बेल्जियम : यूरोपमधील एक देश. ४९० ५०’ ते ५१० ५०’ उ. अक्षांश व २० ते ६० पू. रेखांश यांदरम्यान पसरलेल्या या देशाचे क्षेत्रफळ ३०,५१९ चौ. किमी. व लोकसंख्या सु. ९८,५५,११० होती. (१९७९). देशात लोकवस्तीची घनता जास्त आहे. देशाच्या फ्लेमिश व फ्रेंच या दोन अधिकृत भाषा आहेत, की ‘यूरोपची रणभूमी’ म्हणूनच हा देश ओळखला जातो. याच्या उत्तरेस नेदरर्लंड्स, पूर्वेला प. जर्मनी, आग्नेयीला लक्सेंबर्ग व दक्षिणेला फ्रान्स हे देश आहे. पश्चिमेला उत्तर समुद्राची ६७ किमी. लांबीची किनारपट्टी आहे. प्राचीन काळात या प्रदेशात राहणाऱ्या बेल्गा जमातीच्या लोकांवरून बेल्जियम हे नाव पडले. राजधानी ब्रूसेल्स (उपनगरांसह लोकसंख्या १०,०८,७१५ -१९८०).
भूवर्णन : पश्चिम यूरोपमधील मैदानी प्रदेशात ब्रल्जियमचा अंतर्भाव होत असला, तरी भूरचनेनुसार त्याचे तीन प्रादेशिक विभाग पडतात : (१) उत्तरेकडील मैदानी प्रदेश व कमी उंचीची पठारे, ( २) आर्देन पठार व (३) बेल्जियम लॉरेन. उत्तरेकडील मैदानी प्रदेशात उत्तर समुद्राची किनारपट्टी व सॅंब्रा आणि म्यूज या नद्यांच्या खोऱ्यांपर्यंतचा प्रदेश मोडतो. किनाऱ्यालगत वाळूचे दांडे आहेत व त्यांमाग्र ‘पोल्डर’ या नावाने ओळखला जाणारा पुनःप्रापित भाग आहे. पोल्डर सर्वसाधारणपणे सपाट असून अनेक पाट त्यांमधून वाहतात. पोल्डरच्या दक्षिणेला भूभाग उंचावत गेलेला असून या भागात एनो, ब्राबांट व हेसबे ही १०० ते २०० मी. उंचीची पठारे आढळतात. पोल्डर व ही पठारे यांच्यामधील वालुकामय प्रदेशाची निर्मिती वारंवार येणाऱ्या पुरांतील गाळांमुळे झालेली असून मातीयुक्त भाग चतुर्थफ काळातील पदीच्या खननकार्यामुळे निर्माण झालेला आहे. केम्पनलॅंड या आणखी एका भागाची निर्मिती अशीच म्येज नदीने चतुर्थक काळात वाहून आणलेल्या गाळामुळे झालेली आहे.
सॅंब्रा, म्युज या खोऱ्यांच्या दक्षिणेस इतर दोन प्रादेशिक भाग मोडतात. आर्देन पठाराची उंची साधारणपणे २०० ते ५०० मी. पर्यंत आहे. प. जर्मनीच्या सरहद्दीपाशी त्याची उंची सर्वांत जास्त ७०० मी. आहे. या पठाराचे अनेक उपविभाग पडतात, त्यांपैकी काँद्रॉझ पठार विशेष महत्त्वाचे आहे. काही कमी उंचीची पठारे आहेत. हर्सेनियन काळात निर्माण झालेल्या फ्रान्समधील याच नावाच्या डोंगराळ प्रदेशाचाच हा भाग डीव्हानीअन व कॅंब्रियन काळांतील खडकांचा बनलेला आहे. बेल्जियन लॉरेन हाही लॉरेनचा विस्तार असून त्याची उंची काही ठिकाणी ६५० मी. पेक्षाही जास्त आढळते.
देशातील उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा चतुर्थक काळात निर्माण झालेल्या खडकांचा आहे. दक्षिणेकडील भागात अधिक विविधता आढळते. सुपीक लीआँ किंवा लोएस मृदा एनो, ब्राबांट व हेसबे या बेल्जियम तिन्ही पठारांवर आढळते. पण पहिल्या दोन पठारांवर त्याच्याखाली तृतीयक काळातील वालुकाश्म व पुराजीव महाकल्पकाळातील आच्छिद्र खडक, तर हेसबे पठारावर त्याच्याखाली चुनखडक आढळतात. आर्देन पठाराच्या काही भागात शैल आढळतो. तर बेल्जियम लॉरेनमध्ये वालुकाश्म आणि चुनखडकाबरोबरच शेल व मार्ल सापडतात.
नद्या : देशात अनेक लहानमोठ्या नद्या आहेत. स्केल्ट ही येथील प्रमुख नदी नेदर्लंड्समध्ये वाहत जाऊन उत्तर समुद्रास मिळते. म्येज व सॅंब्रा या नद्या फ्रान्समध्ये उगम पावून पुढे नेदर्लंड्समध्ये जातात. लीस व ईश्वर या दोन महत्त्वाच्या नद्या होत. तृतीयक काळातील भूकवचाच्या हालचालींमुळे या नद्यांचे पुनर्युवीकरण झाले व म्हणून या नद्या डोंगराळ भागात खोल दऱ्यांतून वाहतात. सपाट पोल्डर प्रदेशात त्यांना अनेक फाटे फुटून अनेक पाट तयार झालेले आढळतात.
मृदा : डुडाल, टॅव्हर्निअर व ओसमॅंड यांनी फाओकरिता काढलेल्या नकाशात या देशात नऊ प्रकारच्या मृदा, त्यापेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात ब्राउन फॉरेस्ट अग्ल मृदा देशात अधिक प्रमाणात आढळते. हा थंड प्रदेशातील या मृदेचे अनेक प्रकार आढळतात. नदीखोऱ्यांत व किनारपट्टीत गाळाची जमीन आहे.
खनिज संपत्ती : दगडी कोळशासाठी हेन -सॅंब्रा म्यूजची खाण तेराव्या शतकापासून प्रसिद्ध आहे, तर केम्पन खाणीतून विसाव्या शतकाच्या दुसऱ्या – तिसऱ्या दशकांत कोळसा उत्पादन सुरू झाले. दक्षिणेत हालन्झीजवळ लोहखनिजाचे साठे आहेत, पण राष्ट्रीय मागणीच्या फक्त सात % पुरवठा त्यांद्वारे होतो. एकोणिसाव्या शतकात बेल्जियम जस्त उत्पादनात अग्रेसर होता. आता ते साठे संपुष्टात आले आहेत. तूर्ने व माँझच्या पूर्वेस व ल्येझच्या दक्षिणेस चॉक व चुनखडक यांचे फार मोठे साठे असल्याने सिमेंटनिर्मितीस चालना मिळाली आहे. केम्पनलॅंडमध्ये सिलिकायुक्त पांढऱ्या वाळूच्या साठ्यांमुळे काचनिर्मितीदेखील होते. चिनी माती पश्चिम आर्देनमध्ये लीर्बी येथे आढळते केम्पनलॅंडमधील तर्नाउट येथे आणि ऱ्यूपल व नेट या नद्यांच्या खोऱ्यांमध्ये वीट-निर्मितीकरिता उपयुक्त माती मिळते. बांधकामाकरिता लागणाऱ्या दगडाच्या खाणी स्वान्यी, स्प्रीमाँ येथे थोड्या प्रमाणात आढळतात. संगमरवर झॅंब्लू आणि फिल्पिव्हील, तर रस्ते बांधकामाकरिता लागणारे पॉर्फिरी लेसीन व कना येथे मिळते.
जलसंपत्ती : देशातील भूजलसाठ्याचे प्रादेशिक वितरण असमान आहे. भूजलाचे तीन चतूर्थांश साठे दक्षिण भागात आहेत. राष्ट्रीय जलपुरवठा संघटना व प्रादेशिक जलपुरवठा मंडळातर्फे पाण्याचे वितरण केले जाते. भूपृष्ठावरील जलसंपत्ती म्हणून नद्या, कालवे, जलाशय, विशेषतः म्यूज नदी महत्त्वाची आहे. स्केल्ट नदीच्या काही भागात खारट पाणी असल्याने तिचा उपयोग मर्यादित प्रमाणात होतो. कारखान्यांतील प्रशीतक संयंत्रामध्ये ९५ % नद्यांचे व कालव्यांचे पाणीच वापरले जाते. हे पाणी पुन्हापुन्हा येते. ॲल्बर्ट कालवा हाही पाणीपुरवठ्याचे महत्त्वाचे साधन आहे.
