छेदन  ( पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे होण्याची क्रिया )  करून मिळणारे पदार्थ यांची मिश्रणे अशा फेसासाठी सामान्यतः वापरतात .  सॅपोनिने ,  लेसिथिने इ .  पदार्थही उपयोगी पडतात . 

  (३)  प्रक्षालन व फेस  : प्रक्षालकांची प्रक्षालनक्षमता  ( पदार्थ स्वच्छ करण्याची क्षमता )  त्यांच्या फेस बनण्याच्या गुणावर अवलंबून नसते .  कित्येक ठिकाणी प्रक्षालकांचे अतिरिक्त फेस उपद्रवकारक असतात .  उदा .  यांत्रिक धुलाईत वाजवीपेक्षा जास्त झालेला फेस यंत्र भागात शिरून नुकसान करतो म्हणून बेताचा फेस होणारी प्रक्षालके अशा ठिकाणी वापरावी लागतात .


 प्रक्षालनासाठी वापरावयाचे पाणी अफेनद  ( प्रक्षालकाचा पुरेसा फेस न होणारे )  असेल व साबण हा प्रक्षालक म्हणून वापरावयाचा असेल ,  तर तो पुरेसा वापरला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी फेसाचा उपयोग होतो .  अफनेद पाण्यात असलेल्या कॅल्शियम व मॅग्‍नेशियम यांच्या संयुगांची साबणाशी विक्रिया होऊन फेस न होता साका बनतो .  यासाठी वापरला गेलेला साबण प्रक्षालनाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरतो .  पाण्यात असलेली ही संयुगे संपली म्हणजे साबणाचा फेस होऊ लागतो .  यावरून फेस होऊ लागला म्हणजे पुरेसा साबण वापरला जात आहे ,  असे अनुमान काढता येते . 

 प्रक्षालन क्रियेत मलिन वस्तूपासून सुटे झालेले मळाचे कण किंवा द्रवरूप मळाचे बिंदू फेसाच्या पटलावर शोषित होऊन राहतात .  त्यामुळे ते वस्तूवर परत बसू शकत नाहीत व फेस काढून टाकला ,  तर त्याबरोबर निघून जाऊन वस्तू स्वच्छ होते .  या गुणाचा उपयोग काही प्रक्षालन क्रियांमध्ये होतो ,  उदा .,  जमिनीवर आंथरलेला गालिचा जागच्या जागी स्वच्छ करण्याची एक पद्धत .  या पद्धतीत गालिच्याचा जेवढा भाग धुवावयाचा असेल तेवढ्याच भागावर प्रक्षालकाचा फेस लावतात त्यामुळे त्याच्या सभोवारचा भाग आणि दुसरी बाजू ओली होत नाही  [ ⟶ पृष्ठक्रियाकारके ].  शेवटी फेस वाळला म्हणजे निर्वात कचरा चोषक यंत्राने  [ व्हॅक्यूम क्लिनरने  ⟶ गृहोपयोगी उपकरणे ]  तो काढून टाकतात त्या वेळी त्याला चिकटलेला मळही निघून जातो व गालिचा स्वच्छ होतो . 

 कित्येक सौंदर्यप्रसाधनांत फेस आवश्यक मानला जातो  उदा .,  शॅंपू  ( केस धुण्यासाठी वापरण्यात येणारी मिश्रणे ),  दाढीचा साबण .  

