बेट : जलवेष्टित भूभागाला बेट असे म्हणतात. इंग्रजीत मोठ्या बेटाला ‘आइलंड’ तर अगदी लहान बेटाला बहुधा ‘आइल’ किंवा ‘आइलेट’ असे संबोधिले जाते. तथापि ब्रिटिश बेटांबाबतही अनेकदा ‘आइल्स’ ही संज्ञा वापरली जाते. बेटाचा आकार लहानमोठा असू शकतो. ऑस्ट्रेलिया हेही एक बेटच आहे, परंतु भूगोलज्ञ त्याचा समावेश खंडात करतात. जगात ग्रीनलंडसारखी मोठी, त्याचप्रमाणे अनेक लहानसहान बेटेही आढळत असून त्यापैकी काही बेटे अजूनही निनावी आहेत. खंडांप्रमाणेच मोठ्या बेटांवरही (उदा. न्यूझीलंड ब्रिटिश बेटे) पर्वते, पठारे, मैदाने इ. सर्व प्रकारची भूमिस्वरूपे आढळतात. काही बेटांची उंची कमी असते, तर काही बेटे मात्र समुद्रपातळीवर इतक्या कमी उंचीची असतात की लहानसहान लाटांमुळेही संपूर्ण बेट पाण्याखाली जाते. बेटांच्या समूहाला द्वीपसमूह म्हणतात. उदा., अंदमान व निकोबार, वेस्ट इंडिज, जपान, फि‌लिपीन्स इ. समुद्र, महासागर यांशिवाय नदी, सरोवर, दलदल यांमध्येही बेटे निर्माण झालेली आढळतात. बेटाभोवतीचे पाणी खारे,गोडे किंवा मचूळ असते.

 बेटांची निर्मिती अनेक प्रकारांनी होत असते. उदा., भूकवचातील हालचालींमुळे काही भूभाग खचल्याने अगर समुद्रतळ वर उचलला गेल्याने, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने, ज्वालामुखी क्रियेमुळे किनाऱ्यानजीक गाळाच्या भरीने ‌वा समुद्रात प्रवाळखडकांची निर्मिती होऊन ते जलपृष्ठावर उंचावले गेल्यामुळेही लहानमोठ्या बेटांची निर्मिती होते. बेटांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते. बेटांची रचना व संरचना यांनुसार बेटांचे वर्गीकरण करता येते. निर्मितीनुसार केलेले बेटांचे वर्गीकरण अधिक ग्राह्य धरले जात असले, तरी ते परिपूर्ण नाही कारण कित्येक बेटांच्या निर्मितीविषयी अजून अज्ञानच आहे. काही वेळा एकाच बेटाच्या निर्मितीच्या अनेक शक्यता दिल्या जातात. उपखंड बेटे, सागरी बेटे, अंतर्गत बेटे, भू-बंध बेटे, ज्वालामुखी बेटे, प्रवाळ बेटे, प्लवमान बेटे असे बेटांचे विविध प्रकार आढळतात. स्थानानुसार केलल्या वर्गीकरणात उपखंड बेटे व सागरी बेटे हे दोन प्रमुख प्रकार संभवतात.

 उपखंड बेटे : ही खंडांच्या नजीक किंवा सागरमग्न खंडभूमीवर आढळतात. मुख्य भूमीच्या किनाऱ्यालगतचा काही भाग खचून पाण्याखाली गेल्यामुळे मूळ भूभागांचाच काही प्रदेश अलग होऊन अशा बेटांची ‌निर्मिती होते. उपखंड बेटे दोन प्रकारची आहेत. (१)नजीकच्या भूगर्भीय काळात खंडापासून अलग झालेली बेटे : मुख्य भूमीच्या किनाऱ्यालगतचा काही भूभाग खचला गेल्यामुळे किंवा खनन कार्यामुळे या बेटांची निर्मिती होते. भौगोलिक दृष्ट्या अशी बेटे मुख्य भूमीपासून वेगळी दिसली, तरी दोन्ही भूभागांतील खडक, वनस्पती, प्राणी, भाषा, संस्कृती व इतर भूगर्भीय वैशिष्ट्यांत बरेचसे साम्य आढळते. ब्रिटिश बेटे, श्रीलंका, न्यू फाऊंडलंड, ग्रीनलंड ही बेटे या प्रकारात मोडतात.