पाण्याचा अपुरा पुरवठा, असमान वितरण, नेदर्लंड्सला स्केल्टऱ्हाईन करारान्वये करावा लागणारा पाणीपुरवठा व वाढती मागणी यांवर मात करण्यासाठी जी उपाययोजना केली जात आहे, तीत ॲल्बर्ट कालव्याचे रूंदीकरण अंतर्भूत आहे. त्यामुळे अँटवर्प व लिंबर्ग या प्रांतांना अधिक पाणीपुरवठा होईत. औद्योगिक केंद्रस्थान व नगरपालिका असणाऱ्या सर्व ठिकाणी अशुद्ध पाणी किंवा सांडपाणी शुद्ध करण्याची केंद्रे स्थापून त्यांयोगे पाणीपुरवठ्यात वाढ करणे हा दुसरा तोडगा होय. मध्यवर्ती शासन अशा केंद्रांच्या खर्चाच्या ८० % भार उचलते, पण यात काही प्रशासकीय अडचणी येत आहेत. अधिक जलाशय बांधणे हा आणखी एक तोडगा आहे.
हवामान : हा देश थंड, समशीतोष्ण हवामानाच्या सागरी प्रदेशात मोडतो. उष्ण गल्फ प्रवाहावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे देशाचे हवामान उबदार बनते. पण भूरचनेनुसार झालेल्या स्वाभाविक प्रदेशांमुळे हवामानातही फरक पडतो. जानेवारीत उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील तपमान २० से. प्रक्षाही कमी असते, तर आग्नेयीस लक्सेंबर्गच्या सरहद्दीवरील प्रदेशात ते ०० से. पेक्षाही कमी असते. जुलैमध्ये उत्तरेकडील प्रदेशात ते १६० से. पर्यंत चढते व आग्नेयीस ते त्यापेक्षा कमी असते. स्केल्ट खोऱ्यात सर्वांत जास्त म्हणजे १८० से. तपमान असते. पावसाचे प्रमाणही सर्वसाधारणपणे वायव्येकडून (८० सेंमी.) आग्नेयीकडे (१४० सेंमी.) वाढत जाते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी यांदरम्यान वादळी पाऊस पडतो.
वनस्पती व प्राणी : देशाच्या २०% भागात वनसंपत्त् आढळते. आर्देन आणि केम्पनलॅंड या प्रदेशात वनसंपत्ती अधिक आहे. कमी उंचीच्या प्रदेशात पानझडी, तर अधिक उंचीच्या प्रदेशांत सूचिपर्णी वनस्पती आढळतात. काँद्रॉझ पठारावर ओक, आर्देनच्या दक्षिण उतारावर व बेल्जियन लॉरेनच्या जुरासिक टेकडयांवर बीच व स्प्रूस, केम्पनलॅंडमध्ये सिल्व्हर बर्च व कॉर्सिकन पाइन प्रामुख्याने आढळतात. देशातील ६५ % वनक्षेत्राची मालमी व व्यवस्था सरकारी आहे.
बेल्जियमच्या दऱ्याखोऱ्यांत डिजिटॅलीस पुर्पुरिया, स्ट्रॉबेरी, गोल्डन रॉड, लिली, रान अळू इ. वनस्पती व फुलझाडे सापडतात. त्यांपैकी डिजिटॅलीस ही ह्नदयविकारावरील एक उपयुक्त औषधी वनस्पती होय. जंगल भागात ओक व बीच हे वृक्षप्रकार प्रामुख्याने आढळतात. देशात विशेषेकरून राजडुकरे, कोल्हे, बिजू, विविध प्रकारच्या खारी, बीझल, मार्टिन, जाहक यांसारखे प्राणी आढळतात. उत्तर समुद्र व देशातील नद्या यांतून पाईक, कार्प, ट्राउट, ईल, बार्बल, पर्च, चब, रोच, ब्रीम, शॅड, फ्लाउंडर, चपट्या प्रकारचा सोल, झिंगे, कोळंब्या इ. प्रकारचे मासे मिळतात.
इतिहास : इ.स. पू. ५०० च्या सुमारास बेल्गा जमातींनी विद्यमान बेल्जियमच्या प्रदेशात वस्ती केली. इ.स.पू. ५० मध्ये रोमन लोकांनी हा प्रदेश व्यापला. पुढील सु. ४५० वर्षे येथे रोमन अंमल होता. इ.स. ४०७ मध्ये देशाच्या उत्तरेकडील भागातून रोमन लोकांनी अंग काढून घेतले व तेथे जर्मन लोकांनी वसाहत केली. पुढे मेरोव्हिन्जिअन राजाने बेल्जियमसहित सर्व गॉल प्रदेशाचे एकत्रिकरण केले (५००). शार्लमेनच्या कारकीर्दीत (७६८-८१४) हा पवित्र रोमन साम्राज्याचा भाग बनला. शार्लमेननंतर त्याच्या साम्राज्याचे तुकडे पडले व ८४३ मध्ये बेल्जियम लॉथरिंजाचा भाग बनला. जर्मनीने लॉथरिंजाचा भाग बळकाविल्यानंतर (८७९) तेथे बाराव्या शतकापर्यंत स्थानिक सरदारांचीच सत्त होती. १३०२ मध्ये फ्लेमिश लोकांनी फ्रेंचांचा पराभाव करून आपले स्वातंष्य टिकविले. १३४६ मध्ये ल्वी ऑफ माले फ्लँडर्सचा काउंट झाला.
ल्वीची वारस मार्गारेट हिने फिलिप द बोल्ड या बर्गंडीच्या ड्यूकशी विवाह केल्यावर १३६९ मध्ये बर्गंडियन कालखंड सुरू झाला व तो १४८२ पर्यंत टिकला. या कालखंडात अनेक लहानमोठी राज्ये बर्गंडीच्या ताब्यात आली. १४७७ मध्ये या राजकुटुंबातील मेरीचे लग्न मॅक्सिमिल्यन याच्याशी झाले. १४८२ साली मेरीचे निधन होऊन मॅक्सिमिल्यनच्या हॅप्सबर्ग घराण्याची कारकीर्द सुरू झाली. सम्राट मॅक्सिमिल्यनचे राज्य सखल प्रदेशात ‘लो कंट्रीज’ म्हणजे विद्यमान बेल्जियम, नेदर्लंड्स व लक्सेंबर्ग या देशांवर होते. या घराण्यातील दुसरा फिलिप १५५५ मध्ये स्पेनचा राजा झाला व बेल्जियम स्पॅनिश नेदर्लंड्सचा एक भाग बनले. डच व फ्लेमिश लोकांनी १५७६ मध्ये जुलमी स्पॅनिश राजवटीविरूद्ध बंड केले. नेदर्लंड्स स्वतंत्र झाले. पण स्पेनने फ्लँडर्स जिंकले व अँटवर्प आणि इतर शहरांचा विध्वंस केला. १६४८, १६५९,१६६८ व १६७९ या वर्षी झालेल्या लढायांत स्पेनचा बराच भाग फ्रान्सने व्यापला. १७१४ मध्ये बेल्जियम ऑस्ट्रियन हॅप्सबर्ग घराण्याच्या ताब्यात आले. १७९० मध्ये ऑस्ट्रियन अधिपत्याखालील लक्सेंबर्ग वगळता सर्व प्रांतांनी ‘युनायटेड स्टेटस ऑफ बेल्जियम’ ही संघटना स्थापन केली. पण दोनच वर्षांत ती कोसळली. १७९४ मध्ये फ्रेंचांनी ऑस्ट्रियनांचा पराभव केल्यावर बेल्जियमचा फ्रेंच प्रजासत्ताकात समावेश झाला. नंतर लंडनच्या तहानुसार १८१५ बेल्जियमचा नेदर्लंड्समध्ये समावेश झाला.