  (४)  इतर उपयोगात  :  ( अ ) कलिली  ( विशिष्ट आकारमानाच्या संधारित कणांच्या रूपातील )  पॅलॅडियम उत्प्रेरक  ( प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती बदलणारा पदार्थ )  असता नेहमीच्या तापमानास एथिलिनाचे हायड्रोजनीकरण  ( हायड्रोजनाबरोबरील विक्रिया )  सॅपोनीन वापरून केलेल्या फेसात घडविले ,  तर विक्रियावेग दसपट वाढतो .  कारण येथे विक्रिया फेसातील बुडबुड्याच्या पटलपृष्ठावर घडून येते . ( आ )  कारखान्यात पोलादाच्या वस्तू तयार करतात तेव्हा प्रथम त्या मलिन असतात .  त्यांना लागलेला मळ व गंज निघून जावेत म्हणून संहत  ( विद्रावातील प्रमाण जास्त असलेले )  व उष्ण अम्‍ल असलेल्या पात्रात त्या बुडवून ठेवतात .  रासायनिक विक्रियेने त्या स्वच्छ होतात त्या वेळी जे वायू बाहेर पडतात त्यांच्याबरोबर अम्‍लाचे तुषार सभोवार उडण्याचा फार संभव असतो .  कामगारांच्या शरीरप्रकृतीवर आणि जवळपास असणाऱ्या वस्तूंवरही त्यामुळे अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते .  ही आपत्ती टाळण्यासाठी अम्‍लात फेस उत्पन्न करणारी आयनहीन पृष्ठक्रियाकारके  [ ⟶ पृष्ठक्रियाकारके ]  मिसळतात .  त्यामुळे बनणाऱ्या फेसाचा थर अम्‍लाच्या पृष्ठावर तरंगत राहतो व तुषार सभोवार उडण्यास प्रतिबंध करतो .

   

 ( इ )  वनस्पतीवर कीटकनाशके फवारताना ती फेसयुक्त करून फवारली ,  तर त्यांचा थर जास्त वेळ टिकतो व जास्त परिणामकारक होऊ शकतो म्हणून कित्येक द्रव्यांच्या फवारणीत फेसांचा उपयोग करतात . 

 ( ई )  खाणींमध्ये खोदाई चालू असताना सभोवार उडणारा धुरळा खाली बसावा यासाठीही फेस उपयोगी पडतो . 

 ( उ )  ध्रुव प्रदेशातील विमानतळावर बर्फ वितळणे कमी व्हावे यासाठी फेसाचा उपयोग झाल्याची नोंद आहे .  बर्फावर सु .  ५ सें मी .  जाडीचा फेस पसरला ,  तर बर्फ वितळण्याचा वेग ९५ टक्क्यांनी कमी होतो असे आढळून आले आहे . 

  उपद्रवकारक फेस  : कित्येक औद्योगिक प्रक्रियांमध्ये उदा .,  साखरेचा विद्राव संहत करताना ,  जवस तेलाची व्हार्निशे बनविताना ,  अल्किड ,  मेलॅमीन ,  यूरिया इ .  संश्लिष्ट  ( कृत्रिम रीतीने तयार केलेल्या )  रेझिनांचे निर्जलीकरण करताना ,  पेनिसिलिनाच्या उत्पादनात ,  तसेच कित्येक ऊर्ध्वपातन क्रियांत आणि बाष्पनिर्मितीमध्ये फेस उत्पन्न झाल्यामुळे व्यत्यय येतो व उत्पन्न घटते म्हणून फेसाचे निवारण करावे लागते .  त्यासाठी फेसनाशक द्रव्ये वापरली जातात .  सिलिकोन बहुवारिके ,  अल्किल अरिल सल्फोनेटे ,  एरंडेल ,  कॅप्रिल अल्कोहॉल ,  सल्फोनेटीकरण केलेली  ( हायड्रोजन अणूंच्या जागी  — SO3H गटांची प्रतिष्ठापना केलेली )  वनस्पतीज तेले ही त्यांपैकी काही द्रव्ये होत . 

 यंत्रामध्ये वापरलेल्या वंगणात फेस होणे अनिष्ट असते कारण फेसामुळे धारव्यांच्या  ( यंत्रातील फिरत्या किंवा सरकत्या भागांना आधार देणाऱ्या भागांच्या  बेअरिंगांच्या )  पृष्ठावर वंगण आवश्यकतेपेक्षा कमी पडते म्हणून फेसनाशक पदार्थ वापरावे लागतात .  ग्लिसरॉलासारखी पॉलिहायड्रिक अल्कोहॉले ,  डाय – ऑक्टिल सल्फोसक्सिनेट इ .  संयुगे जलविद्राव्य आ र्द्री कारकांबरोबर  ( पाण्यात विरघळणाऱ्या व पृष्ठभाग ओला करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांबरोबर )  मिसळून वापरल्याने फेसाचा प्रतिकार होतो . 