 (२) खंडापासून फार प्राचीन भूगर्भीय काळात अलग झालेली बेटे : या बेटांची भूगर्भीय वैशिष्ट्ये जवळपासच्या मुख्य भूभागाशी साम्य दाखवितात. परंतु वनस्पती‌ व प्राणिजीवन मात्र अनेक वर्षांच्या विलगीकरणामुळे वेगळे असते. उदा., मादागास्कर, न्यूझीलंड इत्यादी.

 सागरी बेटे : कोणत्याही भूखंडापासून दूर अशा सागरी भागात सागरपृष्ठावर डोकावणाऱ्या भूभागाला सागरी बेट असे म्हणतात. अशा बेटांचे जवळच्या भूप्रदेशाशी साम्य आढळत नाही. असेलच तर तो केवळ योगायोग म्हणावा लागेल. सागरी बेटे ही ज्वालामुखी, भूकवचातील हालचाली वा प्रवाळे यांमुळे निर्माण झालेली असतात. यावरून ज्वालामुखीजन्य बेटे व प्रवाळ बेटे असे सागरी बेटांचे प्रमुख दोन प्रकार पडतात. काही बेटांवर मात्र या दोन्हींचे एकत्रीकरणआढळते.ज्वालामुखीजन्य बेटे म्हणजे समुद्रतळाशी जे उंच ज्वालामुखी आहेत, त्यांची शिखरे होत. माउना केआ ह्या हवाई बेटावरील ज्वालामुखी शिखराची उंची समुद्रतळापासून ९,७५३ मी. आहे. या शिखराची उंची जगात सर्वात जास्त आहे. एव्हरेस्ट (उंची ८,८४७.६) मी. हे जमिनीवरील सर्वोच्च शिखर आहे. भूकवचातील हालचाली, हिमखंड, हिमनदी, सागरी लाटा, समुद्र प्रवाह, वाहते पाणी, प्रवाळ इ. अनेक कारणांमुळे बेटांची निर्मिती होत असते. त्यांपैकी काहींची माहिती पुढे दिलेली आहे.

 (१) भूकवचातील हालचाली : भूकवचातील हालचालींमुळे किंवा ज्वालामुखी क्रियेमुळे काही भूभाग खचल्याने, समुद्रतळ वर उचलला गेल्याने वा किनाऱ्यानजीक विभंजन झाल्यामुळे बेटाची निर्मिती होते. उत्तर अमेरिकेच्या ईशान्य व उत्तर या दिशांना असणारी बेटे तसेच कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचा किनारा आणि अमेरिकेतील मेन राज्याच्या किनाऱ्यावरील शेकडो लहानसहान बेटांची निर्मिती तेथील आसपासचा भूभाग खचल्यामुळे झाली आहे. यूरोपच्या मुख्य भूमीचा काही भाग खचल्याने ब्रिटिश बेटे निर्माण झाली. वलीकरण किंवा विभंजनामुळे समुद्रतळ उचलला गेल्यावर जमीन पाण्याबाहेर दिसते. क्यूबा व वेस्ट इंडिज द्वीपसमूहातील इतर बेटे अशीच निर्माण झाली आहेत. विलिस या भूगर्भशास्त्रज्ञाच्या मते मादागास्करची निर्मिती याच कारणाने झाली आहे. पॅसिफिक महासागरातील प्रवाळ बेटे याच कारणाने सु. ९०० मी. उचलली गेली आहेत. विभंजनामुळे जमीन खचते व खचदरी तयार होते. मादागास्कर एका मोठ्या खचदरीने आफ्रिकेपासून अलग झाले असावे असा तर्क आहे. खंडविप्लव हेही बेटाच्या निर्मितीचे एक कारण सांगितले जाते. जपान, हवाई, रेयून्यो, मॉरिशस, सेंट हेलीना, ॲसेन्शन, अल्यूशन इ. बेटे ज्वालामुखी क्रियेने निर्माण झालेली आहेत. अशी बेटे पॅसिफिक महासागरात जास्त आढळतात. 