बेल्जियम १८१५ पासून नेदर्लंड्सचा एक भाग होता. २५ ऑगस्ट १८३० रोजी ब्रूसेल्समध्ये नेदर्लंड्सविरूद्ध बंडाची लाट उसळली व परिणामतः तेथे स्थापन झालेल्या हंगामी सरकारने नेदर्लंड्सपासून या देशाला स्वतंत्रकरण्याचा निर्णय घेतला ४ ऑक्टोबर १८३०. त्यानंतर स्थापन झालेल्या नॅशनल काँग्रेसने सॅक्स कोबर्गचा राजपुत्र लिओपोल्ड यास राजा म्हणून ४ जून १८३१ रोजी निवडले व २१ जुलै १८३१ रोजी त्याचा रीतसर राज्याभिषेक होऊन बेल्जियममध्ये राजेशाही स्थापन झाली. लंडनच्या तहान्वये १५ नोव्हेंबर १८३१ ऑस्ट्रिया, रशिया, ग्रेट ब्रिटन, प्रशिया यांनी या नवजात राष्ट्राच्या स्वतंत्रतेची हमी दिली. तथापि पहिला लिओपोल्ड व नेदर्लंड्सचा राजा यांच्यात १९ एप्रिल १८३९ रोजी शांततेचा तह होईपर्यंत यूरोपातील इतर राष्ट्रांनी बेल्जियमला अधिकृत मान्यता दिली नव्हती.
बेल्जियमच्या औद्यागिक प्रगतीचा पायाही पहिल्या लिओपोल्डनेच घातला. त्याने इतर देशांशी व्यापारी करार केले. त्यांच्या निधनानंतर १८६५ दुसरा लिओपोल्ड गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत १८६५-१९०९ आफ्रिकेतील काँगो विद्यमान झाईरे ब्रल्जियमच्या ताब्यात आले १९०८. पहिल्या महायुद्धात १९१४ साली जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केला, त्यावेळी पहिला ॲल्बर्ट कार. १९०९-३४ राज्यावर होता. १९२६ मध्ये लोकार्नो तहान्वये देशाच्या सरहद्दी निश्चित करण्यात आल्या. १९३४ साली पहिल्या ॲल्बर्टचे निधन झाले. त्यानंतर तिसऱ्या लिओपोल्डची कारकीर्द सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने १९४० मध्ये बेल्जियमवर चाल केली असता, ब्रिटन-फ्रान्स यांच्याकडून त्यानं मदत मागण्याचे नाकारले व जर्मनांपुढे शरणागती पत्करली. तथापि बेल्जियन राष्ट्रवाद्यांनी परदेशात सरकार स्थापले. जर्मनीच्या पाडावानंतर १९४५ राजाच्या भवितव्याबद्दल मतभेद झाले, तथापि सार्वमतानंतर १९५० मध्ये देशात राजसत्ता स्थापन झाली पुढच्याच वर्षी विरोधामुळे लिओपोल्डने राज्यत्याग केला. त्यानंतर त्याचा मुलगा पहिला बोदवॅन गोदीवर आला. त्याच्या कारकीर्दीत काँगोला १९६० मध्ये स्वातंत्र्य देण्यात आले व १९७० मध्ये त्याच्याशी मैत्रीचा तह करण्यात आला.
फ्रेंच भाषिक वालोन व डच भाषिक फ्लेमिंग या दोन भाषिक गटांतील अखंड संघर्ष हा द्वितीय महायुद्धोत्तर बेल्जियमचा एक जटिल प्रश्न आहे. त्यातच उत्तर व दक्षिण अशाही प्रादेशिक वादाची भर पडलेली आहे. देशातील ख्रिश्चन सोशल पार्टी आणि राष्ट्रवादी या पक्षांचा प्रभाव उत्तर भागात, तर वालोनियाच्या दक्षिण भागात समाजवाद्यांचा प्रभाव आढळतो. प्रादेशिक स्वायत्ततेची सतत होणारी मागणी आणि तिच्या पूर्ततेसाठी वरचेवर केली जाणारी वैधानिक कार्यवाही, यांमुळे राजकीय .ष्ट्या बेल्जियममधील शासन संघराज्यात्मकतेकडे झुकत आहे. १९७१ साली तत्कालीन सरकारने संविधानात्मक सुधारणा करून प्रत्येक भाषिक विभागासाठी मर्यादित सत्ता असणाऱ्या सांस्कृतिक समित्या स्थापन केल्या १९७२ मध्ये सत्तेवर आलेल्या ख्रिश्चन सोशल, समाजवादी व लिबरल या पक्षांच्या आघाडी सरकारने प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने आणखी काही सवलती जाहीर केल्या. आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात यावेळी प्रथमच जर्मन भाषिकांचा प्रतिनिधीही घेण्यात आला. १९७३ साली केंद्रीय सरकारमध्ये सर्व भाषिक गटांतील समतोल निर्माण करण्यात आला. १९७४ साली प्रादेशिक समित्या व मंत्र्यांच्या एका विधेयकाद्वारे स्थापन करण्यात आल्या. या भाषिक संघर्षाची तीव्रता तरीही कमी झाली नसल्याचे १९७६ मधील नगरपालिकांच्या निवडणुकांवरून दिसून आले १९७७ साली देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. त्यांत ख्रिश्चन सोशल पक्षाला मोठे यश लाभले. लिओ टिंडेमान्स यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष तसेच समाजवादी व दोन भाषिक पक्ष यांचे आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारने फ्लॅंडर्स, वालोनिया व ब्रूसेल्स असे तीन राजकीय आर्थिक प्रदेश स्थापून ते त्या त्या प्रदेशांतील निर्वाचित सदस्यांच्या समित्यांमार्फत व दोन भाषिक गटांच्या मार्फत चालवावेत, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावरनुसार बेल्जियमचे शासन संघराज्यात्मक ठरून पूर्वीपासून चालत आलेले नऊ प्रांतांचे प्रशासन संपुष्टात आले असते. १९७८ सालीच या प्रस्तावानुसार कसलीही कार्यवाही न झाल्याने संकल्पित प्रादेशिक शासनव्यवस्थेची समस्या अधिकच तीव्र बनली. जून १९७८ मध्ये टिंडेमान्सने राजीनामा दिला. तथापि हे वर्ष संपण्यापूर्वीच सत्तेचे प्रादशिक विभाजन करण्याचे विधेयक आणण्याचे ठरल्यानंतर टिंडेमान्स त्या पदावर राहिला. तथापि या विधेयकासंबंधीच तीव्र मतभेद निर्माण झाले. या वातावरणात टिंडेमान्सने राजीनामा दिला. त्यावेळचा संरक्षण मंत्री पॉल हॅन्डेन बोएनन्टस हा त्यानंतर पंतप्रधान झाला. डिसेंबर १९७८ मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, परंतु त्यांत निर्णायक बहुमत कोणत्याच पक्षाला लाभले नाही. त्यामुळे आघाडीचे सरकार या देशाला याही वेळी टाळता आले नाही. मार्च १९८१ मध्ये जे आघाडीचे सरकार होते, त्याचे नेतृत्व डॉ. विलफ्रिड मार्टेन्स या ख्रिश्चन सोशल पार्टी या पक्षाच्या नेत्याकडे होते.
राज्यव्यवस्था : १८३१ च्या संविधानानुसार देशात वंशपरंपरागत राजेशाही असून कार्यकारी सत्ता नाममात्र राजाच्या हाती असली, तरी तिचा प्रत्यक्ष वापर मंत्रिमंडळाकडून होतो. पंतप्रधानाची नेमणूक राजाच करतो व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो. वैधानिक सत्त राजा व द्विसदनी संसद सीनेट व लोकप्रतिनिधी यांच्याकडे आहे. गादीच्या वारसांसंबंधीदेखील संविधानात तरतुदी आहेत. वैधानिक सत्तेबद्दल १९२१ साली संविधानदुरूस्ती करण्यात आली. सीनेट व लोकप्रतिनीधीगृह यांतील सदस्यांची निवड सार्वत्रिक गुप्त मतदानपद्धतीने होते. सीनेटमध्ये १८१ सभासद होते. १९८०. त्यांची मुदत ४ वर्षे असते. त्यांपैकी १०६ सदस्य सार्वत्रिक प्रौढ मतदानाने, ५० सदस्य प्रांतिक समित्यांमार्फत निवडले जातात, तर २५ सदस्य निर्वाचित सदस्यांनी स्वीकृत करावयाचे असतात. १९८० साली लोकप्रतिनिधिगृहात २१२ सदस्य होते. त्यांचीही मुदत चार वर्षे असते. राजाला खास कारणासाठी या दोन्ही गृहांची बैठक बोलावता येते किंवा त्यांपैकी कोणतेही गृह अथवा दोन्ही गृहे बरखास्त करता येतात. बरखास्तीनंतर ४० दिवसांत नवीन निवडणुका घ्याव्या लागतात.
