बोलोन्या : इटलीच्या उत्तर भागातील इतिहासप्रसिद्ध शहर आणि एमील्या-रॉमान्या विभागाची व बोलोन्या प्रांताची राजधानी. हे शहर पो नदीखोऱ्याच्या दक्षिणेस, ॲपेनाइन्स पर्वताच्या पायथ्याशी, मिलानच्या आग्नेयीस २१४ किमी. व फ्लॉरेन्सच्या उत्तरेस १०६ किमी. वर आहे. लोकसंख्या ४,७६,४७१ (१९७८ अंदाज). उत्तर इटलीचा मैदानी प्रदेश व दक्षिण इटलीतील तस्कनीचा दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश यांना जोडणाऱ्या लोहमार्गावरील बोलोन्या हे मोक्याचे प्रस्थानक असून या परिसरातील महत्त्वाचे व्यापाराचे व दळणवळणाचे केंद्र म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. याच्या परिसरातील शेती विकसित झालेली असून गहू, तांदूळ, मका, ऊस, बीट, ताग व जवस ही येथील प्रमुख पिके होत. खाद्यपदार्थ, साखर, डबाबंदीकरण, तंबाखू, रसायने, खते, यंत्रे, प्लॅस्टिक, कागद, काचसामान, ॲल्युमिनियम व कापडनिर्मिती हे येथील प्रमुख उद्योग होत. इटलीतील उत्कृष्ट खाद्यपेयांसाठी बोलोन्या विख्यात आहे.
इट्रुस्कन काळात (इ. स. पू. ११०० ते इ. स. पू. १००) ‘फेलसन’ म्हणून ते ओळखले जाई. इ. स. पू. दुसऱ्या शतकात रोमन लोकांनी या प्रदेशाला ‘बनोनीया’ असे नाव देऊन येथे वसाहत केली. पूर्वेकडील बायझंटिन व पश्चिमेकडील लाँबर्डी घराण्यांतील वैमनस्याची झळ लागून या शहराची वाताहत झाली. अकराव्या शतकात उत्तर इटलीतील स्वतंत्र परगणा म्हणून बोलोन्याला मान्यता मिळाली. इ. स. ११ ते १३ या शतकांत येथे भव्य चर्चवास्तू बांधण्यात आल्या व पहिली चित्रकला संस्था स्थापन झाली. चौदाव्या शतकात बोलोन्याचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. १८५९ पर्यंत बोलोन्या पोपशासनाखाली होते. दुसऱ्या महायुद्धातील हवाई हल्ल्यांमुळे शहराचे बरेच नुकसान झाले.
शहराच्या सभोवती ८ किमी. लांबीची पंचकोनी तटबंदी आहे. आता या तटबंदीच्या बाहेरही शहरांची वस्ती पसरली आहे. शहराचे वैशिष्ट्य असलेले बाराव्या शतकातील दोन झुकते मनोरे, शहराच्या मध्यभागी असलेले सॅन पेट्रोनिओ चर्च, बाराव्या शतकापासून आधुनिक काळापर्यंत उभारण्यात आलेल्या अनेक चर्चवास्तू आणि प्रबोधनकालीन भव्य राजवाडे यांमुळे मध्ययुगीन वातावरणाचा प्रत्यय अजूनही येतो. सॅन पेट्रोनिओ चर्च गॉथिक वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. शहराच्या ईशान्येस अकराव्या शतकात स्थापन झालेले यूरोपातील अत्यंत जुने बोलोन्या विद्यापीठ आहे. आधुनिक उच्च शिक्षणाचे केंद्र म्हणून ते आजही प्रसिद्ध आहे. शहरात एक पुरावस्तुसंग्रहालय व रॅफेएलच्या इक्स्टसी ऑफ सेंट सेसिलिया ही प्रख्यात कलाकृती असलेली पिनाकोटेका चित्रवीथी आहे. इटालियन व खास बोलोन्या-शैलीतील कलाकृती येथे जतन केल्या आहेत. शहरात एक अणुशक्तिकेंद्रही आहे. बिनतारी संदेशव्यवस्थेचा प्रवर्तक इटालियन संशोधक मार्कोनी (१८७४-१९३७) याचे बोलोन्या हे जन्मस्थान होय.
पंडित, भाग्यश्री.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..