बेकर, सर सॅम्युएल व्हाइट:(८ जून १८२१ – ३० डिसेंबर १८९३). इंग्लिश समन्वेषक. लंडन येथे जन्म. जर्मनी व इंग्लंडमध्ये त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. श्रीलंकेतील नुवर एलिय (सस. पासून उंची १,९०० मी.) येथे त्याने कृषिवसाहत व आरोग्यधाम स्थापन केले. डॅन्यूब व काळा समुद्र यांना जोडणाऱ्या लोहमार्गाच्या बांधकामावरील व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. १८५५ मध्ये त्याची पत्नी निवर्तली. त्यानंतर त्याने क्रिमिया, आशिया मायनर, बाल्कन राष्ट्रांचा प्रवास केला. १८६० साली त्याने हंगेरियन युवतीशी विवाह केला. पुढील सर्व संशोधन-मोहिमांत ती त्याच्या बरोबर असे. आपल्या पहिल्या संशोधन-मोहिमेत ते वर्षभर सूदान व इथिओपियाच्या सरहद्दींवरून प्रवास करीतकरीतनाईलच्या उपनद्यांचा व उपप्रवाहांचा दक्षिण दिशेने शोधघेत होते.गोंडोकोरो येथे जॉन हॅनिंग स्पीक व जेम्स ऑगस्टस ग्रॅंट हे दोन संशोधक त्यांना भेटले. त्यांनी बेकरला मार्गदर्शन केले आणि बऱ्याच संशोधनानंतर त्याने व त्याच्या सहकाऱ्यांनी १४ मार्च १८६४ रोजी आधुनिक युगांडा व झाईरे प्रजासत्ताक यांच्या सरहद्दीवर असलेल्या ॲल्बर्ट सरोवराचा शोध लावला.
इंग्लंडला परतल्यावर या कामगिरीबद्दल रॉयल जिऑग्राफिक सोसायटी व फ्रेंच जिऑग्राफिकल सोसायटीकडून त्याला अनेक मानसन्मान प्राप्त झाले. ‘सर’ ही सन्मान्य पदवीही त्यास देण्यात आली. १८६९ मध्ये ईजिप्तचा तुर्की व्हाइसरॉय इस्माईल पाशाच्या निमंत्रणावरून नाईल नदी-खोऱ्याच्या विषुववृत्तीय प्रदेशातील लष्करी मोहीम त्याने हाती घेतली. या मोहिमेत त्याने त्या प्रदेशातील गुलामांच्या व्यापाराला आळा घातला. या प्रदेशाचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याने चार वर्षे काम केले. १८७९ नंतर भारत, जपान, सिरिया, अमेरिका इ. देशांचा त्याने प्रवास केला. त्याची द रायफल अँड द हाउंड इन सीलोन (१८५४), द अल्बर्ट न्यॅझा (१८६६), द नाईल ट्रिब्यूटरीज ऑफ ॲबिसिनिया (१८६७) इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. सॅन्फर्ड ऑर्लेग (डेव्हन परगणा) येथील निवासस्थानी त्याचे निधन झाले.
शाह, र. रू.