बेनासेराफ, बारूज : (२९ ऑक्टोबर १९२०-). अमेरिकन विकृतिवैज्ञानिक व प्रतिरक्षावैज्ञानिक रोगप्रतिकारक्षमतेसंबंधीच्या विज्ञानातील तज्ञ. ⇨जॉर्ज स्नेल आणि झां दॉसे या दोन शास्त्रज्ञांबरोबर १९८० चे वैद्यक किंवा शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक त्यांना विभागून मिळाले. स्नेल व दॉसे यांच्या प्रतिरक्षाविज्ञानातील शोधावर आधारित असलेल्या आणि प्रतिरक्षाक्रियेत भाग घेणाऱ्या विशिष्ट कोशिकांचे पेशीचेद्ध उत्पादन व नियंत्रण यांसंबंधीच्या शोधाबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला [⟶ रोगप्रतिकारक्षमता विकृतिविज्ञान].
स्नेल, दॉसे आणि बेनासेराफ यांचे संशोधन एकमेकांशी संबंधित असल्यामुळे त्यांच्या कार्याचा सारांश येथे दिला आहे. प्रत्येक व्यक्तीमधील शरीर कोशिकांचा मित्ती पृष्ठभाग अगदी अनन्य असतो. हा गुणधर्म काही जीनांवर (आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढच्या पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांमध्ये म्हणजे गुणसूत्रांमध्ये असणाऱ्या आनुवंशिक घटकांच्या एककांवर) अवलंबून असतो. हे सर्व जीन कोशिका मित्तींवर असणाऱ्या विशिष्ट ऊतक-अनुरूपता (समान कार्य व रचना असलेल्या कोशिकांच्या समूहांना अनुरूप असलेल्या) प्रतिजनांच्या [⟶ प्रतिजन], निर्मितीस कारणीभूत असतात. या प्रतिजनांना प्रथिन-कार्बोहायड्रेट मिश्र पदार्थ आणि एच प्रतिजन अशी दुसरी नावेही आहेत. ही नावे एका शरीर-ऊतकाची दुसऱ्या शरीर-ऊतकाशी एकरूप होऊन राहण्याच्या क्षमतेच्या दर्शकतेवरून दिली आहेत. शरीराची प्रतिरक्षात्मक प्रतिक्रिया ज्या बहुविध कोशिकांवर अवलूबून असते, त्यांच्यातील परस्परक्रिया हे प्रतिजन नियंत्रित करतात. शरीराच्या प्रतिरक्षात्मक प्रतिसादावर जीनांचे नियंत्रण असते हे समजल्यावरून निरनिराळ्या व्यक्तींमधील संसर्गप्रतिकारक्षमता निरनिराळी का असते, तसेच काही व्यक्तींमध्ये कर्क कोशिका तयार होताच नाश पावतात, तर काहींमध्ये त्या वाढत जाऊन कर्कार्बुद (कर्क कोशिकांनी तयार होणारी गाठ) का होते हे समजले. थोडक्यात हा फरक वैयक्तिकच असतो. या फरकाला कारणीभूत असणारे जीन मुख्यत्वे करून उंदीर आणि मानव यांच्यावरील अभ्यासावरून सिद्ध झाले असले, तरी ते सर्वच पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळतात. एच प्रतिजनांविषयीची माहिती व्यावहारिक दृष्ट्या फार महत्त्वाची ठरली आहे. उदा., ऊतक-प्रतिरोपणात (एका व्यक्तीतील ऊतक काढून ते दुसऱ्या व्यक्तीत शस्त्रक्रियेने बसविण्याच्या क्रियेत) योग्य व जुळणाऱ्या व्यक्तींची निवड करणे शक्य झाले आहे. ऊतकाचे किंवा संपूर्ण अवयवाचे प्रतिरोपण करण्याच्या शस्त्रक्रियांच्या प्रगतीस ‘प्रतिरोपण प्रतिजनां’ चा अभ्यास उपयुक्त ठरला आहे. याशिवाय काही रोग व आनुवंशिक प्रवृत्ती यांचा संबंध समजण्यास मदत झाली आहे. एखाद्या व्यक्तीत विशिष्ट रोग उत्पन्न होण्यामागे एच प्रतिजननिर्मित प्रवृत्तिकारकता कारणीभूत असते.