देशातील १९७८ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील राजकीय पक्षांचे बलाबल पुढीलप्रमाणे होते : सीनेट : ख्रिश्चन सोशल पार्टी ४१, बेल्जियन सोशॅलिस्ट पार्टी ३१, फ्रीडम अँड प्रोग्रेस पार्टी ४१, इतर पक्ष २३. लोकसभा : ख्रिश्चन सोशल पार्टी ८२, बेल्जियन सोशॅलिस्ट पार्टी ५८, फ्रीडम अँड प्रोग्रेस पार्टी २२ इतर पक्ष ५०.
न्याय व संरक्षण : देशातील न्यायव्यवस्था व घटनात्मक दृष्टीने स्वतंत्र व स्वायत्त् आहे. न्यायाधीशांची नेमणूक राजा करतो व ती तहहयात असते. १९६७ च्या अधिनियमान्वये जिल्हा न्यायालयातील दिवाणी प्रक्रिया संहितेचे सुसूत्रीकरण करण्यात आले. त्याच प्रमाणे न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रांचीही पुनर्रचना करण्यात आली. कॅंटन, जिल्हा, प्रादेशिक व राष्ट्रीय अशा चार स्तरांवर चढत्या क्रमाने न्यायव्यवस्थेची रचना केलेली आहे. देशात ५ प्रादेशिक अपील न्यायालये, ५ प्रादेशिक कामगार न्यायालये असून प्रत्येक प्रांतात एक मुख्य न्यायालय असते. देशात सर्वोच्च न्यायालय असून ब्रुसेल्स येथे सैनिकी न्यायालयही आहे. देशात न्यायाधिकरणेही आहेत.
दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात यूरोपीय सहकार्य व संघटना यांचा एक प्रभावी पुरस्कर्ता देश म्हणून बेल्जियमने महत्त्वाचे कार्य केले आहे. १९५० पासून तो नाटो संघटनेचा सदस्य आहे. यूरोग्रुप, कौन्सिल ऑफ यूरोप, ईईसी यूरोपियन इकॉनॉमिक कम्येनिटी, इंडिपेंडन्ट यूरोपियन प्रोग्रॅक ग्रूप यांसारख्या अनेक संघटनांचाही तो सदस्य आहे.
देशात सैनिकी सेवा सक्तीची आहे. १९७८ साली देशात भूसेना ६३,५००, नौसेना ४,६००, व वायुसेना २०,००० होती. तिन्ही दले अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज् आहेत.
अर्थिक स्थिती : शेती : पश्चिम यूरोपमधील ब्रिटनखेरीज ज्या देशांत शेतीव्यवसाय गौण आहे, त्यांत बेल्जियमचा क्रमांक वरचा लागतो. १९७६ साली देशात १,२६००० शेतकरी होते व ती संख्या एकूण कामगारांच्या फक्त ३.४ % होती, देशातील एकूण उत्पादनापैकी शेतीचा वाटा फक्त ३.५ % होता. शेतीखालील एकूण जमीन १४,४६,९८८ हे. होती १९७८. त्यांपैकी ५२ % जमीन पिकांखाली व ४७ % जमीन चराईकरिता वापरली जात होती.
देशातील १९७८ मधील शेतीउत्पादन पुढीलप्रमाणे होते टनांत : गहू ९,५६,४७६, बार्ली ७,६४,८८४, ओट १,३६,११४, राय५७, १२३, बटाटे १२,६१,८२१, साखरबीट ५२२४२१७, बीट १९,५३,६८५, तंबाखू१, ५७८, त्याच वर्षी देशात पशुधन पुढीलप्रमाणे होते : घोडे ४६,०००, गोधन ३०,१९,०००, मेंढ्या १,०७,०००, बकऱ्या ६,०००, डुकरे ५०,२६,०००, अंबाडी, साखरबीट, फळे ही प्रमुख उत्पादने असून दुधदुभत्यांचे उत्पादनही समाधानकारक आहे.
ऊर्जा व इंधन : कोळसा, तेल व नैसर्गिक वायू या तीन महत्त्वाच्या इंधनांच्या १९७५ मध्ये करण्यात आलेल्या वापराचे प्रमाण अनुक्रमे २२%, ५४% व २०% होते. कोळशाचे सर्वांत जास्त उत्पादन ३ कोटी टन १९५५ मध्ये झाले होते, तथापि १९७८ मध्ये ते फक्त ६५,९०,२६८ टन झाले. त्यापैकी जवळजवळ ८०% उत्पादन केम्पेन खाणीमधून होत असते. बॉरीनाझ सेंटर, शर्लर्वा व नाभुर येथे उरलेले उत्पादन होते. कोकच्या उत्पादनाकरिता केम्पेन खाणीतील कोळसा वापरला जातो. ल्येझमध्ये सर्वांधिक कोकभट्ट्या आहेत. अमेरिका व इतर यूरोपीय देशांतून येणाऱ्या कोळशावर येथील कोकभट्ट्या फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्यामुळे उत्तर समुद्र व कालवे या वाहतुकीच्या मार्गावरही कोकभट्ट्या दिसतात. १९५० नंतर कोकच्या उद्योगधंद्यात आमूलाग्र बदल झाले. १९७८ मध्ये देशात कोकचे उत्पादन ५७,४७,१९२ टन होते
कोकभट्ट्यांतून १९७५ मध्ये नैसर्गिक वायूचे ७०,३०,००००० घ.मी. उत्पादन झाले. १९६२ पासूनच आयात कराव्या लागणाऱ्या नैसर्गिक वायूचे प्रमाण वाढत आहे. १९७५ मध्ये नेदर्लंड्सकडून ११.७ कोटी घ.मी. नैसर्गिक वायू आयात करावा लागला. फ्रान्स आणि नेदर्लंड्स यां दरम्यानच्या नळमार्गातून १९६७ मध्ये एक शाखा काढण्यात आली असून ती तर्नाउट ते मॉन्झदरम्यान आहे. हिच्या उपशाखा ब्रूसेल्स, नामुर, शार्लर्वा या शहरांपर्यंत जातात. तेलशद्धीकरण प्रक्रिया पाच कारखान्यांतून चालते. अँटवर्प, गेंट येथील प्रत्येकी आणि फलुईमधील एक अशा या पाच कारखान्यांतून १९७६ मध्ये २,८४,००,००० टन तेलाचे शुद्धीकरण करण्यात आले. अशुद्ध तेलाचा पुरवठा द. नेदर्लंड्समधील रॉटरडॅममधून निघणाऱ्या नळमार्गाद्वारे होतो. वर्षाला या देशाला १,८०,००,००० टन अशुद्ध तेल आयात करावे लागते. १९७८ मध्ये विद्युत्निर्मिती सु. ४८,३५.७० कोटी कि. वॉ. ता. होती. १९७६ मधील एकूण वीजनिर्मितीपैकी १६ % अणुविद्युत् ०.७ % जलविद्युत् व उरलेली औष्णिक वीजनिर्मिती होती. बेल्जियममधील कमी प्रतीच्या कोळशाचा औष्णिक वीजनिर्मितीच्या कामी चांगला उपयोग होतो.
उद्योगधंदे : बेल्जियममध्ये लोह किंवा अलोह अशुद्ध खनिजांचे साठे नाहीत. आयात केलेल्या अशुद्ध लोहखनिजावर लोखंड व पोलाद कारखाने अवलंबून आहेत. पोलाद निर्माण करणारा जगातील हा एक अग्रेसर देश आहे. १९७८ मध्ये घडीव पोलाद व पोलाद यांचे उत्नादन अनुक्रमे १,२६,०४,२४० व ९६,९६,१७७ टन होते. सॅंब्रा व म्यूज या नद्यांच्या खोऱ्यांत लोखंडाचे साठे, चुनखडक व जंगले यांच्या परिसरांतच पोलादाचे कारखाने प्रथम स्थापन झाले. ल्येझ व शार्लर्वा येथील भट्ट्या उदध्वस्त झाल्यावर या उद्योगधंद्यांचे आधुनिकिकरण झाले. १९२९ च्या जागतिक मंदीमुळे उत्पादन घटले. याच काळात टॉमस व एल. डी. या पोलाद निर्मितीच्या प्रक्रियांचा वापर केला जाऊन पोलादाचे उत्पादन वाढले. आज सॅंब्रा-म्यूज या खोऱ्यांव्यतिरिक्त झेल्झाट येथेही पोलादाचे उत्पादन होते. वाढता उत्पादनखर्च, मर्यादित अंतर्गत बाजारपेठ, स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, काही प्रमाणात जुने कारखाने व कामगारांचा तुटवडा हे येथील लोखंड पोलाद उद्योगधंद्यातील गुंतागुंतीचे प्रश्र्न आहेत. १९७८ साली इतर उत्पादन पुढीलप्रमाणे होते (उत्पादन टनांत) : ब्रिकेट १,२४,४९६, कोक ५७,४७,१९२, ओतीव लोखंड १,०१,२७,९९६.
