बेंबो, प्येअत्रो:(२० मे १४७० – ? जानेवारी १५४७). प्रबोधनकालीन इटालियन विद्वान. व्हेनिस शहरी, एका उमराव कुटुंबात जन्मला. त्याचे वडील बेर्नार्दो बेंबो हे व्हेनिसच्या राजनैतिक सेवेत होते. फ्लॉरेन्स, फेरारा, व्हेनिस, पॅड्युआ आणि मेसीना ह्या ठिकाणी त्याचे शिक्षण झाले. लॅटिन आणि ग्रीक ह्या दोन भाषांवर विशेषतः लॅटिनवर-त्याने प्रभुत्व मिळविले होते. कवी म्हणून आपल्या वाङ्मयीन कारकीर्दीचा आरंभ त्याने केला सुनीतादी काव्यप्रकार हाताळले तथापि तत्कालीन इटलीचा वाङ्मयीन विचारवंत आणि नेता म्हणूनच मुख्यतः तो ओळखला जातो. इटलीची वाङ्मयीन भाषा म्हणून लॅटिन भाषेऐवजी इटालियनचाच स्वीकार झाला पाहिजे आणि इटालियन भाषा म्हणजे इटलीतील तस्कन बोलीच असली पाहिजे असा विचार त्याने आग्रहपूर्वक मांडला. Gli Asolani (१५०५, इं. शी. पीपल ऑफ आसोलो) हा त्याचा ग्रंथ तस्कन बोलीतच लिहिलेला आहे. प्रेम ह्या विषयावरील तात्त्विक चर्चा त्यात त्याने तीन संवादांतून केलेली आहे. Prose della Volgar lingua (१९२५, इं.शी. डिस्कशन्स ऑफ द इटालियन लॅंग्वेज) हा त्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ. तस्कन बोलीसंबंधीची समर्थनपर मीमांसा ह्या ग्रंथात त्याने केली आहे. पीत्रार्क आणि बोकाचीओ ह्यांच्यासारख्या श्रेष्ठ इटालियन साहित्यीकांनी तस्कन भाषेला समर्थ आणि संपन्न केले असल्यामुळे ती आता केवळ तस्कनीची भाषा राहिलेली नसून संपूर्ण इटलीची झालेली आहे, अशी त्याची धारणा होती. इटालियन भाषेच्या व्याकरणाचे नियमही ह्या ग्रंथात त्याने सांगितले आहेत. इटालियन कवींनी पीत्रार्कचा आणि गद्यलेखकांनी बोकाचीओचा आदर्श समोर ठेवला पाहिजे, असे बेंबोचे मत होते. बेंबोच्या कवितांचा संग्रह Rime हा १५३० मध्ये प्रसिद्ध झाला. त्याच्या कवितांवर अर्थातच पीत्रार्कचा प्रभाव आहे. त्याने लॅटिन भाषेत लिहिलेला व्हेनिस शहराचा इतिहास (१४७८ ते १५१३ पर्यंतचा) त्याच्या मृत्यूनंतर, १५५३ मध्ये प्रसिद्ध करण्यास आला.
दहावा पोप लीओ ह्याचा सचिव तसेच सेंट मार्क कॅथीड्रल ग्रंथालयाचा ग्रंथपाल ह्यांसारख्या पदांवर बेंबोने काम केले होते. १५३९ मध्ये त्याला कार्डिनल करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे वास्तव्य रोम येथे होते. तेथेच तो निधन पावला.
कुलकर्णी, अ. र.