बोव्हे, दान्येल : (२३ मार्च १९०७ – ). इटालियन औषधिक्रियावैज्ञानिक. विशिष्ट शारीरिक पदार्थांच्या क्रियेला, विशेषतः त्यांच्या रक्ताभिसरण तंत्रावरील (संस्थेवरील) व कंकाल स्नायूंवरील (हाडांना बांधलेल्या ऐच्छिक स्नायूंवरील) क्रियेला, अवरोध करणाऱ्या संश्लेषित (कृत्रिम रीत्या घटकद्रव्यांपासून बनविलेल्या) संयुगांसंबंधीच्या महत्त्वपूर्ण शोधांबद्दल त्यांना १९५७ च्या शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यक विषयाच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. स्नायू परिणामकारकपणे शिथिल करणाऱ्या व हिस्टामीन प्रतिबंधक (सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे विस्फारण करणाऱ्या व जठररसाच्या स्त्रवणाला उत्तेजन देणाऱ्या हिस्टामीन या संयुगाच्या क्रियेला प्रतिबंध करणाऱ्या) संयुगाविषयीचे त्याचे कार्य विशेष महत्त्वाचे ठरले आहे. त्यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील नशाटेल येथे झाला. १९२७ मध्ये त्यांनी जिनीव्हा विद्यापीठाची पदवी मिळविली. नंतर त्यांनी प्राणिविज्ञान व तुलनात्मक शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयांवर प्रबंध लिहून डी.एस्‌सी. पदवी १९२९ मध्ये मिळविली. १९२९-४७ या काळात त्यांनी पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये काम केले. तेथे सुरुवातीस ते चिकित्सा रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेत साहाय्यक होते व नंतर प्रमुख झाले. १९४७ मध्ये रोममधील इन्स्टिट्यूटो सुपिरिओर डी सानिटा या संस्थेच्या संचालकांच्या आमंत्रणावरून ते इटलीत राहावयास गेले. तेथे चिकित्सा रसायनशास्त्रीय प्रयोगशाळेची जुळवाजुळव करून ती सुरू करण्याचे काम केल्यानंतर त्यांची त्या प्रयोगशाळेच्या प्रमुखपदी नेमणूक झाली. १९६४ मध्ये ते सास्सारी विद्यापीठात औषधिक्रियाविज्ञानाचे प्राध्यापक झाले आणि १९७१ मध्ये रोम विद्यापीठात मानसजीवविज्ञानाच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९६९-७५ या काळात त्यांनी रोममधील कॉन्सिग्लिओ नॅझिओनेल देले रिसर्च या संस्थेत मानवजीवविज्ञान व मानस-औषधिक्रियाविज्ञान या विषयांच्या प्रयोगशाळेचे संचालक म्हणूनही काम केले.

इ. स. १९३५ मध्ये जर्मनीत सूक्ष्मजंतुवैज्ञानिक गेरहार्ट डोमाक यांनी प्रॉन्टोसील नावाच्या रंजक पदार्थाचा औषधी उपयोगाकरिता अभ्यास केला होता. हा पदार्थ शरीरात अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) दिल्यानंतर तो स्ट्रेप्टोकोकाय सूक्ष्मजंतूंवर नाशक परिणाम करीत असल्याचे आढळले होते परंतु तोच पदार्थ प्रयोगशाळेत निष्प्रभ ठरला होता. बोव्हे यांनी असे दाखवून दिले की, प्रॉन्टोसिलाचे शरीरात अपघटन (रेणूचे तुकडे पडण्याची क्रिया) होते व त्यातून सल्फानिलमाइड हा सूक्ष्मजंतुनाशक पदार्थ तयार होतो व तो शरीरात क्रियाशील असतो.

बोव्हे यांनी ⇨अधिवृक्क ग्रंथीच्या मध्यकापासून उत्पन्न होणाऱ्या ॲड्रेनॅलीन (एपिनफ्रिन) या हॉर्मोनावर (सरळ रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्त्रावावर) संशोधन केले. अनुकंपी तंत्रिका तंत्रावरील [⟶ तंत्रिका तंत्र] या हॉर्मोनाच्या परिणामांचा अभ्यास करून ॲड्रेनॅलिनासारखी रेणवीय संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) व क्रियाशीलता असणारे पदार्थ त्यांनी संश्लेषणाने तयार केले. यांपैकी एका पदार्थात हिस्टामीन प्रतिबंधक गुणधर्म असल्याचे त्यांना आढळले. १९४४ मध्ये त्यांनी मेपायरॅमीन (पायरिलामीन) नावाचे हिस्टामीनरोधक औषध शोधले. त्यांच्या या संशोधनामुळे पराग ज्वर, इसब, दमा इ. अधिहर्षताजन्य [⟶ ॲलर्जीजन्य ⟶ ॲलर्जी] विकृतींच्या उपचारात प्रगती झाली.