बेल्जियममध्ये तांबे, जस्त, शिसे, कोबाल्ट, रेडियम या धातूंच्या शुद्धीकरणाचे कारखानेही आहे. या धातूंचे स्थानिक साठे संपुष्टात आले आहेत. तांबे हे झाईरेमधून, तर जस्त व शिसे झाईरे, स्वीडर आणि पेरू या देशांमधून आयात केले जाते. ल्येझ जिल्हयात व ओलन येथे शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. ओलनचा तांबे शुद्धीकरण कारखाना प. यूरोपमधील सर्वांत मोठा होय. तांबे, जस्त, व शिसे यांचे १९७९ मधील उत्पादन अनुक्रमे ५,२०,०००, २,१३,००० व १,६२,००० टन होते.
अभियांत्रिकी उद्योगधंद्यात हा देश आघाडीवर आहे. अँटवर्प येथे जहाजबांधणीचा व्यवसाय चालतो. रेल्वेचे डबे गेंट व ला लूव्हेर येथे, तर अवजड विद्युत्सामग्री ब्रूसेल्स, शार्लर्वा व ल्येझ येथे तयार केली जाते. बेल्जियम मोटारगाड्या जुळवणी उद्योगात एक अग्रेसर देश आहे. रेनॉल्ट, सीट्रोएन, फोक्सवॅगेन इ. कंपन्यांचे मोटारी जुळविण्याचे कारखाने, तर जनरल मोटर्स, फोर्ड या कंपन्यांचे कारखाने अँटवर्प येथे आहे. या उद्योगात १९७५ साली ३,३१,००० माणसे काम करीत होती.
सुती वस्त्रोद्योगाचे केंद्रीकरण फलॅंद्रे मैदानी प्रदेशात फ्रेंच सरहद्दीपासून अँटवर्पपर्यंत झालेले असून, व्हेरव्हीएरमध्ये लोकरी वस्त्रोद्योग प्रामुख्याने आढळतो. कापूस, ताग व लिनन आयात केले जाते, तर फ्लॅक्स देशातच तयार होते. वस्त्रोद्योगात १९७५ मध्ये सु. १,३४,००० कामगार होते. सुती वस्त्रोद्योग २२ % लोकरी वस्त्रोद्योग १२ % व कृत्रिम धाग्यांपासून तयार होणारी वस्त्रनिर्मिती ४९ % अशी उत्पादनाची विभागणी होती १९७५. लिंबर्ग हे कृत्रिम धाग्यांच्या वस्त्रनिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे.
रसायने व खनिज तेज रसायने हे उद्योगधंदे सॅंब्रा व म्यूज या नद्यांची खोरी, केम्पनलॅंड व अँटवर्पसारखी मोठी शहरे यांमध्ये केंद्रित झाले आहेत. जड रसायनांचे कारखाने प्रामुख्याने पहिल्या दोन प्रदेशांत एकवटलेले आहे. औषधे, छायाचित्रणाची रसायने व साबण यांसाठी लागणारा कच्चा माल मोठ्या शहरांमध्ये तयार केला जातो. काचेच्या वस्तूंची निर्मिती व हिऱ्यांना पैलू पाडणे हे व्यवसायही महत्त्वाचे असून त्यांसाठी ल्येझ, शार्लर्वा, मॉल जिल्हा व अँटवर्प प्रसिद्ध आहे.
देशात १९७८ साली १६ साखर कारखान्यांतून १,६८,७३५ टन कच्च्या साखरेचे उत्पादन झाले. तीन साखर शुद्धीकरण कारखान्यांतून २,३०,५२६ टन साखर शूद्ध करण्यात आली. याच वर्षी देशात १० उर्ध्वपातन भट्ट्या व १५१ आसवन्या असून त्यांतून अनुक्रमे ५,०१,२१८ हे. लीटर अल्कोहॉल व १,३३,९४,७९२ हे. लीटर बीर असे उत्पादर झाले. देशातील उद्योगधंद्यांच्या मोठ्या क्षेत्रावर १६ औद्योगिक न्यासांचे नियंत्रण असते.
चलन : बेल्जियम फ्रॅंक हे देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटिमचा एक फ्रॅंक होतो. २५ व ५० सेंटिम व १,५,१०,५०,१०० फ्रॅंकच्या नोटा प्रचलित आहेत. १९८१ साली १ अकेरिकी डॉलर = ३५ बेल्जियम फ्रॅंक व १ स्टर्लिंग पौंड = ७७ बेल्जियम फ्रॅंक असा विनिमय दर होता. १०० बे. फ्रॅं.= २०.१७ रूप्ये असा विनिमय दर होता ऑगस्ट १९८२. नॅशनल बॅंक स्था. १८५० ही प्रमुख असून अर्थमंष्याच्या अखत्यारीतील एका स्वायत्त संस्थेमार्फत देशातील इतर बॅंकांवर नियंत्रण ठेवले जाते.
फ्रान्स, अमेरिका, रशिया, भारत, ऑस्ट्रेलिया, पश्चिम व पूर्व जर्मनी, झाईरे, ग्रेट ब्रिटन या देशांशी बेल्जियमचा आयात निर्यात व्यापार चालतो. आयातीत मुख्यत्वे यंत्रसामग्री, विद्युत् साहित्य, मोटारी, विमाने, कच्चा माल इत्यादींचा समावेश असून निर्यातीत रसायने, औषधे, मौल्यवान खडे, कापड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. १९७८ साली भारताला १४४१.८७९३ कोटी बेल्जियम फ्रॅंकइतक्या मूल्याच्या वस्तूंची निर्यात व ९७०.०६३८ कोटी बे. फ्रॅंक मूल्याच्या वस्तूंची भारतातून आयात करण्यात आली.
बेल्जियम लक्सेंबर्ग इकॉनॉमिक युनियन १९२२ साली स्थापन करण्यात आली. १९४४ पासूनच या देशांत आर्थिक करार होत राहिले. याचीच परिणती पुढे १९५८ साली बेनेलक्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या बेल्ज्यिम, नेदर्लंड्स व लक्सेंबर्ग यांच्यातील ५० वर्षांच्या आर्थिक करारात झाली. कहायुद्धोत्तर काळातील कठीण आर्थिक परिस्थितीत यूरोपीय लोह व पोलाद संघटना, यूरोपीय समाईक बाजारपेठ मुख्य केंद्र ब्रुसेल्स येथे यांच्या स्थापनेतही बेल्जियमचा वाटा मोठा आहे.
वाहतूक व संदेशवहन : नेदर्लंड्स, प. जर्मनी, फ्रान्स व ग्रेट ब्रिटन या देशांजवळ असलेले याचे मोक्याचे स्थान, म्यूज, स्केल्ट व ऱ्हाईन या नद्यांचा सहज करता येण्यासारखा उपयोग फ्लँडर्स मैदानी प्रदेश या तीन कारणांमुळे देशात वाहतुकीच्या सर्व प्रकारच्या साधनांचे मोठे जाळे तयार झाले आहे.
देशात एकूण ४,०४६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते १९७८. बेल्ज्यिममधून धावणाऱ्या ट्रान्स यूरोपियन एक्सप्रेस गाड्या ब्रूसेल्स, अँटवर्प इ. शहरांत थांबतात. सटकांनीही ही शहरे शेजारच्या राष्ट्रांशी जोडलेली आहेत. १९७७ अशेर देशांत एकूण १,२५,७०३ किमी. लांबीच्या सडका होत्या. त्यांपैकी बहुतेक सर्व पक्क्या आहेत. देशातील स्वयंचलित वाहनांची एकूण संख्या ३५,३२,४८५ होती १९७८. देशाच्या लहान आकारामुळे अंतर्गत विमान वाहतुक मर्यादित प्रमाणात आढळते. ब्रूसेल्स येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून सॅबीना १९२३ ही देशाची आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे.१,५७३.७ किमी. लांबीच्या नद्या व कालवे यांच्याद्वारे अंतर्गत प्रवासी व मालाची जलवाहतूक चालते (१९७८).
