बोलोन्या विद्यापीठ : इटलीतील इतिहासप्रसिद्ध विद्यापीठ. ते १०८८ मध्ये स्थापन करण्यात आले. सुरुवातीच्या काळात (इ. स. १०००-१२५०) येथे विधी विद्यालय होते. कायद्याच्या अभ्यासाचे केंद्र म्हणून बाराव्या शतकात यूरोपभर त्याचा लौकीक होता. इ. स.१२५२ मध्ये त्यास विद्यापीठीय दर्जा प्राप्त झाला. पुढे वैद्यक आणि शल्यक्रिया, ईश्वरविद्या आणि उदारमतवादी कला (तेरावे शतक), गणित (चौदावे शतक) या विद्याशाखा या विद्यापीठात सुरू करण्यात आल्या. बोलोन्या वैद्यकीय विद्यालय हे शारीर विज्ञानाचे अध्यापन करणारे यूरोपातील पहिले विद्यालय होय. दक्षिण यूरोपातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून हे विद्यापीठ अग्रेसर होते.
पोपसत्ता व राज्यकर्ते यांच्या संघर्षकाळात (इ. स. ११००-१४००) विद्यापीठास स्थैर्य लाभले नाही. पुढे पोपशासनाखाली हे विद्यापीठ आले व त्याच्या प्रगतीस अनुकूल वातावरण निर्माण झाले. इ. स. १८०२-२४ यादरम्यान ईश्वरविद्या, न्यायशास्त्र, वैद्यक आणि शल्यक्रिया, तत्त्वज्ञान या विद्याशाखांबरोबरच एकूणच विद्यापीठाची पुनर्घटना करण्यात आली.एकोणिसाव्या शतकात विद्यापीठाचे मोठीच प्रगती झाली.
हे विद्यापीठ आता राज्यशासनाच्या नियंत्रणाखाली आहे. त्यात बाल्टिमोर (अमेरिका) येथील जॉन हॉपिकिन्स विद्यापीठाची उच्च अध्ययनाची शाखा १९५३ मध्ये सुरू करण्यात आली. अर्थशास्त्र व वाणिज्य, न्यायशास्त्र, कला आणि तत्त्वज्ञान, शिक्षणशास्त्र, वैद्यक आणि शल्यक्रिया, गणित, भौतिक व निसर्गविज्ञाने, रसायनशास्त्र, औषधिविज्ञान, अभियांत्रिकी, कृषी आणि पशुवैद्यक ह्या विद्यापीठाच्या विद्यमान विद्याशाखा होत. प्राणिशास्त्र, भूविज्ञान, पशुविज्ञान, शारीरविज्ञान आणि खजिनविज्ञान या विद्याशाखांची स्वतंत्र संग्रहालये आहेत. विद्यापीठात सु. ३५,००० विद्यार्थी असून विद्यापीठीय ग्रंथालयात सु. १०,००,००० ग्रंथ व ७,५०० हस्तलिखिते होती (१९७६).
मिसार, म. व्यं.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..