बेलूर : कर्नाटक राज्यातील हे स्थळ होयसळ वास्तुशैलीतील मंदिरसमूहांसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी वेळापुरी, वेळूर, वेलहूर इ. नावांनीही हे स्थळ ओळखले जाई. दक्षिण वाराणसी म्हणूनही त्याची ख्याती आहे. ते हसन जिल्ह्यांत बनवरच्या नैर्ऋत्येस ४५ किमी. व हसनच्या वायव्येस सु. ३९ किमी. वर यगची नदीकाठी वसले आहे. लोकसंख्या १३,५७९ (१९८१). वेलूर तालुक्याचे ते मुख्य ठाणे असून हसन-चिकमगळूर लोहमार्गावरील ते एक स्थानक आहे.
येथील सर्व मंदिरे ११६.८२ मी. X १२९.५४ मी. (३८० फुट x ४२५ फुट) क्षेत्रफळाच्या तटबंदीयुक्त प्रकारात मध्यभागी असून पूर्वेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत. मध्यभागी चेन्नकेशव मंदिर असून त्याभोवती कप्पे-चन्निगरय, सोमनायकी, आंडाळ, वीरनारायण, आळवार संत इत्यादींची मंदिरे आहेत. पश्चिमेकडील शंकरेश्वराचे मंदिर मात्र एका बाजूला पडल्यासारखे वाटते. बहुतेक मंदिरे सुस्थितीत असली तरी किरकोळ पष्ठझड व मूर्तींची मोडतोड झाल्याचे दिसून येते. येथील काही शिलालेखांनुसार ही मंदिरे इ.स. बाराव्या शतकात विष्णुवर्धन ह्या होयसळ राजाने व त्याच्या मुलाने बांधली.
ही सर्व मंदिरे उत्तरे चालुक्यशैलीतील, विशेषत: होयसळ वास्तुशिल्पशैलीतील, असून चेन्नकेशव मंदिर म्हणजे या शैलीचा परिपक्व आविष्कार होय. तारकाकृती किंवा क्रूसाकार विधान, गर्भगृह, सुखनासीकिंवा अंतरालय, त्यापुढे
नवरंग किंवा सभामंडप व मुखमंडप वा व्हरांडा अशी सर्वसाधारण वास्तुरचना सर्वत्र आढळते. सभामंडपात अलंकृत स्तंभांवर कोरीव छत असून मंदिराबाहेरील पीठावर गज, अश्व, मानव इ. पंचथर आढळतात. मंडोवरांवर (भिंतींवर) शिल्पांकन केलेले आढळते. बहुतेक मंदिरे बसकी असून त्यांची शिखरे अवशिष्य नाहीत. बाहेरील भिंतींवर विपुल शिल्पांकन दृष्टीस पडते. ही सर्व मंदिरे निळसर काळ्या रंगाच्या संगजिऱ्यासारख्या मऊ दगडांची आहेत. हा दगड खाणीतून काढल्याबरोबर अत्यंत मऊ असतो व पुढे हळूहळू कठीण बनत जातो. त्यामुळे त्यावर कलाकारांना नाजूक व बारीक कलाकुसर करणे शक्य झाले.
चेन्नकेशव म्हणजे सुंदर नारायण. त्याला विजय नारायण असेही म्हणतात. विष्णुवर्धनाने (बिट्टिग) हे मंदिर इ.स. १११७ मध्ये तालकदच्या लढाईत चोलांचा पराभव केला त्या विजयाप्रीत्यर्थ बांधले.
