बोरकोल : (हिं. करम साग केल लॅ. बॅसिका ओलेरॅसिया प्रकार असेफाला कुल-क्रुसीफेरी). ही कोबीच्या गटातील भाजी काश्मीर व आसाममध्ये लागवडीत आहे. हिचे मूलस्थान उत्तर यूरोप आणि ब्रिटिश बेटांचा समुद्रकिनारा असावे. कोबी गटातील इतर पिकांपेक्षा बोरकोलचे कोबीच्या जंगली वंशज रूपांशी जवळचे नाते आहे. ही द्विवर्षायू (जीवनक्रम दोन हंगामात पूर्ण होणारी) भाजी इंग्रजीत केल, कोल अथवा कोलवर्ट नावांनीही ओळखली जाते. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांना ही भाजी परिचित होती व इ. स. पू. २०० च्या सुमारास एम्. पी. केटो यांनी तिच्या पुष्कळ प्रकारांचे वर्णन केले होते.
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यात या पिकाची व्यापारी प्रमाणावर लागवड केली जाते. त्या देशाच्या दक्षिण भागात पुष्कळ ठिकाणी परसबागेत
लावण्याची पालेभाजी म्हणून तिला बरेच महत्त्व आहे. १९७० नंतर केलेल्या प्रयोगांतून भारतातही या भाजीची मोठ्या प्रमाणावर लागवड करता येईल, असे दिसून आले आहे. ही वनस्पती ब्रॅसिका वंशातील असल्याने तिची सर्वसामान्य शारीरिक लक्षणे ⇨क्रुसीफेरीत (मोहरी कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात.
पाने काहीशी गुळगुळीत, लांबट, झालरीसारख्या कडांची, लांब देठांची असून त्यांचा गुच्छ जोमाने वाढतो. दीर्घकाल वाढीच्या हंगामातील भाजीच्या प्रकाराचे खोड ६० सेंमी. अथवा त्याहीपेक्षा उंच वाढते. झाडांना कोबीप्रमाणे गड्डे धरत नाहीत अथवा फुलवरप्रमाणे खाद्य फुले येत नाहीत. यात ठेंगणे, मध्यम उंच आणि उंच असे प्रकार असून ठेंणग्या प्रकारांची पाने व धांडे (खोडे) यांचा भाजीसाठी उपयोग करतात. स्कॉच आणि जर्सी या उंच वाढणाऱ्या प्रकारांचा विशेषकरून कोंबड्या व इतर पाळीव जनावरांचे खाद्य म्हणून वापर करतात. काही प्रकार शोभेसाठी बागेत लावतात.
बोरकोलची पाने लुसलुसीत असून त्यांची भाजी रुचकर व स्वादिष्ट असते. धांडे उकडून अगर कडधान्यात मिसळून अथवा मांसाहारी पदार्थात मिसळून खातात. ही भाजी पौष्टिक आहे. तिच्यात विशेषेकरून अ व क जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम व पोटॅशियम यांसारखी पोषकद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात.
अमेरिकेत स्कॉच केल या थंडीला प्रतिकार करणाऱ्या व उंच वाढणाऱ्या भाजीच्या प्रकारांची व्यापारी प्रमाणावर लागवड करतात. पाने कुरळी, निळसर व हिरव्या रंगाची असतात. ठेंगणा व कुरळ्या पानांचा सायबीरियन हा प्रकार परसबागेत लावण्यासाठी सर्वांत चांगला मानला जातो. भारतात मॉसकर्ल्ड हा प्रकार व्यापारी प्रमाणावर लागवड करण्यासाठी योग्य आहे, असे दिसून आले आहे.
बोरकोल हे थंड हवामानात वाढणारे पीक असून ते १०० ते १५० से. एवढे तापमानही सहन करू शकते. तुहिनामुळे (कडाक्याच्या थंडीमुळे) पाने जास्त मऊ व स्वादिष्ट बनतात. या पिकाला कोणत्याही प्रकारची जमीन चालते. उत्तम निचऱ्याच्या निकृष्ट जमिनीतही हे पीक येते. हेक्टरी ८-१० ट्रक शेणखत, १५० किग्रॅ. नायट्रोजन, ५० किग्रॅ. फॉस्फरस आणि तितकेच पोटॅश दिल्यास उत्पन्न भरपूर येते. याचे हेक्टरी सरासरी १०० ते २५० क्विंटल उत्पन्न येते.
उत्तर भारतातील सपाट प्रदेशात ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत बोरकोलचे बी पेरून रोपे ४-६ आठवड्यांची झाल्यावर ४५ x ३० सेंमी. अंतरावर त्यांची पुनर्लागण करण्यात येते. नोव्हेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत पिकाची (पानांची) काढणी करता येते. अमेरिकेत खोड उंच वाढण्याअगोदरच पानांचा गुच्छ कापून घेतात, तर इंग्लंड व युरोपातील इतर देशांत खोड जसजसे वाढेल तसे एकेक पान खुडून काढतात.
संदर्भ : 1. Ahluwalia, S. K. and others, Kole-A Nutritionally Rich Vegetable, Indian Horticulture, October-December, 1979.
2. Thompson, H. C. Kelly, W. C. Vegetable Crops, New York, 1957.
जमदाडे ज. वि.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..