 (२)प्रवाळ : समुद्रातील प्रवाळ एखाद्या सोयीस्कर ठिकाणी साचल्यावर त्यांची वाढ होते. कालांतराने प्रवाळभित्ती व पुढे कंकणद्वीपाची निर्मिती होते. प्रवाळांचा संचय होण्याकरिता आवश्यक असणारे सागरी मंच व वाढीकरिता स्वच्छ उष्ण पाणी पॅसिफिक महासागरात अधिक प्रमाणात उपलब्ध असल्याने तेथे या प्रकारची बेटे अधिक आहेत. एलिस, गिल्बर्ट, मार्शल ही पॅसिफिक महासागरातील मालदीव हे हिंदी महासागरातील व उ. अटलांटिकमधील बर्म्यूडा ही प्रवाळ बेटे आहेत. पॅसिफिकमधील काही प्रवाळ बेटे मात्र पाण्याखाली गेलेली ज्वालामुखी बेटे असून त्यांवरच प्रवाळांची वाढ होऊन त्यांची उंची वाढलेली आढळते. हवाई बेटांवर व मॉरिशस बेटाभोवती विस्तृत अशा प्रवाळभित्ती आहेत, परंतु मुळात ही ज्वालामुखी बेटे आहेत. या प्रकारच्या बेटनिर्मितीच्या संकल्पनांविषयी अनेक मतभेद आहेत.

 भूखंडाजवळ अनेक बेटांनी मिळून केलेली द्वीपकमान हे काही बेटांचे एक ‌नावीन्य होय. या प्रकारच्या द्वीपकमानी भूभागाशी बहिर्कोन साधून धनुष्याच्या आकाराच्या बनलेल्या असतात. अधिकतर ‌द्वीपकमानी पॅसिफिक महासागरात आहेत. जपान द्वीपकमान, मेअरिॲना बेटे ही त्यांपैकी काही होत. अँटिलीस व टिएरा डेल फ्यूगो या अटलांटिक महासागरातील द्वीपकमानी आहेत. काही ठिकाणी एकच द्वीपकमान असते, तर काही ठिकाणी दोन असतात. या द्वीपकमानींच्या प्रदेशात भूकंपाचे प्रमाण जास्त असल्यामुळे व जवळच समुद्रातील अधिक खोल गर्ता आढळत असल्याने शास्त्रज्ञ ‌यांच्या निर्मितीशी भूकवचातील हालचालींचा संबंध लावतात.


(३)  हिमखंड : प्लाइस्टोसीन काळात उत्तरेकडील अनेक प्रदेशांवर हिमखंडाचे आच्छादन होते. हिमनदीप्रमाणे यांचेही कार्य-खनन व भरण-सुरू होते. पुढे हिम वितळल्यावर, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली व हिमखंडाच्या भरणकार्यामुळे जेथे टेकड्या व कटक निर्माण झाले होते, तो भाग बेटे म्हणून पाण्याबाहेर डोकावू लागला. ग्रीनलंडची निर्मिती याच प्रकाराने झाली आहे. हिमनदीच्या संचयन कार्यामुळे सरोवरे किंवा समुद्रकिनाऱ्यावर ड्रमलिन, कंकतगिरी (केम) असे बेटांसारखे भूविशेष तयार होतात. ही बेटे अतिलहान असून व एकंसघ नसल्याने लाटा व सागरप्रवाहांमुळे ती नष्ट होतात. लाँग बेटाची (न्यूयॉर्क राज्य) ‌निर्मिती हिमनदीच्या संचयन कार्यातूनच झालेली आहे.

