बोरिवली : प्राचीन अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले मुंबईचे एक उपनगर. मुंबईच्या उत्तरेस सु. ३३ किमी.वर पश्चिम रेल्वेच्या मुंबई-बडोदे रेल्वेमार्गावर वसले असून ते रेल्वेचे स्थानक आहे. लोकसंख्या ५,६१,३३८ (१९८१-मुंबई महानगरपालिकेच्या आर्. विभागातील कांदिवली व दहिसरसह).
येथे प्रथम अश्मयुगीन हत्यारे कर्नल जेम्स टॉड यांना सापडली. याशिवाय इतरत्र जवळपासही अशी हत्यारे सापडल्यामुळे प्राचीन अश्मयुगीन मानव मलबार हिल ते वसईच्या खाडीपर्यंतच्या भागात वस्ती करून राहात असावा, असे पुरातत्त्वज्ञांना आढळून आले. बोरिवली, कांदिवली आणि गोरेगाव येथील दहिसर खोऱ्यातील छेदांचा बी. सुब्बाराव, एस्. सी. मलिक व ह. धी. सांकलिया यांनी एफ्. ई. त्सॉइनरबरोबर अभ्यास करून प्राचीनतम आणि प्राचीन अथवा उत्तर अश्मयुगीन हत्यारे आणि क्षुद्राश्मे शोधून काढली. यांशिवाय त्यांना येथे नदी वेदिकाही सापडली.
बोरिवलीचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि येथील विविध पुरातत्वीय अवशेषांवरून तसेच जवळच्या मंडपेश्वर व कान्हेरी येथील गुंफांवरून येथे सातवाहन, राष्ट्रकूट, वाकाटक, यादव, शिलाहार इ. वंशांचा अंमल इ. स. दुसऱ्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत असावा. पोर्तुगीजांनी ते सोळाव्या शतकात पादाक्रांत केले आणि इंग्लंडला अंदण दिले (एकोणिसावे शतक). पोर्तुगीजांनी येथे कॅथिड्रल, कॅथलिक चर्च इ. इमारती उभारिल्या. बोरिवली रेल्वे स्थानकाजवळ सात वीरगळ आहेत (२.२५ x २.७५ चौ.मी.च्या शिळा). त्यांवरील कोरीव कामात युद्धाचा प्रसंग दाखविला असून हत्तींचे चित्रण आहे. याशिवाय नौका आणि वल्ही यांचेही चित्रण आहे. अनंत स. अळतेकर यांच्या मते हे युद्ध शिलाहार राजा सोमेश्वर व यादव राजा महादेव यांतील असावे. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस सु. एक किमी.वर काही बौद्ध स्मारके व गुहा डोंगरात खोदल्या आहेत.
आधुनिक बोरिवली हे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असून येथे एक राष्ट्रीय उद्यान, महाविद्यालय व अनेक विद्यालये आहेत. येथून जवळ प्रसिद्ध ⇨कान्हेरी गुहा आहेत.
देव, शां. भा.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..