बोहीमिया: चेकोस्लोव्हाकिया देशाचा पश्चिम भाग व एक मध्ययुगीन राज्य क्षेत्रफळ सु. ५१,८०० चौ. किमी. लोकसंख्या ५१,०१,५०४ (१९७७). याच्या दक्षिणेस ऑस्ट्रिया, नैर्ऋत्येस प. जर्मनी, वायव्येस पू. जर्मनी, ईशान्येस पोलंड हे देश व पूर्वेस चेकोस्लोव्हाकियाचा मोरेव्हिया प्रांत आहे. डोंगररांगांनी व पठारी प्रदेशांनी युक्त असा हा प्रदेश उत्तरेस सुडेटन पर्वतश्रेणीतील गेंट पर्वताने, पश्चिमेस एर्ट्सगबिर्ग (ओर) पर्वताने, तर दक्षिणेस बोहीमियन अरण्याने वेढलेला आहे. या प्रदेशाची सरासरी उंची १,२०० ते १,५०० मी. यांदरम्यान आहे. लाबे (एल्ब) व व्हल्टाव्हा या येथील प्रमुख नद्या असून जवाहतुकीच्या दृष्टीनेही त्यांना महत्त्व आहे. येथील हवामान उपोष्ण कटिबंधीय असून त्यावर पश्चिमेकडील सागरी वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसून येतो.
चेकोस्लोव्हाकियाच्या अर्थकारणातही बोहीमियाला विशेष महत्त्व आहे कारण कृषिउत्पादने, खनिज संपत्ती व आधुनिक उद्योगधंदे या बाबतींत बोहीमिया अग्रेसर आहे. देशातील दाट वस्तीचा आणि सर्वाधिक नागरीकरण झालेला हा प्रदेश आहे. सुपीक जमीन आणि लाबे व व्हल्टाव्हा या नद्यांनी भिजणारा पठारी प्रदेश मध्य बोहीमियात आहे. अन्नधान्ये, साखरबीट, द्राक्षे, फ्लॅक्स आणि हॉप फळे ही येथील प्रमुख उत्पादने होत. कोळसा, चांदी, तांबे, जस्त, लोखंड यांसारखी खनिज संपत्ती वायव्येकडील डोंगराळ भागात आढळते. रेडियम व युरेनियम हेही या भागात मिळतात. खनिजसमृद्ध अशा या विभागात कापडगिरण्या आणि काचकारखाने विकसित झाले आहेत. प्राग हे तर अवजड उद्योगधंद्यांचे केंद्रच आहे. पल्झेन येथील ‘स्कोडा कंपनी’ यंत्रसामग्री, शस्त्रास्त्रे व दारूगोळा निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. बोहीमिया हे निसर्ग, विश्रामधामे व कार्लॉव्ही व्हारी, मारीआन्स्के लाझ्न्ये (मारीअनबाट) इ. ठिकाणचे नैसर्गिक औषधी पाण्याचे झरे यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील बहुसंख्य लोक चेक असून स्लोव्हाक, जर्मन व इतर काही अल्पसंख्य आहेत.
बोहीमियाचा इतिहास म्हणजे विद्यमान चेकोस्लोव्हाकियाचाच इतिहास ठरतो. मध्ययुगीन यूरोपातील बोहीमिया, मोरेव्हिया, सायलीशिया इ. प्रदेश हे चेक इतिहासाचे महत्त्वाचे घटक होत. प्राचीन काळी या प्रदेशातील केल्ट लोकांना रोमनांनी ‘बॉश्य’ अशी संज्ञा दिली होती, त्यावरूनच हा भाग ‘बोहीमिया’ या नावाने पुढे ओळखला जाऊ लागला. त्यानंतर या प्रदेशात जॅर्मनिक लोक आले. इ. स. सहाव्या शतकात येथे स्लाव्ह वंशाच्या लोकांनी प्रवेश केला. सातव्या शतकात सॅमो स्लाव्ह लोकांना संघटित केले. सॅमोच्या (६५८) निधनानंतर शार्लमेनच्या (७६८-८१४) साम्राज्यात हा भाग आला. पुढे या भागात अनेक राजकीय स्थित्यंतरे होत राहिली. ही स्थित्यंतरे म्हणजे विद्यमान चेकोस्लोव्हाकियाच्या इतिहासाचाच अविभाज्य भाग आहे. [⟶ चेकोस्लोव्हाकिया, इतिहास].
चेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताकाचा १९१८ साली उदय होऊन त्यात बोहीमियाचा समावेश करण्यात आला. येथील सुडेटन पर्वतश्रेणीत जर्मन भाषिक लोक अधिक होते. हिटलरने १९३९ मध्ये सुडेटन पर्वत प्रदेशाचा ताबा घेतला. दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात या चेक प्रांताची दोन वेळा (१९४८ व १९६०) प्रशासकीय पुनर्रचना करण्यात आली. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम व मध्य असे पाच प्रशासकीय विभाग विद्यमान बोहीमिया प्रदेशात आढळतात.
शहाणे, मो.शा. गाडे, ना.स.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..