 (४) लाटांचे कार्य: सागरी लाटांचे कार्य किनाऱ्यावरील खडकांवर अविरत सुरू असते. मऊ खडक लवकर झिजतात, तर कठीण खडकांची झीज सावकाश होते. अविरत चालणाऱ्या या झीजकार्यामुळे किनाऱ्यावर जमीन मागे रेटली जाते व समुद्र जमिनीचा भाग व्यापतो. अशा वेळी हे कठीण खडकांचे स्तंभ बेटांच्या स्वरूपात पाण्याच्या पातळीच्यावर आलेले दिसतात. ब्रिटनच्या किनाऱ्यावर अशा स्तंभांची अनेक उदाहरणे आढळतात. तसेच एखादे द्वीपकल्प ज्या संयोगभूमीने मोठ्या भूभागाला जोडलेले असते त्या संयोगभूमीचीच जर सागरी लाटा, समुद्र प्रवाह इत्यादींमुळे झीज झाली, तर द्वीपकल्पाचे बेटात रूपांतर होते. बहामा बेटे मूलतः लाटांच्या संचयनाने तयार झालेली आहेत. 

जगातील सर्वात मोठी १० बेटे

बेट 

क्षेत्रफळ चौ. किमी. मध्ये 

ग्रीनलंड 

न्यू गिनी 

बोर्निओ 

बॅफिन 

मादागास्कर 

सुमात्रा 

ग्रेट ब्रिटन 

होन्शू

व्हिक्टोरिया

एल्झमीअर

२१,७५,६००

८,१०,०००

७,५१,०००

५,९८,२९०

५,८९,४९०

४,७७,५०७

२,२९,८७७

२,२३,३७७

२,०८,०८०

२,००,४४५

वाहते पाणी, हिमनदी व समुद्रप्रवाह यांच्या कार्यामुळेही छोट्याछोट्या बेटांची निर्मिती होत असते. नदीच्या पूरमैदानातील नागमोडी वळण फुटून प्रवाह सरळही जाऊ लागतो व मध्ये बेट बनते, तसेच त्रिभुज प्रदेशात नदीच्या अनेक शाखा निर्माण होऊन त्या शाखांदरम्यान बेटांसारखे भाग तयार होतात. उदा., गंगेच्या त्रिभुज प्रदेशातील सॅंड हेड्‌स तसेच ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रातील माजुली बेट. नदीने बरोबर वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनानेही लहानलहान बेटांची निर्मिती होते. त्यांतील काही बेटे वनस्पतींनी आच्छादलेली असतात. पाद्री बेटाच्या (टेक्सस राज्य) निर्मितीत वारा, लाटा व प्रवाह यांचे कार्य महत्त्वाचे असून ते रोधक बेटाचे उदाहरण आहे. गोड्या पाण्याने वेढलेले सर्वात मोठे बेट माराझो (४,०२२ चौ.किमी.) हे ॲमेझॉन नदीच्या मुखाशी आहे. ह्यूरन सरोवरातील मॅनिटूलिन बेट (२,७६६ चौ. किमी.) सरोवरांतील सर्वात मोठे बेट आहे. ब्राझीलमधील बननाल हे अंतर्गत भागातील (आराग्वाइया नदीने बनलेले) सर्वात मोठे बेट आहे. दक्षिण अटलांटिक महासागरातील बूव्हे (५४० २६’ द. व ३० २४’ पू.) हे बेट जगातील अतिदूरचे समजले जाते. या बेटापासून सर्वात जवळचा क्वीन मॉडलॅंड हा अंटार्क्टिका खंडाचा भूभाग १,६१० किमी. दूर आहे. हे बेट व क्वीन मॉडलॅंड दोन्ही निर्जन आहेत. वस्ती असलेले व मुख्य भूखंडापासून अतिदूरचे बेट ट्रिस्टन द कुन्हा हे दक्षिण अटलांटिक महासागरात आहे. या बेटापासून जवळचे लोकवस्ती असलेले बेट सेंट हेलीना सु. २,११० किमी., तर सर्वात जवळचा खंडप्रदेश आफ्रिका २,७२० किमी. दूर आहे. जून १९७९ साली टाँगाने ताब्यात घेतलेले लाटेइकी हे ज्वालामुखीजन्य बेट हे सर्वात नवीन आहे.

