बेर्तॉले, क्लोदल्वी : (९ डिसेंबर १७४८-६ नोव्हेंबर १८२२). फ्रेंच रसायनज्ञ. यांचा जन्म फ्रान्समधील ताल्वार या गावी झाला. १७६८ मध्ये त्यांनी इटलीतील तूरिन विद्यापीठाची वैद्यकाची पदवी घेतली. ते १७७२ मध्ये पॅरिसला आले व १७७८ मध्ये पॅरिस विद्यापीठाची वैद्यकाची पदवीही त्यांनी मिळविली. त्यानंतर ड्युक ऑफ आर्लिआं यांनी त्यांना आपले खास वैद्य नेमले. त्यामुळे त्यांच्या खाजगी प्रयोगशाळेत संशोधन करण्याच्या सवलती बेर्तॉले यांना मिळाल्या.

बेर्तॉले यांनी केलेले कार्य तीन प्रकारचे आहे : (१) रसायनशास्त्रीय संशोधनाने तांत्रिक व सैद्धांतिक ज्ञानात भर, (२) तांत्रिक ज्ञानाचा उद्योगधंद्यात उपयोग व (३) निरनिराळ्या आयोगांचे अधिकारी, सभासद अथवा संचालक म्हणून शासनास दिलेला सल्ला.

(१) अमोनिया, हायाडोसायानिक अम्ल व सल्फेरेटेड हायड्रोजन या संयुगांचे रासायनिक स्वरूप त्यांनी ठरविले. त्यांनी पोटॅशियम क्लोरेट या संयुगाचा शोध लावला. क्लोरीन वायू पाण्यात विरघळतो व त्यामुळे जे द्रावण मिळते ते विरंजक (रंग घालविण्याची क्रिया करणारे) असते परंतु क्लोरीन कॉस्टिक पोटॅशच्या द्रावणात प्रवाहित करून बनविलेले द्रावण विरंजनासाठी वापरणे जास्त सोयीचे असते, असे त्यांनी दाखविले.

सैद्धांतिक रसायनशास्त्रातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. सतराव्या शतकाच्या अखेरीस अशी कल्पना होती की, रासायनिक विक्रिया पदार्थांमध्ये परस्परांबद्दल असणाऱ्या रासायनिक आसक्तीमुळे-उदा., या पदार्थाला या पदार्थाबद्दल रासायनिक आसक्ती असल्यामुळे-घडतात. यांपासून अ आ संयुग बनेल परंतु या पदार्थाला बद्दल असणारी आसक्ती ला असणाऱ्या आसक्तीपेक्षा जास्त असेल, तर अ आ संयुगातील ची जागा घेऊ शकेल व अ आ च्या ठिकाणी इ आ संयुग बनेल. (अ आ + इ = इ आ + अ). बेर्तॉले यांनी असे निदर्शनास आणले की, रासायनिक क्रिया आसक्तीनुसार घडत नाहीत, तर विक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांच्या वस्तुमानास अनुसरून त्या घडतात. वस्तुमानात बदल करून विक्रिया उलट दिशेनेही घडविता येतात. वस्तुमान समतोलाच्या नियमाचा [विक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांच्या संहतींच्या (विद्रावातील प्रमाणांच्या) प्रमाणात विक्रियेचा वेग असतो या नियमाचा] त्यांनी अशा प्रकारे पाया घातला. रासायनिक विक्रिया होते तेव्हा संयुगाचे विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) इ. भौतिक गुणधर्म आणि परिस्थिती यांचाही परिणाम होतो, हेही त्यांनी दाखविले.

प्रत्येक अम्लात ऑक्सिजन असतो, हे ए. लव्हॉयझर यांचे मत त्यांना मान्य नव्हते. मूलद्रव्ये एकमेकांशी कोणत्याही प्रमाणात संयोग पावतात, असा त्यांनी निष्कर्ष काढला होता, तो चुकीचा होता परंतु त्यांच्या यासंबंधीच्या कार्यामुळेच झोझेफ प्रूस्त यांच्या संशोधनास चालना मिळाली व नियत (स्थिर) प्रमाण नियम (प्रत्येक शुद्ध संयुगात नेहमी तीच मूलद्रव्ये त्याच वजनी प्रमाणात संयोग पावलेली असतात हा नियम) सिद्ध झाला.

(२) लोह खनिजापासून लोखंड आणि त्यापासून पोलाद बनविण्याच्या कृती त्यांनी बसविल्या. विरंजनासाठी क्लोरीन वायूचा उपयोग क्षारांबरोबर (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थांबरोबर अल्कलींबरोबर) करणे फायदेशीर असते, हे त्यांनी निदर्शनास आणले. बंदुकीच्या दारूत पोटॅशियम नायट्रेटाऐवजी पोटॅशियम क्लोरेट वापरावे, असा त्यांचा हेतू होता. तो साध्य झाला नाही हे खरे परंतु त्या संयुगाचा उपयोग शोभेच्या दारूकामात करता येतो, हे सिद्ध झाले. त्यांच्या अशा तांत्रिक व शास्त्रीय सहाय्याशिवाय चालणार नाही, अशी जनतेची खात्री असल्यामुळेच ते फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात सुरक्षित राहिले.

(३) फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात व त्यानंतरही सल्लागार सभासद किंवा अधिकारी म्हणून अनेक आयोगांवर व समित्यांवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्व ठिकाणी त्यांनी बहुमोल कार्य केले. चलन सुधार समिती, सार्वजनिक सुरक्षा समिती, युद्धोपयोगी उत्पादन आयोग, कृषी व कला आयोग हे त्यांपैकी काही होत. पॅरिस येथील वस्तुसंग्रहालयाकरिता इटलीतून कलाकृतींचे उत्कृष्ट नमुने निवडण्यासाठी त्यांना १७९६ मध्ये इटलीस पाठविण्यात आले. त्यानंतर नेपोलियन यांनी १७९८ मध्ये त्यांना आपल्याबरोबर ईजिप्तला नेले. तेथे पॅरिस येथील नॅशनल इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर एक संस्था स्थापन करण्यात त्यांनी सहकार्य केले.

इ. स. १८०४ मध्ये त्यांना कौंट हा किताब देण्यात आला. निवृत्त झाल्यावर १८०७ मध्ये ते आर्कई या पॅरिसच्या उपनगरात राहवयास गेले. तेथे त्यांनी एक प्रयोगशाळा स्थापन केली. प्रथितयश शास्त्रज्ञांना बोलावून ते शास्त्रीय चर्चा घडवून आणीत व त्यांचे वृत्तांत मेमॉयर्स द ला सोसायटी द आर्कई या नियतकालिकात प्रसिद्ध करीत. हे कार्य १८१७ पर्यंत चालू होते.

बेर्तॉले यांनी अनेक संशोधनात्मक लेख लिहीले असून त्यांनी Elements del’ art de la teinture (२ खंड १७९१, १८०४), Recherches surles lois de l’ affinite (१८०१), व Essai de stalique chimique (२ खंड १८०३) ही पुस्तकेही लिहिली. आर्कई येथे ते मरण पावले.

घाटे, रा. वि.