बोरकर, बाळकृष्ण भगवंत : (३० नोव्हेंबर १९१० — ). मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि लघुनिबंधकार. बोरकरांचा जन्म कुडचडे (गोवा) येथे झाला. त्यांचे शिक्षण धारवाड येथे मराठी तीन इयत्ता व इंग्रजी मॅट्रिकपर्यंत (एस्कोला नॉर्मल) झाले (१९२८). पोर्तुगीज टीचर्स
ट्रेनिंग कॉलेजची प्रमाणपत्र परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत. गोव्यातील खाजगी व सरकारी हायस्कूलांत ते शिक्षक होते (१९२९ ते १९४६) काही काळ मुंबईच्या विविधवृत्त पत्रात त्यांनी नोकरी केली १९४६ मध्ये गोव्याच्या स्वातंत्र्य-आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आमचा गोमंतक (१९४८) व पोर्जेचो आवाज (कोकणी, १९५५) या पत्रांचे ते संपादक होते. आकाशवाणीच्या पुणे-पणजी केंद्रांवर, वाङ्मय विभागात, १९५५ ते १९७० पर्यंत काम करून ते निवृत्त झाले. प्रतिभा हा बोरकरांचा पहिला काव्यसंग्रह मडगाव येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनात प्रसिद्ध झाला (१९३०). त्यानंतर जीवन संगीत (१९३७), दूधसागर (१९४७), आनंद भैरवी (१९५०), चित्रवीणा (१९६०), गीतार (१९६६), चैत्रपुनव (१९७०) आणि कांचनसंध्या (१९८१) हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सासाय हा त्यांचा कोकणी काव्यसंग्रह १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला त्या वर्षीचा साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त झाला. १९८१ मध्येच कालिदसकृत मेघदूताचा त्यांनी केलेला समवृत्त, समश्लोकी मराठी अनुवाद प्रसिद्ध झाला. महात्मा गांधीच्या जीवनावर महात्मायन नावाचे महाकाव्य लिहिण्याचा संकल्प बोरकरांनी सोडलेला असून त्याचा काही भाग त्यांनी पूर्णही केलेले आहे. बोरकरांचे व्यक्तिमत्त्व व कवित्व संस्कारबहुल आहे. तसे ते परंपराप्रेमी पण त्यांच्या परंपराप्रेमावर झालेल्या सुभग व रसपूर्ण संस्कारांनी त्यांना ‘कवी’ बनविले. ग्रीकांच्या सौंदर्यदृष्टीचे मर्म पाश्चात्त्य साहित्याच्या अध्ययनाने आणि पौर्वात्य आत्मदर्शनाचे स्वरूप मराठी संतांच्या अभ्यासातून त्यांनी आत्मसात केले. बालकवी आणि विशेषतः तांबे यांच्या कवितेचा आदर्श त्यांच्यापुढे होता. निसर्गसौंदर्य व स्त्रीलावण्य यांच्यामधून बोरकरांना जीवनचैतन्याचा साक्षात्कार होतो. निसर्ग व प्रणय यांची त्यांच्या कवितेतील अनुभूती सर्जनशील व ऐंद्रिय असते. अलौकिकाच्या अंगाने निसर्ग-प्रेम-कला ह्यांतील लौकिक सौंदर्याचे आस्वादन करणे ही त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांच्या शैलीची प्रकृती अलंकरणशील, गेय व संस्कृतनिष्ठ असून त्यांचे संगीतप्रेम त्यांच्या काव्यसंग्रहांच्या नावांतूनही प्रतीत होते. बोरकरांनी काव्यलेखनास आरंभ केला, तो काळ काव्यदृष्ट्या क्षीणबळ व परंपरासौंदर्याच्या अनुभूतीला आचवलेला होता. त्यामुळे त्यांची कविता अधिक पृथगात्म वाटली. त्या पृथगात्मतेच्या उसळत्या उल्हासातून निर्माण झालेल्या काही चिरतरुण, चिररुचिर कविता हीच त्यांची मराठी कवितेच्या क्षेत्रातील संस्मरणीय कामगिरी होय.
बोरकरांच्या कथा प्रियदर्शिनी (१९६०) आणि समुद्रकाठची रात्र (१९८१) ह्या संग्रहांत समाविष्ट झालेल्या आहेत. मावळता चंद्र (१९३८), अंधारातील वाट (१९४३) व भावीण (१९५०) ह्या त्यांच्या तीन कादंबऱ्या होत. यांपैकी भावीण विशेष गाजली. तिची पाच भाषांत भाषांतरेही झाली आहेत. कागदी होड्या (१९३८) या त्यांच्या लघुनिबंधसंग्रहात काव्य व चिंतन यांचा मधुर मिलाफ आढळतो. चांदण्यांचे कवडसे हा त्यांचा ललितनिबंधसंग्रह १९८१ मध्ये प्रसिद्ध झाला. आनंदयात्री रवींद्रनाथ (१९६३) हे टागोरांचे चरित्रही त्यांनी मोठ्या समरसतेने लिहिले आहे. यांखेरीज जळते रहस्य (स्टेफान त्स्वाइखच्या एका कादंबरीचा अनुवाद- १९४५), बापूजींची ओझरती दर्शने (१९५०), आम्ही पाहिलेले गांधीजी (१९५०), काचेची किमया (१९५१), माझी जीवनयात्रा (१९६०), गीता-प्रवचने (१९५८), ईशावास्योपनिषद ही त्यांची भाषांतरित पुस्तके आहेत.
कोकणी ही एक वेगळी भाषा आहे असे त्यांचे मत असून त्यांचे स्वतःचे गीताय, पांयजणां (१९६०) हे कोकणातील काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. बोरकरांना कवितेबद्दल महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक (१९३४), भावीण कादंबरीबद्दल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदक (१९५०), आनंद भैरवी, चित्रवीणा, गीतार, आनंदयात्री रवींद्रनाथ या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषिके, असे सन्मान लाभले आहेत. अलाहाबादच्या साहित्यकार संसदेचे अध्यक्षपद (१९६३), सिलोनला गेलेल्या भारतीय साहित्यिक शिष्टमंडळाचे सदसत्व (१९६३), पणजीच्या ब्रागांझा इन्स्टिट्यूटचे अध्यक्षपद (१९६४), अखिल भारतीय कोकणी परिषदेचे अध्यक्षपद (१९६७), महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (१९७०) अशी गौरवस्थाने त्यांनी भूषविली आहेत. राष्ट्रपतींनी ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे (१९६७). स्वातंत्र्यसंग्रामात बोरकर ह्यांनी केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारतर्फे त्यांना ताम्रपट देण्यात आला (१९७४).
कुलकर्णी, गो. म.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..