दक्षिण अमेरिकेतील इंडियन रहिवासी शिकार करण्याकरिता वापरीत असलेल्या बाणांच्या टोकावर क्यूरारी नावाच्या वनस्पतिजन्य विषाचा उपयोग करीत. हे विष प्राणिशरीरात शिरताच स्नायू व तंत्रिका (मज्जा) यांमधील संबंधात अडथळा उत्पन्न होतो आणि परिणामी स्नायु-शैथिल्य येऊन तो प्राणी हतबल होऊन पडतो. दक्षिण अमेरिकेच्या ॲमेझॉन प्रदेशात आढळणाऱ्या कॉन्ड्रोडेंड्रॉन आणि स्ट्रिक्नॉस या वंशांतील (विशेषतः कॉ. टोमेंटोजमस्ट्रि. टॉक्सिफेरा या जातींच्या) वनस्पतींपासून हे विष मिळते. १९३५ मध्ये एच्. किंग या शास्त्रज्ञांनी अशुद्ध क्यूरारीमधील शरीरक्रियाविज्ञान दृष्ट्या क्रियाशील पदार्थ शोधला होता. ट्यूबोक्यूरारीन नावचे ⇨अल्कलॉइड एच्. आर्. ग्रिफिथ आणि एस्. सी. कनेन या शास्त्रज्ञांनी १९४२ मध्ये शस्त्रक्रियेत भूल देण्याकरिता साहाय्यक म्हणून वापरले होते. १९४६ पासून यासंबंधी संशोधनास सुरुवात करून बोव्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी क्यूरारी व ⇨ अरगट (क्लॅव्हिसेप्स पुर्पुरिया हे कवक) यांमधील अल्कलॉइडांच्या अभ्यासास सुरुवात केली. प्रयोगान्ती त्यांनी साधी रासायनिक संरचना असलेले, हानिकारक सहपरिणाम नसलेले संश्लेषित परंतु नैसर्गिक अल्कलॉइडांपेक्षा अधिक उपयुक्त असलेले पदार्थ शोधले. जटिल (गुंतागुंतीच्या) शस्त्रक्रिया करताना पूर्ण स्नायु-शैथिल्याची गरज असते आणि ते मिळवण्याकरिता खोलवर अगदी गंभीर बेशुद्धी येईपर्यंत भूल द्यावी लागते. पुष्कळ वेळा मूळ शस्त्रक्रियेपेक्षा भूल देण्यातच गंभीर धोका असतो. बोव्हे यांच्या संशोधनामुळे स्नायु-शैथिल्य आणणारी जी नवी संश्लेषित औषधे तयार झाली ती भूल साहाय्यक म्हणून वापरण्याने हा धोका जवळजवळ नाहीसा झाला आहे. डी-ट्युबोक्यूरारीन नावाचे अल्कलॉइड १५ ते २० मिग्रॅ. मात्रेत नीलेतून किंवा स्नायूत द्यावयाच्या अंतःक्षेपणाच्या रूपात काही शस्त्रक्रियांमध्ये भूल साहाय्यक म्हणून वापरात आहे.

तंत्रिका औषधिक्रियाविज्ञानातील वरील संशोधनाशिवाय नव्याने उदयास आलेल्या मानस – औषधिक्रियाविज्ञानातही बोव्हे यांनी मोलाची भर घातली आहे. त्यांच्या संशोधनामुळे मेंदूच्या कार्यावर विशिष्ट परिणाम करणाऱ्या औषधांचा शोध लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मानवी जीवनातील भयंकर आपत्ती म्हणून गणल्या गेलेल्या मानसिक विकृतींविरुद्ध यशस्वी उपाययोजना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बोव्हे यांना नोबेल पारितोषिकाखेरीज जिनीव्हा विद्यापीठाचे प्लँटॅमर पारितोषिक (१९३४), फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे मार्टीन देमोरे पारितोषिक (१९३६), इटालियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे जनरल मृत्यू पारितोषिक (१९४१), एडिंबरो विद्यापीठाचे कॅमेरॉन पारितोषिक (१९४९) इ. तसेच त्यांच्या पत्नी फिलिमोना बोव्हे-नेत्ती यांच्या समवेतही काही पारितोषिके त्यांना मिळालेली आहेत. जिनीव्हा, पॅरिस, प्राग, स्ट्रॅस्‌बर्ग इ. विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या दिलेल्या आहेत. ते इटली, फ्रान्स, ब्रिटन अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील, अर्जेंटिना व भारत (इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी ) या देशांतील अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य आहेत.

जीवविज्ञान, औषधिक्रियाविज्ञान, सल्फोनामाइडे, अनुकंपी तंत्रिका तंत्राचे औषधिक्रियाविज्ञान, अधिहृषताजन्य रोगांवरील उपचार, हिस्टामीन प्रतिबंधक द्रव्ये, क्यूरारी व तत्सम औषधे इ. विषयांवर त्यांनी तीनशेहून अधिक निबंध लिहिले आहेत. त्यांच्या संशोधनासंबंधी महत्त्वाचे पैलू त्यांनी आपल्या पत्नी समवेत इटालियन भाषेत १९४८ साली लिहिलेल्या Structure chimique et activite Pharmacodynamique des medicaments du system nerveux Vegetatif या ग्रंथात आणि त्यांनी पत्नी व जी. बी. मारीनी-बेत्तोल्लो यांच्या समवेत लिहिलेल्या क्यूरारी अँड लाइक एजंट्स (१९५९) या ग्रंथात आढळून येतात. बोव्ह यांनी आर्. एच्. ब्लम व जे. मूर यांच्याबरोबर लिहिलेला कंट्रोलिंग ड्रग्ज हा ग्रंथ १९७४ मध्ये प्रसिद्ध झाला.

भालेराव, य. त्र्यं.