शेजारी राष्ट्रांशी होणारा व्यापारही जलमार्गांनी होतो. अंतर्गत जलवाहतुकीचे तीन विभाग आहेत. : ॲल्बर्ट कालवा – म्यूज खोरे विभाग, अँटवर्प-ब्रूसेल्स-शार्लर्वा विभाग आणि अँटवर्प-ऱ्हाईन कालवा विभाग. पहिल्या विभागास ल्येझ व अँटवर्प जोडले गेले आहेत, तर तिसऱ्यामुळे नेदर्लंड्समधील रॉटरडॅमपर्यंत थेट प्रवास सुकर झाला आहे. या मार्गांचे आधुनिकिकरण झाल्यावर यातून अधिक वजनाच्या बोटी जाऊ शकतील. जलमार्गाने १९७५ मध्ये सु. ८३ कोटी टनाची मालवाहतूक झाली.
अँटवर्प हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. बेल्जियन बंदरापैकी ७० % उलाढाल येथे होते. स्केल्ट नदीकाठावरील या बंदरांची पार्श्वभूमी व्यापक आहे. गेंट, झेव्रख ही इतर उल्ल्खनीय बंदरे होत.
देशात १९८० अखेर १,८६४ टपाल व १३२ तार कचेऱ्या होत्या. १९७८ साली ६३५ दूरध्वनीकेंद्रे होती, तर सार्वजनिक व खाजगी दूरध्वनींची संख्या अनुक्रमे ६,१७० व ३२,७०,८८२ होती. देशात रेडिओ व दूरचित्रवाणी केंद्रे असून त्यांद्वारा फ्रेंच, डच, इंग्रजी, स्पॅनिश इ. भाषांतून कार्यक्रम प्रक्षेपित केले जातात. बेल्जियममध्ये रंगीत दूरचित्रवाणीही आहे. येथे १९७९ साली ४४,५०,९४४ रेडिओ संच व २९,२४,८४६ पैकी १५,९३,०५९ रंगीत दूरचित्रवाणीसंच होतेश्. १९७८ साली देशातील ५१६ चित्रपटगृहांत १,९७,९०६ प्रेक्षकांची आसनव्यवस्था होती. १९८० साली देशात ३६ वृत्तपत्रे प्रसिद्ध होत होती, त्यांपैकी २२ फ्रेंच, १३ डच व १ जर्मन भाषेतील होते.
लोक व समाजजीवन : बेल्ज्यिन समाज स्थूलमानाने तीन भाषिक गटांत विभागलेला आहे. यां पैकी बहुसंख्यांक गट डच भाषिक फ्लेमिंग लोकांचा असून ते मूळचे जर्मानिक वंशाचे आहेत. त्याखालोखाल मोठा असलेला गट फ्रेंच भाषिक वॉलून्झ लोकांचा असून ते लोक केल्टिक वंशाचे आहेत. तिसरा अल्पसंख्य गट जर्मन भाषिकांचा आहे.
यूरोपातील हा एक दाट लोकवस्तीचा देश आहे. १९७५ मध्ये देशाची एकूण लोकसंख्या ९८,१३,१५२ होती. त्यांपैकी ५४,७८,००० फ्लेमिश डच भाषिक व ३१,१७,००० फ्रेंच भाषिक होते. उरलेल्यांत काही जर्मन भाषिक व परदेशी होते.
फ्लेमिश फ्रेंच भाषावाद जुना आहे. ढोबळमानाने भाषिक दृष्ट्या बेल्ज्यिमचे दोन भाग पडतात. उत्तरेकडील फ्लेमिंग डच भाषेशी साधर्म्य असलेली फ्लेमिश बोलतात व डच भाषेमधून व्यवहार करतात. दक्षिणेकडील वालूनांची भाषा ही फ्रेंच भाषेची पोटभाषा आहे. एकमेकांवरील अविश्वास, एका प्रदेशास काही मिळाल्यास दुसऱ्याची आपल्यावर अन्याय झाल्याची भावना, यांमुळे येथील समाजव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. भाषिक दंगली अजूनही उफाळून येतात. या सर्वांवर तोडगा म्हणून सरकारने १९६२ ६३ मध्ये पूर्व पश्चिम धावणारी भाषिक सरहद्द स्थापन केली. तीनुसार पश्चिम फ्लँडर्स, पुर्व फ्लँडर्स, अँटवर्प आणि लिंबर्ग ही चार राज्ये फ्रेंच भाषिक आणि ब्राबांट हे नववे राज्य द्वैभाषिक आहे. पुढे १९७१ साली या दोन भाषिक प्रदेशांचे प्रादेशिक असंतुलन दूर करण्याकरिता दोन खास मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली. या दोन भाषिक गटांतील तेढ कमी होऊन त्यांच्यात सलोखा निर्माण होण्याची शक्यता मात्र कमी आहे.
अशी परिस्थिती चिघळण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. फ्लेमिंग लोकांत जननमान अधिक आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी हे लोक ५६ % आहेत वॉलून्झांचा भाग ३२ %. यामुळे शासनात हे लोक जास्त वाटा मागतात. फ्लेमिंगांना वॉलून्झांचे ब्रूसेल्समधील अस्तित्व आवडत नाही केंद्रशासित ब्रूसेल्सची कल्पनाही मांडण्यात येत आहे भाषिक दंगेही होतात. पूर्व बेल्ज्यिममधील फेंरच व जर्मन भाषिक लोक मात्र सामंजस्याने राहतात.
बहूसंख्य फ्लेमिंग व वॉलून्झ हे दोन्ही बर्ग रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. तथापि प्रोटेस्टंट पंथाचे तसेच ज्यू धर्माचे अनुयायीही देशात आहेत. शासन हे धार्मिक बाबतीत तटस्थता पाळते. या सव्रच प्रमुख पंथांच्या धर्माधिकाऱ्यांना शासनातर्फे वेतनासाठी काही रक्क्म देण्यात येते.
लोकसंख्या वितरण व घनता या दृष्टींनी चार प्रमुख प्रदेश पडतात : आर्देन भागात व पठारी प्रदेशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १५० आहे. फ्लँडर्स मैदानी प्रदेश, एन सॅंब्रा व म्यूज या नद्यांच्या खोऱ्यांत ही घनता दर चौ. किमी. ला १५० पेक्षा अधिक आहे. लहान शहरांत तसेच किनारपट्टीतील पर्यटक केंद्रांमध्ये घनता दर चौ. किमी. ला ३०० ते १,००० आहे शेवटचा वर्ग मोठ्या शहरांचा असून तेथे लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १,००० पेक्षा जास्त आहे. लोकसंख्येच्या वाढीचे वार्षिक सरासरी प्रमाण दर हजारी ५.६ या प्रमाणवाढीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याच वॉलून्झ राज्याच्या संख्यावाढीचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी प्रमाणापर्यंत पोहोचत नाही.
व्यानुसार गटवारी केल्यावर दोन महायुद्धांचा प्रभाव ठळकपणे दिसतो : ३० ते ३५ व ५५ ते ६० या वयोगटांत कमी लोक आहेत, १५ वर्षांखालील मुले २२ % तर ६५ वर्षांवरील वृद्ध १३ % आहेत.
इतर प्रगत देशांपेक्षा बेल्ज्यिममध्ये ग्रामीण भागाकडून शहराकडे वाहणारा लोकांचा ओघ कमी प्रमाणात आढळतो. कारण शासनाने १८७० मध्ये स्वस्त रेल्वे प्रवासाचे तत्त्व मान्य केले आहे. व लोक अजूनही ग्रामीण भागात राहून शहरात काम करण्याचे पसंत करतात. फ्लेमिंश अँटवर्पपेक्षा फ्रेंच लोकांचा लोंढा द्वैभाषिक ब्रूसेल्सकडे जास्त आहे. वाढत्या उपनगरीकरणामुळे मुख्य शहरांतून उपनगरांगडे होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण अँटवर्प व ब्रूसेल्समध्ये अधिक दिसले, तरी गेंट, शार्लर्वा इ. शहरांतही ते दिसून येते. बेल्ज्यिममधून शेजारील राष्ट्रांच्या औद्योगिक प्रदेशांत रोज ये जा करणाऱ्या कामगारांचा वर्गही आढळतो, पश्चिम फ्लँडर्समधून फ्रान्समधील लील रूबे व तुरीकानकडे, बॉरीनाझमधून व्हालेन्सिऐंझमधील पोलाद कारखान्याकडे, बेल्जियन लॉरेनपासून फ्रेंच लॉरेनकडे व काही प्रमाणांत उत्तर बेल्ज्यिममधून नेदर्लंड्सकडे हा ओघ जातो.
