बोमंट, फ्रान्सिस : (१५८४- ६ मार्च १६१६). इंग्रज नाटककार. जन्म बहुधा लेस्टरमधील ग्रेस-द्यू येथे. ब्रॉडगेट्स हॉल (ह्याचेच नामकरण पुढे पेम्ब्रोक कॉलेज असे झाले), ऑक्सफर्ड येथे काही वर्षे शिक्षण घेतले, तथापि पदवीधर झाला नाही. पुढे कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लंडनच्या ‘इनर टेंपल’ ह्या प्रसिद्ध शिक्षणसंस्थेत त्याने प्रवेश घेतला (१६००). तथापि हे शिक्षणही तो पूर्ण करु शकला नाही. ⇨ जॉन फ्लेचर (१५७९-१६२५) ह्या नाटककाराच्या सहकार्याने बोमंटने नाट्यलेखन केले. फ्लेचरच्या सहकार्याने बोमंटने नेमकी किती नाटके लिहीली, हे निश्चितपणे सांगता येत नसले तरी ती जास्तीत जास्त पंधरा असावीत, असा अंदाज व्यक्त केला जातो. बोमंट आणि फ्लेचर ह्यांची गाढ मैत्री होती आणि सहनाटककार ह्या नात्याने त्यांची नावे परस्परांशी कायमची निगडीत झालेली आहेत. द वूमन- हेटर (१६०७) हे एकच नाटक सर्वस्वी बोमंटचे असावे, असे दिसते. ते सुखात्म असून त्यावर विख्यात इंग्रज नाटककार बेन जॉन्सन ह्याच्या नाट्यशैलीचा प्रभाव दिसून येतो. काहींच्या मते नाइट ऑफ द बर्निंग पेसल (१६०७) ही नाट्यकृती सर्वस्वी बोमंटने लिहिली. तथापि ती बोमंट आणि फ्लेचर ह्यांनी संयुक्तपणेच लिहिली असून, तीत बोमंटचा वाटा सर्वाधिक आहे, असेही मत व्यक्त केले गेल्याचे आढळते. बोमंटची नाट्यदृष्टी इतकी मार्मिक होती, की बेन जॉन्सन हा आपले नाट्यलेखन नेहमीच बोमंटला वाचावयास देऊन त्याच्या सूचना विचारात घेत असे, असे म्हटले जाते. बोमंट आणि फ्लेचर ह्यांच्या नाट्यकृतींचा अभ्यास करून त्यांच्या व्यक्तिगत नाट्यशैलीचे स्वरूप निश्चित करण्याचा प्रयत्न झालेला आहे. वीरविडंबनात्मक (मॉक्-हिरॉइक्) बर्लेस्कपद्धतीचे लेखन हे त्याचे वैशिष्ट्य असल्याचे दिसते. द वूमन-हेटर ह्या नाट्यकृतीत त्याचा प्रकर्षाने प्रत्यय येतो.
लंडनमध्ये त्याचे निधन झाले. त्याचा पार्थिव देह वेस्टमिन्स्टर ॲबीमध्ये पुरण्यात आला आहे.
संदर्भ : 1. Macaulay, George Campbell, Francis Beaumont, a Critical Study, London, 1883.
2. Oliphant, Ernest Henry Clark, Plays of Beaumont and Fletcher, New Haven, 1927.