बेटवा नदी : (वेत्रवती). भारतातील मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश राज्यांतील निमओसाड प्रदेशातून वाहणारी उत्तरवाहिनी नदी. यमुनेची ही उपनदी असून तिची लांबी ५७६ किमी आहे. विंध्य पर्वतात भोपाळच्या आग्नेयीस सु. ४० किमी. वरील कुमरी गावाजवळ ही उगम पावते. प्रथम ८० किमी. ईशान्य दिशेने वाहत जाऊन भिलसा जिल्ह्यात प्रवेश करते. पुढे ती मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश (झांशी जिल्हा) राज्यांच्या सरहद्दींवरून काही अंतर वाहत जाऊन उत्तर प्रदेशातून पुन्हा मध्य प्रदेशातील टिकमगढ जिल्ह्यात प्रवेश करते. पुढे पुन्हा उ. प्रदेशांतून ईशान्य दिशेस ओर्छा व जलाऊन जिल्ह्यांतून वाहत जाऊन हमीरपूर येथे यमुना नदीला मिळते. पुराणांत तसेच मेघदूतात या नदीचा उल्लेख आढळतो. पांडवांचे विदिशेच्या राजाशी झालेले युद्ध या नदीच्या काठावरच झाले, अशी समजूत आहे. बेस, जमनी, धसान, पावन ह्या बेटवाच्या प्रमुख उपनद्या होत.