पॅसिफिक महासागरातील क्वॉजालीन बेट हे सर्वात मोठे कंकणाकृती प्रवाळद्वीप आहे. या बेटाच्या बाहेरच्या कडेचा घेर २८१ किमी. असला, तरी याचा बराचसा भाग खारकच्छाने व्यापला आहे. ख्रिसमस (क्षेत्रफळ ४७७ ‌चौ.किमी.) हे याच महासागरातील थेट जास्त भूभाग असल्याने क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे कंकणाकृती प्रवाळ बेट आहे. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरील ग्रेट बॅरिअर रीफ जगातील सर्वात मोठी प्रवाळभिंत आहे. इंडोनेशिया हा सु. ५,०२९ किमी. लांब पसरलेला १३,००० बेटांचा सर्वात मोठा द्वीपसमूह आहे. यातील सेलेबीझ बेटाचा आकार नावीन्यपूर्ण आहे. जगातील सर्वात उत्तरेकडची जमीन (८३० ४०’ ३२.५’’ उ. अक्षांश व ३०० ४०’ १०.१’’ प. रेखांश) ओडाक हे बेट आहे (१९७८). ग्रीनलंडच्या ईशान्येकडील हे बेट उत्तर ध्रुवापासून ७०६.४ किमी. दूर आहे. जगातील अनेक बेटांवर आता मानवी वस्ती आढळते. एखादा किल्ला (उदा., जलदुर्ग) बांधण्यासाठी जसे सिंधुदुर्ग-किंवा महत्त्वाचे राजबंदी ठेवण्यासाठी (अंदमान, सेंट हेलीना) बेटांचा उपयोग होई. काही पर्यटन केंद्रे (ताहिती, लक्षद्वीप) म्हणून प्रसिद्ध आहेत. काहींवर लष्करी तळ (द्येगो गार्सीआ) उभारले गेले आहेत. काही बेटे अण्वस्त्रे चाचणीकरिता वापरली गेली आहेत (बिकीनी बेटे). लांब पल्ल्याच्या विमान प्रवासाला मध्यवर्ती इंधन पुरवठा योग्य केंद्रे म्हणून काही बेटे उपयुक्त ठरली आहेत (हवाई बेटे). सिंगापूरसारखी काही बेटे जहाज मार्गांवरची प्रसिद्ध बंदरे आहेत. काही ठिकाणी लहान-लहान बेटांचा उपयोग पूल बांधण्याकरिता होतो. काही बेटे राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असतात व वादग्रस्त होतात. कच्छतिवू बेटावरून भारत-श्रीलंका संबंध ताणले गेले होते, तर भूर बेटावरून भारत-बांगला देश संबंध चिघळले होते. बाहेरच्या जगाशी संबंध मर्यादित असल्याने बेटांवरच्या लोकांमध्ये प्रांताभिमान जास्त असतो. इंडोनेशियासारख्या बेटांनी बनलेल्या देशात राज्यकारभार करताना दळणवळणाखेरीज याही गोष्टीची अडचण येते. जवळच्या ज्या भूखंडावरून अशा बेटांवर स्थलांतर होणे शक्य आहे, तेथील वनस्पती व प्राणीजीवन बहुधा त्या बेटांवर आढळते. तथापि त्यांचे प्रमाण कमी असते, याला ‘जैविक क्षीणन’ असे म्हणतात. बेट या भौगोलिक संज्ञेने मराठी भाषेला बेटी लागणे हा वाक्‌प्रचार बहाल केला आहे.

संदर्भ : 1. Robinson, Harry, Morphology and Landscape, London, 1975.

           2. Worester, P. G. Textbook of Geo-morphology, New York, 1948.

चौधरी, वसंत पंडित, अविनाश.