दुसऱ्या एका कथेनुसार विष्णुवर्धन जैन होता. रामानुजाचार्यांमुळे तो वैष्णव झाला. या घटनेच्या स्मरणार्थ त्याने हे विष्णुमंदिर बांधले. मूळ मंदिर एक मी. उंच चबुतऱ्यावर त्रिकुटक पद्धतीत (तीन गाभाऱ्यांचे मंदिर) बांधले असून पीठावर हत्तींच्या रांगा आहेत. त्यातून कीर्तिमुख, बेलपत्ती, मकर-सिंह ही ज्ञापके आढळतात. योद्ध्यांची मिरवणूक चित्रित केलेली आहे. मंडोवरात उभ्या मूर्ती खोदलेल्या असून त्यावरील आडव्या शिल्पपट्टीत महाभारत, रामायण, मागषस इत्यादींमधील कथांचे शिल्पांकन आढळते. तीरशिल्पातील विविध ढंगांत उभ्या असलेल्या सु. चाळीस सुरसुंदरी-मदनिकांचे मूर्तिकाम अप्रतिम आहे. सभामंडपांत चार स्तंभ वगळता बाकीचे सर्व स्तंभ अलंकृत आहेत. यांतील नरसिंह आणि मोहिनी या नावांनी प्रसिद्ध असलेले स्तंभ बारीकसारीक कलाकुसरीसाठी प्रसिद्ध आहेत. गर्भगृहातील चेन्नकेशवाची मूर्ती एक मी. उंचीच्या पादपीठावर विराजमान झाली असून तिची उंची ३.६८ मी. आहे. ही मूर्ती रेखीव असून तिच्या प्रभावळीत दशावतार कोरलेले आहेत. येथील शिल्पांकनात वेणुगोपाळ व गोवर्धनधारी कृष्ण यांची शिल्पे उत्कृष्ट असून द्वारांचे मकरतोरण तसेच द्वारपाल आरि अष्टदिक्पाल यांचे मूर्तिकाम वेधक आहे. पूर्वद्वारातील रतिमदनाचे युग्म आणि त्याच्या वरच्या बाजूस असलेले हिरण्यकशिपू व नरसिंह यांचे शिल्पांकन अत्यंत कलात्मक आहे. याशिवाय विष्णुवर्धनाचा दरबार, त्यातील राणी शांतलादेवी, पुरोहित इत्यादींची शिल्पे थक्क करणारी आहेत.
कप्पे – चन्निगरय हे या समूहातील दुसरे मंदिर. यात सुखनासी, द्वार आणि छत अलंकृत असून मंडपातील तीरशिल्पातील मदनिकांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. चन्निगरयाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना शांतलादेवी या पट्टराणीने केल्याचा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो. या मंदिराच्या समोरच हत्तीद्वार नावाचा दरवाजा असून तेथील छत्रीखाली उभे असलेले दांपत्य म्हणजे विष्णुवर्धन व शांतलादेवी असाव्यात, असे बहुतेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.वीरनारायण, सोमनायकी, आंडाळ इ. मंदिरे तुलनात्मक दृष्ट्या लहान असूनसुद्धा त्यांवरही देवदेवता व सुरसुंदरीचे विपुल शिल्पांकन आढळते. वीरनारायण मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीवरही भीमाचे भागदत्त आणि त्याचा हत्ती यांबरोबरचे युद्ध चित्रित केले आहे. आंडाळ मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावरील छत्र्यांची कलाकुसर चांगली आहे. येथेही पौराणिक कथांचे शिल्पांकन असून हत्तींच्या रांगा दिसतात. आळवारांच्या मंदिरात रामायणातील दृश्ये खोदलेली आहेत. पश्चिमेकडील शंकरेश्वराच्या मंदिरातील जाळीकाम तसेच तांडवनृत्यातील शंकर, मकर यांच्या मूर्ती कलात्मक आहेत. येथील शिल्पाकृतींत विविधता आहे. पौराणिक कथानक आहे आणि सूक्ष्म कलाकुसरींचे नमुने आहेत. तसेच भव्यता आणि उदात्तता आहे. काही शिल्पांच्या खाली शिल्पकारांची नावे आहेत, त्यातील माधवन्न, जकणाचार्य, रुवरी नंदीयभट्ट इ. शिल्पी प्रसिद्ध होते. तथापि येथील मानवी आकृत्या, विशेषत: स्त्रीप्रतिमा बुटक्या आणि स्थूल असून विविध अलंकारांनी नखशिखांत मढलेल्या आहेत. रुंद कपाळ, सरळ नाक, बदामी डोळे, कोरीव भुवया, सिंहकटी आणि घन-उन्नत उरोज ही सांकेतिक भारतीय स्त्री-सौंदर्याची सर्व लक्षणे कलाकाराने त्यांचे रेखाटन करताना कटाक्षाने पाळली आहेत.
होयसळ वास्तुशिल्पशैलीचा विकसित आविष्कार वेलूर येथे पाहावयास सापडतो तथापि येथील मदनिका आणि वेणुगोपाळ यांसारखी काही शिल्प सोडली, तर उर्वरित शिल्पांतून कलात्मक दृष्ट्या साचेबंदपणा आढळतो. मानवी मूर्तीतून एक प्रकारचा बोजडपणा आणि गतिशून्यता निर्माण झाली आहे, असे कलासमीक्षकांचे मत आहे.
पहा : होयसळ वंश
संदर्भ : 1. Anand, Mulk Raj, Ed. Marg, Vol. XXXI No. 1 : In Praise of Hoysal Art, Bombay, Dec. 1977.
2. Brown, Percy, Indian Architecture (Buddhist and Hindu Period), Delhi, 1963.
देशपांडे, सु. र.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..