    फेस – विभाजन  : काही मिश्रणांतील घटक फेसांचा उपयोग करून वेगळे करता येतात .  एखाद्या द्रवात अ आ ‌ णि आ असे दोन पदार्थ विरघळलेले असले व अ ने त्या द्रवाच्या पृष्ठताणात होणारी घट आ ने होणाऱ्या घटीपेक्षा जास्त असेल ,  तर त्या द्रवाचा फेस बनविल्यावर फेसात असणारे अ चे प्रमाण आ च्या प्रमाणापेक्षा जास्त असते .  जे थे हा फरक बराच मोठा असतो अशा ठिकाणी मिश्रणातील घटक प्रत्यक्ष वेगळे करता येतात .  या पद्धतीला  ‘ फेस – विभाजन पद्धत ’  म्हणतात .  प्रयोगशाळेत व इतरत्र काही ठिकाणी ही उपयुक्त ठरली आहे  उदा .,  सोडियम  n- डोडेसिल सल्फेट व १ – डोडेकॅनॉल ,  संरचनासादृश्य असलेली काही वसाम्‍ले  [ ⟶ वसाम्‍ले ],  रक्तरसातील  ( साखळणाऱ्या रक्तापासून अलग होणाऱ्या स्वच्छ द्रवातील )  विविध प्रथिने आणि वसासदृश  ( स्‍नि ग्ध पदार्थांशी सदृश असे )  पदार्थ यांच्या मिश्रणातील घटक या पद्धतीने वेगळे करण्यात आलेले आहेत .

   घन पदार्थांचे फेस  : कित्येक खाद्य पदार्थ घन फेसाच्या रूपात असतात  उदा .,  पाव  ( ब्रेड ),  अंबोळी  ( डोसा ),  इडली ,  ढोकळा इत्यादी .

 रबर – फेस  :  रबराच्या चिकात आवश्यक ते पदार्थ मिसळून बनविलेले मिश्रण घुसळले म्हणजे त्यात हवा समाविष्ट होते .  हे फेसाळलेले मिश्रण साच्यात घातले आणि दाब व उष्णता दिली म्हणजे रबर – फेस सिद्ध होतो . [ ⟶ रबर ].

   काच – फेस  : ( फेन काच ).  काचेचे तुकडे किंवा गोळ्या आणि तापविल्यावर वायू निर्माण करतील असे पदार्थ  ( चुनखडी ,  कोळसा इ .)  यांचे मिश्रण साच्यात भरून आणि उष्णता देऊन हा बनवितात .  उष्णता व ध्वनी यांना विरोधक म्हणून हा वापरतात . [ ⟶ काच ].

 प्लॅस्टिक – फेस  :  संश्लेषित रेझिनांचा फेस बनेल अशी योजना करून विविध रेझिनांपासून प्लॅस्टिक – फेस बनविता येतात  उदा .  पॉलिव्हिनिल ,  पॉलियुरेथेन इत्यादी . [ ⟶ प्लॅस्टिक व उच्च बहुवारिके ].

 पहा  :  पृष्ठक्रियाकारके  प्रक्षालके  साबण .

 संदर्भ  : 1. Bickerman, J. J. Perri, J. M. Booth, R. B. Currie, C. C. Foams, Theory and Industrial Applications, New York, 1953,

           2. Schwartz, A. M. Surface Active Agents-their Chemistry and Technology, Vol. II, London, 1957.

           3. Thewlis, J., Ed., Encyclopaedic Disctionary of Physics, Vol. III, New York, 1963.

 केळकर ,  गो .  रा .