बोडे, योहान एलर्ट : (१९ जानेवारी १७४७ – २३ नोव्हेंबर १८२६). जर्मन ज्योतिर्विद. ग्रहांच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतरांतील सहसंबंध दर्शविणारा नियम यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. यांचा जन्म हँबर्ग येथे झाला. ज्योतिषशास्त्राचा अभ्यास यांनी स्वतःच केला. १७७२ साली बर्लिन ॲकॅडेमीच्या वेधशाळेत ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून यांची नियुक्ती झाली व १७८६ – १८२५ या काळात हे तिचे संचालक होते. लंडनची रॉयल सोसायटी, तसेच बर्लिन, स्टॉकहोम, कोपनहेगन व गटिंगेन येथील कॅडेमीचे हे सदस्य होते.

योहान डॅनियल टिटियस यांनी ग्रहांची सूर्यापासूनची सरासरी अंतरे काढता येतील, असा एक नियम शोधून काढला (१७६६) परंतु तेव्हा त्याच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. बोडे यांनी त्यात सुधारणा करून १७७२ साली त्याला बरीच प्रसिद्धी दिल्याने त्याच्याकडे ज्योतिर्विदांचे लक्ष वेधले गेले म्हणून त्याला टिटियस-बोडे अथवा नुसते बोडे नियम असे म्हणण्यात येऊ लागले. या नियमाने पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतर एक धरुन याच्या पटीत इतर ग्रहांची अंतरे येतात. याविषयीचे या नियमाचे सविस्तर वर्णन ‘ग्रह’ या लेखात दिले आहे. त्यावरुन वरुण व कुबेर वगळता इतर ग्रहांना हा नियम ढोबळपणे लागू पडत असल्याचे दिसते. हा नियम पुढील सूत्रानेही दर्शविला जातो. ग्रहाचे अंतर = ०.४ + (०.३ × २न) ज्योतिषशास्त्रीय एकक (बुधासाठी न = – ∞, शुक्रासाठी न = o, पृथ्वीसाठी न = १ वगैरे ज्योतिषशास्त्रीय एकक म्हणजे सूर्य व पृथ्वी यांतील सरासरी अंतर होय या नियमापूर्वी मंगळ व गुरु यांच्यामधील (न = ३) स्थानासाठी खस्थ पदार्थ माहीत नव्हता परंतु १८०१ साली या ठिकाणी सेरस व नंतर इतर ⇨ लघुग्रह आढळले. तसेच हा नियम जाहीर झाल्यानंतरच १७८१ साली सापडलेल्या प्रजापतीलाही हा नियम लागू पडल्याचे आढळले. अशा तऱ्हेने लघुग्रहांच्या शोधात व प्रजापती हा ग्रह असल्याचे निश्चित करण्यास या नियमाचा उपयोग झाला. तथापी वरुण व कुबेर यांची या नियमानुसार येणारी अंतरे प्रत्यक्ष अंतरापेक्षा बरीच जास्त आहेत. या नियमाला शास्त्रीय आधार असल्याचे अजून तरी आढळलेले नाही म्हणजे इतर ग्रहमालांना तो लागू पडेलच असे नाही.

याशिवाय बोडे यांनी अचूक ग्रहपंचांग बनविण्यास मदत केली. तसेच नाविक पंचांगासारख्या Astronomisches Jaharbuch या वार्षिकाची स्थापना करून त्यांनी मृत्यूपावेतो याचे ५१ अंक संकलित केले. विल्यम हर्शेल यांनी शोधलेल्या ग्रहाला युरेनस (प्रजापती) हे नाव त्यांनीच सुचविले होते. त्या काळात ज्योतिषशास्त्रावर लेखन करणाऱ्यांमध्ये ते प्रमुख होते व त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. शिवाय अभ्रिका, तारकागुच्छ, युग्मतारे, तारे इ. १७,२४० खस्थ पदार्थांच्या यादीसह असलेल्या युरॅनोग्राफिया हा २० नकाशांचा आणि ५,००० ताऱ्यांचा आणखी एक असे दोन नकाशासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केले होते. बर्लिन येथे ते मृत्यू पावले.

पहा : ग्रह.

मोडक, वि. वि.