ब्रय, आंरी एद्वार प्रॉस्पेर : (२८ फेब्रुवारी १८७७ – १४ ऑगस्ट १९६१). प्रसिद्ध फ्रेंच प्रागितिहासज्ञ. नॉर्मंडीतील मॉरतँ येथे जन्म. नाजूक व अशक्त प्रकृतीमुळे त्यास वाचन-लेखनास बंदी होती. त्यामुले वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असूनही निसर्गाच्या निरीक्षणाव्यतिरिक्त त्यास सुरूवातीस काहीच करता आले नाही. पुढे तो पाद्री झाला तरी विविध देशांतील अश्मयुगीन अवशेषांचे निरीक्षण करण्यात तो मग्न असे. अखेर वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने विज्ञानातील पदवी मिळविली. स्विझर्लंडमध्ये त्याची मानवजातिवर्णन हे शब्द शिकविण्यासाठी नियुक्ती झाली. पुढे पॅरिस येथील मानवी पुराजीवविक्षान संस्थेत प्रागैतिहासिक मानवजातिवर्णन विषयाचा प्राध्यापक आणि संशोधन विभागाचा निदेशक म्हणून त्याची नेमणूक झाली (१९१०). पुढे आफ्रिका व पोर्तुगालमध्येही तो काही वर्षे प्राध्यापक होता. त्याने फ्रान्स, स्पेन, चीन, इथिओपिया आणि दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक या संशोधन-अभ्यासाचा गोषवारा सु. एक हजार शोधनिबंध तसेच ग्रंथांद्वारे प्रसृत केला. बियॉन्ड द बाउन्ड्ज ऑफ हिस्टरी (इं. भा., १९४९), रॉफ पेंटिग्ज ऑफ सदर्न आफ्रिका (इं. भा., १९६५-६७), मेन ऑफ द ओल्ड स्टोनएज (इं. भा., १९६५) इ. त्याचे काही प्रमुख ग्रंथ होत.

ब्रय यास प्रगितिहासाचा जनक मानतात. इंग्लंड, स्पेन, रूमानिया, पोर्तुगाल, इटली, द. आफ्रिका प्रजासत्ताक, चीन इ. देशांत संशोधन करून या क्षेत्रात त्याने महत्त्वाचे शोध लावले आणि प्रागितिहासकालीन पुराश्मयुगीन कलेशी संबंधित व पुराश्मयुगाशी निगडित अशा दोन्ही शाखांमध्ये त्याने मोलाची भर घातली. तसेच तत्संबंधित अभ्यासाला उपयुक्त ठरतील अशी मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. मानवी पुराजीवनिज्ञान संस्थेद्वारा पश्चिम यूरोपातील गुहाचित्रांवर प्रसिद्ध झालेल्या मालिकेच्या प्रकाशनाचे श्रेय ब्रयकडे जाते. १९०१ मध्ये कोंबरेल व फाँ-द-गोम येथील गुहांतील चित्रकलेच्या अभ्यासास त्याने ल्वी कापितां व दनी पेरॉनी या तज्ञांसमवेत प्रारंभ केला आणि त्याची परिणती १९४० मध्ये लॅस्को येथील सुप्रसिद्ध गुहेच्या संशोधनात झाली.

उत्तर पुराश्मयुगीन भूशास्त्र, भूगोल आणि मानवजातिवर्णन यांतील शास्त्रशुद्ध संशोधनाची तात्त्विक बैठक ब्रयने घातली. त्यामुळे प्रागितिहासाची जी संकल्पना आज गृहीत धरलेली आहे, त्याचे उत्तरदायित्व ब्रयकडेच जाते. त्यानेच ऑरिग्नेशियन नंतरच सॉल्यूट्रीअनचा सांस्कृतिक टप्पा येतो, हे दाखविले व मग्डलेनिअन संस्कृतीच्या अवशेषांची सहा भागांत विभागणी केली. प्रागैतिहासिक काळातील अंगोपागांचे शास्त्रशुद्ध संशोधन करून पुढील अभ्यासकांना मार्गदर्शक दिशा दाखवून देणारे प्रागितिहासज्ञ म्हणून त्याची ख्याती आहे.

संदर्भ : Broderick, A. H. Father of Prehistory : the Abbe Henri Breuit-His Life and Times, New York, 1963.

देगलूरकर, गो. बं.