एखाद्या व्यक्तीतील ऊतक दुसऱ्या व्यक्तीत प्रतिरोपण करण्याच्या शक्यतेस कारणीभूत असणारे आनुवंशिककारक स्नेल यांनी शोधून काढले. एच प्रतिजन ही संकल्पना त्यांनीच प्रथम मांडली. दॉसे यांनी एच प्रतिजनांचे अस्तित्व सिद्ध केले आणि त्यांच्या निर्मितिनियंत्रणामागील आनुवंशिककारकांचे कार्य स्पष्ट केले. या दोघांच्या वरील संशोधनावर आधारित असा प्रतिरक्षाविज्ञानातील महत्त्वाचा शोध बेनासेराफ यांनी लावला. शरीरात शिरलेल्या बाह्य पदार्थाविरुद्ध (सूक्ष्मजंतू, व्हायरस वगैरे) ⇨प्रतिपिंडे निर्माण करणाऱ्या कोशिकांची निर्मिती व तीवरील नियंत्रण यांवर त्यांनी विशेष भर दिला. अनेक प्रकारच्या कोशिका या कार्यात भाग घेतात उदा., दोन प्रकारच्या लसीका कोशिका [⟶लसीका तंत्र] : टी-कोशिका [ यौवनलोपी ग्रंथिजन्य ⟶ यौवनलोपी ग्रंथि] आणि बी-कोशिका (अस्थिमज्जेत-लांब हाडांच्या मधल्या पोकळीतील व काही चपट्या हाडांतील वाहिनीयुक्त संयोजी ऊतकात-उत्पन्न होणाऱ्या). या सर्व प्रकारांचे एकमेकांशी परिणामकारक सहकार्य असणे जरूर असते. या सहकार्यास कारणीभूत असणाऱ्या विशिष्ट जीनांचा शोध बेनासेराफ यांनी लावला.
बेनासेराफ यांनी गिनीपिगावर प्रयोग करून विशिष्ट प्रतिजनांविरुद्ध प्रतिरक्षात्मक प्रतिसाद निर्माण करण्याची क्षमता आनुवंशिककारकांमुळे ठरविली जाते, हे दाखवून दिले. या कारकांना त्यांनी ‘आय आर जीन’ (इग्यून रिस्पॉन्स जीन) असे नाव दिले. अशी अनेक प्रतिजने ओळखण्यात आली असून ती गुणसूत्राच्या ज्या भागात एच प्रतिजननिर्मिती होते त्याच भागात आढळतात. गुणसूत्राचा हा विशिष्ट भाग अनेक मध्यवर्ती क्रियांवर नियंत्रण करतो. या कारणाकरिता प्रथिन-कार्बोहायड्रेट मिश्र पदार्थाला अथवा एच प्रतिजनाला ‘महान जीन’ असे संबोधितात. बेनासेराफ यांच्या शोघामुळे निरनिराळ्या व्यक्तींच्या संसर्गविरोधी प्रतिरक्षात्मक प्रतिसाद सिद्ध करण्याच्या क्षमतेचे विश्लेषण करणे शक्य झाले आहे. या संशोधनातून कोशिकांतील परस्परक्रिया, कोशिकांची ओळख आणि प्रतिरक्षात्मक प्रतिक्रियांची सक्रियता या प्रश्नांची उकल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना जेरूलसलेम येथील हिब्रू विद्यापीठाचे राबी शाय शॅकनाय प्रतिरक्षाविज्ञान व कर्करोग संशोधन पारितोषिक (१९७४) आणि हेलेन हे व्हिटनी प्रतिष्ठानाचा टी. डयूकेट जोन्स स्मृती पुरस्कार (१९७६) हे
बहुमान मिळाले आहेत. ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस अँड सायन्सेस, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्ट्स,अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स अँड बॅक्टिरिऑलॉजिस्ट्स, ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर इम्युनॉलॉजी, फ्रेंच सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्री वगैरे विविध शास्त्रीय संस्थांचे सदस्य आहेत. ते अमेरिकन ॲसोसिएशन ऑफ इम्युनॉलॉजिस्टचे अध्यक्ष (१९७३-७४), फेडरेशन ऑफ अमेरिकन सोसायटीज फॉर एक्सपिरिमेंटल बायॉलॉजीचे अध्यक्ष (१९७४-७५) आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ इम्युनॉलॉजिकल सोसायटीजचे उपाध्यक्ष (१९७७) होते. यांखेरीज जागतिक आरोग्य सघटनेचे प्रतिरक्षाविज्ञान सल्लागार, ट्रूडो प्रतिष्ठानाच्या शास्त्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य व विश्वस्त (१९७०-७७) वगैरे पदांवर त्यांनी काम केले आहे. अमेरिकन जर्नल ऑफ पॅथॉलॉजी, जर्नल ऑफ एक्सपिरिमेंटल मेडिसीन, जर्नल ऑफ इम्युनॉलॉजी, इम्युनोजेनटिक्स इ. शास्त्रीय नियतकालिकांचे ते सहयोगी संपादक आहेत. डी. एच्. काट्झ यांच्याबरोबर इम्युनॉलॉजिकल टॉलरन्स : मेकॅनिझम्स अँड पोटेन्शियल थेरॅप्युटिक ॲप्लिकेशन्स १९७४ या ग्रंथाचे ते सहसंपादक होते. इम्युनोजेनेटिक्स अँड इम्युनोडेफिशियन्सी १९७५ व इम्युनॉलॉजी (ई. आर्. उनन्यू यांच्या समवेत १९७९) हे प्रतिरक्षाविज्ञानविषयक ग्रंथही त्यांनी लिहिले आहेत.
भालेराव, य. त्र्यं. मिठारी, भू. चिं.
“