बेल्ज्यिन सण व उत्सव यांना दीर्घ परंपरा आहे. काही सणांचे मूळ तर ख्रिस्तपूर्व काहातील पेगन आहे, तर काही धार्मिक उत्सवांवर स्पॅनिश प्रभाव आढळतो.
बींश येथे गॅल्लस लोकांचा ग्रोव च्यूजकडे हा सण फेब्रुवारीत येतो. गॅल्लस लोक त्या वेळी उंची कपडे घालून मिरवणुकीत संत्री उधळतात. त्याच महिन्यात ग्रामाँ येथे होणाऱ्या क्रॅकनेल उत्सवात झाडे जाळून लहान होळया पेटविल्या लातात. लेंट या ईस्टरपूर्वीच्या चाळीस दिवसांच्या काळात फॉस ला व्हील येथील कान्रिव्हलमध्ये रस्त्यावर नाचून गाऊन आनंदोत्सव साजरा केला जातो. ब्रूझ येथे ईस्टरनंतर चाळिसाव्या दिवशी (‘ॲसेन्शन डे’) ‘प्रोसेशन ऑफ द होली ब्लड’ साजरा केला जातो. ख्रिस्तांचे रक्त असलेल्या एका स्फटिक कुपीची मिरवणूक त्या निमित्ताने काढली जाते. व्हर्न येथे जुलैमध्ये शेवटच्या रविवारी भाविक लोक आपले चेहरे झाकून व लांब झगे घालून रस्त्यावर जड क्रॉस घेऊन जातात. याला प्रोसेशन ऑफ पेनिटंटस म्हटले जाते. ऑगस्टमधील शेवटच्या शनिवारी गोलाइथ या राक्षसाचे लग्न होते. दुसऱ्या दिवशी आट येथे या राक्षसाची मिरवणूक काढली जाते.ईप्र येथील मोजरांची व चेटकिणींची मिरवणुक प्रेक्षणीय असते. नाताळचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. बेल्ज्यिन लोकांना कार्निव्हलचे विलक्षण आकर्षण आहे.
समाजकल्याणविषयक कार्य सामाजिक सुरक्षेच्या कार्यालयामार्फत पार पाडले जाते. कौटुंबिक भत्ता. आरोग्यविमा, बेरोजगारी व निवृत्तिवेतन यांच्या तरतुदी असून त्यांसाठी कर्मचारी व मालक यांच्याकडून वर्गणीरूपाने निधी गोळा केला जातो. सर्व प्रकारचे भत्ते व निवृत्तिवेतन लीवनमान निर्देशांकानुसार दिले जातात. कर्मचाऱ्यांना किंवा इतर सेवकांना वर्षातून चार आठवडयांची हक्काची रजा असते. कामगारांच्या बाबतीत अपघात विम्याचीही तरतून आहे. सेवानिवृत्त लोक, विधवा, अनाथ व अपंगांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. कल्याणकारी योजना राबविण्यासाठी प्रत्येक नगरपालिकेत स्वतंत्र खाती आहेत.सामाजिक कल्याण व सुरक्षा यासंबंधीचे विविध उपक्रम १९४४ च्या कायद्याप्रमाणे केले जातात. या कायद्यात सतत सुधारणा होऊन समाज कल्याणासाठी नवीन तरतुदी करण्यात येत आहेत. गरिबांसाठी कम्यूनमार्फत मदत देण्यात येते.
देशात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. १९७८ साली २२,१४३ डॉक्टर होते. देशातील विविध रुग्णालयांतून एकूण ९०,४४२ खाटांची संख्या होती. देशात औषधनिर्मिती कंपन्यांची संख्याही मोठी आहे.
शिक्षण : १९६२-६३ मध्ये देशात जे भाषिक विभाग करण्यात आले, त्यांपैकी उत्तर भागात, डच, दक्षिणेस फ्रेंच व पूर्व सीमेवरील प्रदेशात जर्मन या भाषा अधिकृत मानल्या जातात. राजधानी ब्रूसेल्स हे द्वैभाषिक मानले जाते. १९७८ मध्ये या भाषावार लोकसंख्येचे शेकडा प्रमाण पुढीलप्रमाणे होते: फ्लेमिश ५६.९, फ्रेंच ३२.१, जर्मन ०.७ व द्वैभाषिक १०.३.
येथूपुढील पाने टाईप केलेली नव्हती ती टाईप करून चेक केलेली आहे कृपया नोंद घ्यावी. ८३१ ते ८३५ व ८३७ ते ८४० पाने टाईप केलेली आहे देशात ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. देशातील एकूण शिक्षणव्यवस्था ही रोमन कॅथलिक परंपरेतून चालत आलेली असून या पद्धतीबरोबरच देशात आधुनिक अशी धर्मनिरपेक्ष शासनपुरस्कृत शिक्षणपद्धतीही आढळते. रोमन कॅथलिक शैक्षणिक संस्थांना शासनाकडून अनुदानही मिळते. १९६३ च्या शिक्षणाच्या माध्यमविषयक अधिनियमानुसार, त्या त्या भाषिक प्रदेशातील अधिकृत भाषा हे शिक्षणाचे माध्यम आहे. ब्रूसेल्स जिल्ह्यातील विद्यार्थ्यास आपल्या मतृभाषेत शिक्षण घेता येते. शासकीय मदतीने चालणाऱ्या बासकमंदिरांतून अडीच ते पाच वर्षांच्या बालकांना शिक्षण घेता येते. देशातील सु. ९०% लहान मुले बालकमंदिरात जातात. प्राथमिक शिक्षण ६ वर्षांचे असून ते ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आहे. माध्यमिक शिक्षण जास्तीत जास्त ६ वर्षाचे असून त्यात २-२ वर्षांचे तीन टप्पे असतात. यांपैकी पहिल्या वर्षी सर्व विद्यार्थांना समान स्वरुपाचे शिक्षण दिले जाते व नंतर त्यांना आपल्या विषयाची निवड करता येत. यानंतर शिक्षण प्रशिक्षणाचा २ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर माध्यमिक शिक्षणाची पदविका मिळविता येते. विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर परीक्षा द्यावी लागते. विद्यापीठात पहिली २-३ वर्षे पूर्वतयारीवजा अभ्यासक्रम असतात व त्यानंतर २-३ वर्षात विशिष्ट विषयाची पदवी विद्यार्थ्याला संपादन करता येते. देशात एकूण ५ विद्यापीठे असून त्यांची अनेक केंद्रे किंवा विद्याशाखा हेत. विद्यापीठातील इतरही काही संस्थांमार्फत उच्च शिक्षमाची सोय केली जाते. यांत कला, शिक्षणशास्त्र, तंत्रविद्या, शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या विद्यांचा अंतर्भाव होतो. देशातील सु. ३५% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या उपलब्ध आहेत. ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम निधी’ तर्फे अशा शिष्यवृत्त्या अथवा शैक्षणिक संस्थांना गरजेप्रमाणे अनुदाने दिली जातात. देशाच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी सु. २०% खर्च शिक्षमावर केला जातो. डच व फ्रेंच भाषिक विभागांसाठी १९७० पासून स्वतंत्र शिक्षणमंत्री नियुक्त केले जातात.
