मित्र, काशिनाथ रघुनाथ: (२ नोव्हेंबर १८७१–२३ जून १९२०). विख्यात वाङ्‌मयीन नियतकालिक मासिक मनोरंजनचे कर्तबगार संपादक आणि बंगाली-गुजराती कादंबऱ्यांचे अनुवादक. जन्म आजगावचा. त्यांचे औपचारिक शिक्षण मराठी सहावीपर्यंतच झाले होते तथापि रसिकता आणि वाङ्‌मयीन दृष्टी सुजाण होती. १८९५च्या जानेवारी महिन्यात त्यांनी मासिक मनोरंजन सुरू केले. ‘पाश्चात्त्य (ललित) मासिकांचे अनुकरण करून त्यांची सर्व प्रकारची बरोबरी करण्याचे ध्येय’मासिक मनोरंजनाने बाळगिले होते. कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर व कथाकार वि.सी. गुर्जर ह्यांनी ह्या मासिकाचे सहसंपादक म्हणून मित्रांबरोबर काम केले होते.

कविता,गोष्टी,कादंबऱ्या,विनोद, अध्यात्म-ज्ञान, साहित्यसमालोचन, काव्यचर्चा इ. विविध प्रकारचा मजकूर मनोरंजनात प्रसिद्ध होत असे. राम गणेश गडकरी, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, केशवसुत, काशिबाई कानिटकर, वा. व. पटवर्धन, गो. चिं. भाटे असे अनेक साहित्यिक, मित्रांनी आपल्या भोवती गोळा केले होते. नव्या होतकरू लेखकांना-आणि लेखिकांनाही-प्रोत्साहन देऊन त्यांनी तयार केले. दिवाळी अंक काढण्याची प्रथा मनोरंजनाने सुरू केली. ‘वसंत अंक’, ‘हरिभाऊ आपटे अंक’, ‘आगरकर अंक’, ‘अण्णासाहेब कर्वे अंक’ह्यांसारखे विशेषांकही मित्रांनी काढले. गुजराती, बंगाली इ. भाषांतील उत्तमोत्तम लेखनाची भाषांतरे ते प्रसिद्ध करीत. मासिकाच्या अंतरंगाप्रमाणेच बहिरंगाबाबतही ते दक्ष असत. कागद,छपाई,चित्रे इ. बाबतीत त्यांची सौंदर्यदृष्टी दिसते. कथेच्या संदर्भात मनोरंजनाने भरीव स्वरूपाची कामगिरी केली. मित्रांनी प्रसिद्ध केलेल्या कथांतून मराठी कथा विविधांगांनी विकसत गेल्याचे दिसते. कथालेखकांची नावेही एकेकाळी प्रसिद्ध केली जात नसत. ती देण्याची पद्धत मित्रांनी सुरू केली. मराठी भाषेचा अन्य प्रांतीय भाषांशी संबंध जोडण्याच्या कामगिरीचे श्रेयही त्यांना द्यावे लागते.

मित्रांनी स्वतःमुख्यतः  बंगाली – गुजराती पुस्तकांची भाषांतरे केली. त्यांत वंगजागृति अथवा जागा झालेला बंगाल (नाटक–१९०६), धाकट्या सूनबाई (कादंबरी-आवृ. २ री, १९०२), मृणालिनी(कादंबरी-आवृ. २ री, १९०५) आणि प्रियं वदा (कादंबरी-आवृ. ४थी, १९१७) ह्या पुस्तकांचा समावेश होतो. ह्यांपैकी प्रियंवदा ही साहित्यकृती गुजरातीतून अनुवादिली असून अन्य साहित्यकृती बंगालीतून मराठीत आणल्या आहेत. लक्ष्मणमूर्च्छा आणि रामविलाप (१८९६)हा त्यांचा स्वतंत्र ग्रंथ. मुंबई येथे ते निधन पावले.

कुलकर्णी, गो.म.