बेटाई, सुंदरजी गोकळदास : (१० ऑगस्ट १९०५- ). आधुनिक गुजराती कवी. जन्म बेट, द्वारका येथे. शिक्षण मुंबई विद्यापीठात एम्‌. ए., एल्‌एल्‌. बी. पर्यंत.

मुंबई येथील एस. एन. डी. टी. विद्यापीठात ते गुजरातीचे प्राध्यापक होते. आता ते निवृत्त झाले आहेत पण कवितालेखन सतत चालू राहिले आहे आणि त्यात त्यांच्या सौम्य, कोमल, आशावादी श्रद्धायुक्त भावनांबरोबर विषादाचे सूर उमटत आहेत. परमेश्वराच्या ठिकाणी त्यांची उत्कट भक्तिभावना आहे. थोरोचा महाग्रंथ वॉल्डन (१८५४) याचा त्यांनी गुजरातीत चांगला अनुवाद केला असून तो साहित्य अकादेमीने प्रसिद्ध केला आहे.

प्रगल्भ-प्रसन्न शैलीतील त्यांची कविता भावनोत्कट असून त्यांनी काव्यरचनेत संस्कृत छंदांचा व निसर्गप्रतिमांच्या भाषेचा उपयोग केलेला आहे. त्यांच्या काव्यात गेयताही आढळते. ज्योतिरेखा (१९३४) या पाच खंडकाव्यांचा आपल्या पहिल्याच संग्रहाने त्यांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. १९५९ मध्ये स्वतंत्रपणे प्रसिद्ध झालेली त्यांची सद्‌गत चंद्रशीलाने ही पत्नीवियोगावरील विलापिका गुजराती काव्यात महत्त्वाची मानली जाते. नंतर ती तुलसीदल (१९६१) मध्ये संग्रृहीत करण्यात आली. ‘इंद्रधनु’ ही मुलाच्या मृत्यूवर लिहिलेली त्यांची विलापिका असून ती इंद्रधनु नावाच्या त्यांच्या काव्यसंग्रहात संग्रृहीत आहे. सुवर्णमेघ हा त्यांचा दर्जेदार समीक्षाविषयक ग्रंथ आहे.

⇨ नरसिंहराव दिवेटिया यांचे सन्मान्य शिष्य या नात्याने त्यांनी आपल्या गुरूची प्रगल्भ काव्यशैली विकसीत केली. गांधीयुगातील एक श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक आहे. १८८१ मध्ये त्यांनी साहित्य अकादेमीच्या वतीने नरसिंहराव दिवेटिया यांच्यावर एक उत्कृष्ट व्याप्तिखले लिहून प्रसिद्ध केला. त्यांच्या ग्रंथांना विविध पुरस्कार व पारितोषिकेही मिळालीत. नरसिंहरावांनी लिहिलेली ज्योतिरेखाची चिकित्सक प्रस्तावना विशेष महत्त्वाची आहे.

त्यांचे मुख्य ग्रंथ असे : काव्य-ज्योतिरेखा, इंद्रधनु (१९३९), विशेषांजलि (१९५२), तुलसीदल (१९६१), व्यंजना (१९६९), अनुव्यंजना (१९७४), शिशिरे वसंत (१९७६) समीक्षा-सुवर्णमेघ (१९६४), गुजराती साहित्यमां सॉनेट (१९३५) अनुवाद – वॉल्डन (१९६५), रोमहर्षिणी (१९६९-भगवद्गीतेचा अनुवाद) व महाभारताची शेवटची चार पर्वे (१९७६).

ब्रोकर, गुलाबदास (गु.) कालेलकर, ना. गो. (म.)