देशात १९७३-७४ ५,४४९ बालकमंदिरे ८,२६६ प्राथमिक शाळा १,१४५ माध्यमिक शाळा ३,५०६ तंत्रनिकेतने व ५४५ नवीन पद्धतीच्या शाळा होत्या. १९७८-७९ साली बालकमंदिरांत ३,९४,८१६ प्राथमिक शाळांत ९,९७,७५९ माध्यमिक शाळांत २,४८,५१४ तंत्र निकेतनांतून २,९१,३४४ व नवीन पद्धतीच्या शाळांत २,९८,६१४ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठीय व तत्सम संस्थांतून १९७७-७८ साली ८९,३४९ विद्यार्थी शिकत होते. १९७३-७४ साली देशात बालशिक्षण प्रशिक्षण संस्था ४४ प्राथमिक प्रशिक्षण संस्था ९५ तांत्रिक ६३ व माध्यमिक प्रशिक्षण संस्था ५७ होत्या. देशात ५ शाही ललित कला अकादमी असून त्यांच्यामार्फत कलाशिक्षण दिले जाते.
भाषा व साहित्य : बेल्जियमचा भाषिक, वाङ्मयीन वारसा हा द्वभाषिक म्हणजे फ्रेंच व फ्लेमिश भाषासाहित्याने संपन्न आहे. इंग्रजी, जर्मन व विशेषतः फ्रेंच साहित्याचा प्रभाव या परंपरेवर दिसून येतो. देशाचे विशिष्ट असे जे भूराजनैतिक स्वरुप आहे, त्यामुळे यूरोपातील नव्यानव्या कल्पनांचा स्वीकार येथील वाङ्मयीन परंपरेने तत्परतेने केल्याचे दिसते. रंग आणि रहस्य यांविषयी जी एक खास फ्लेमिश अभिरुची आहे, तिचा प्रभाव नाटक, कादंबरी, काव्य यांसारख्या फ्लेमिश साहित्यनिर्मितीवर दिसून येतो. [⟶बेल्जियन साहित्य].
कला व क्रीडा : १५–१७ वे शतक या काळातील कला ⇨फ्लेमिश कला या नावाने ओळखली जाते. फ्लेमिश कलेवर तत्कालीन आद्य ख्रिस्ती, कॅरोलिंजियन व रोमनेस्क कलांचा प्रभाव होता. फ्लेमिश कलेच्या वैभवाच्या काळात चित्रकलेला महत्त्वाचे स्थान होते. ⇨यान व्हान आयिक (सु.१३९०–१४४१), रोगीर व्हान डर व्हायडन (१३९९–१४६४), ह्यूगो व्हान डर गूस (सु. १४३५–८२), हायरॉनिमस बॉस (सु. १४५०–१५१६), थोरला पीटर ब्रगेल (सु. १५२५–६९) हे पंदराव्या व सोळाव्या शतकांतील महत्त्वाचे चित्रकार. सतराव्या शतकातील ⇨पीटर पॉल रुबेन्स (१५७७–१६४०) या बरोक शैलीच्या चित्रकाराचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहिला. सतेज रंगसंगती, सुस्पष्ट रेखांकन, चित्रणाचा बारकावा व या सर्व घटकांची एकसंध मांडणी ही फ्लेमिश चेत्रशैलीची वैशिष्ट्ये होत.
मध्ययुगापासून फ्लेमिश वास्तुकलेचे उत्तमोत्तम नमुने आढळतात. तेराव्या शतकातील ईप्र येथील ‘क्लॉथ हॉल’, पंधराव्या शतकातील लव्हन येथील सभागृह, अँटवर्प येथील नगरभवन (१५६१–६५) यांसारख्या भव्य इमारती उल्लेखनीय आहेत. सतराव्या शतकाच्या सुरुवातीस वेन्झल कोबेर्जे याने स्खेर्पन्हव्हल येथे बांधलेल्या अष्टकोनी घुमटाच्या चर्चवर बरोक शैलीचा प्रभाव जाणवतो. यानंतरच्या काळातील चर्च वास्तूंवर बरोक शैलीचा प्रभाव ठळकपणे दिसतो. उदा., लव्हन येथील सेंट मायकेल्स चर्च.
मूर्तिकलेत प्रख्यात डच शिल्पकार क्लाउस स्लूटर याच्या वास्तववादी शिल्पाकृतींचा प्रभआव होता. वेदिचित्रे, फ्रनिचरवस्तू, धातुकाम, मिनेकारी यांती फ्लेमिश कारागीर आघाडीवर होते. तूर्ने, ब्रेसेल्स, अँटवर्प ही चित्रजवनिका (टॅपेट्री) निर्मितीची प्रमुख केंद्रे होती.
जेम्स आँसॉर हा फ्लेमिश अभिव्यक्तिवादी चित्रकार श्रेष्ठ मानला जातो. आधुनिक चित्रकलेत रने माग्रित व पॉल डेल्व्हो हे प्रख्यात चित्रकार हेत. व्हिक्टर हॉर्टो आणि हांग्री व्हान दे व्हेल्दे हे आधुनिक वास्तुकार आघाडीवर आहेत. सेझार फ्रांक (१८२२–९०) हा प्रभावी संगीतकार उल्लेखनीय हेत. मॉरिस बेझार यांची बॅले संस्था व ‘इंटरनॅशनल न्यू सीन’ ही नवनाट्य सादर करणारी संस्था यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
देशात पोहणे, मासेमारी व नौकायन हे खेळ अत्यंत लोकप्रिय आहेत. यांशिवाय कड्याचा खेळ (कॉइट), सॉकर सायकलींच्या शर्यती, बास्केटबॉल, धनुर्विद्या यांसारख्या खेळांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
महत्त्वाची स्थळे : देशात पर्यटनाच्या दृष्टीने समुद्रकिनारा, इतिहासप्रसिद्ध फ्लेमिश नगरे व आग्नेय भागातील आर्देन आणि रम्य डोंगराळ प्रदेश असे तीन प्रमुख भाग आहेत. ऑर्स्टेड, ब्लांकेनबुर्क, क्नॉक ही समुद्रकाठची सहलस्थळे असून त्यांपैकी ऑस्टेंड हे सुंदर पुळणीसाठी विशेष प्रसिद्ध हे. मधअययुगातील वातावरणाचा ठळक प्रत्यय देणारी ब्रूझ, गेंट, ईप्र ही फ्लेमिश शहरे उल्लेखनीय आहेत. गेंट येथील लेस व कापडउद्योग प्रसिद्ध आहे. अँटवर्प हे शहरही अनेक प्रेक्षणीय अशा ऐतिहासिक व आधुनिक वैशिष्ट्यांनी संपन्न हे. प. युरोपातील सागरी व्यापाराचे महत्त्वाचे बंदर म्हणूनही हे उल्लेखनीय आहे. बेल्जियमच्या आधुनिकतेने व संपन्नतेचे प्रतिक म्हणजे ब्रूसेल्स ही राजधानी. या शहरातील ‘ग्रँड प्लेस’, ‘सेंट मायकेल्स कॅथीड्रल’, ‘नोत्रदाम द सॅब्लॉन’ हे चर्च, त्याचप्रमाणे त्याच्या उपनगरातील ‘इरॅस्मस हाउस’ ही पर्यटकांची विशेष आकर्षणे आहेत. या शहरातील वृक्षराजांनी नटलेले रस्ते, उपहारगृहे ख्यातनाम असून यूरोपीय राजकारण व अर्थकारणाचे ते केंद्र आहे. सुंदर नगरभवन व विद्यापीठ यांसाठी लव्हन हे प्रसिद्ध आहे. मेक्लिन येथील कॅथीड्रल ल्येझ शहरातील प्रबोधनकालीन इमारती व राजवाडा पोलाद उद्योग तूर्ने येथील रोमनेस्क शैलीतील कॅथीड्रल उल्लेखनीय आहे. र्देन प्रदेशातील स्पा हे यूरोपातील प्राचीन विश्रामधाम असून तेथील खनिजयुक्त झऱ्यांवरूनच अशा प्रकारच्या झऱ्यांना ‘स्पा’ हे नाव रुढ झाले. म्यूज नदीच्या खोऱ्यातील भूराजनैतिक दृष्ट्या अत्यंत मोक्याच्या जागी वसलेल्या नामुर, दीनां व हाय येथील ऐतिहासिक गढ्या प्रसिद्ध आहेत. यांशिवाय शार्लर्वा येथील दगडी कोळशाचे उत्पादन महत्त्वाचे आहे.
संदर्भ : 1. Arango, E. R. Leopold III and the Belgian Royal Question, Baltimore, 1961.
2. Kieft, D.O. Belgium’s Return to Neutrality, London, 1972
3. Lyon, M. Belgian , London, 1971.
4. Mallinson, V. Modern Belgiun Literature, New York, 1966.
जाधव, रा.ग. पंडित, अविनाश चौडे, मा.ल.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..