बुरगुंड : (हिं. बारा लेसुरा गु. पिस्ताण क. चांदले लॅ. कॉर्डिया बॉलिचाय कुल-बोरॅजिनेसी). या मध्यम उंचीच्या वृक्षाचा प्रसार गुजरात, दख्खन, कारवार, पश्चिम भाग इ. ठिकाणी सामान्यपणे पानझडी जंगलात आहे. याची पाने मोठी, लंबवर्तुळाकृती किंवा काहीशी अंडाकृती, गुळगुळीत, खालच्या बाजूस दाट केसाळ असून वरच्या बाजूच्या ⇨अपित्वचेत खटिकापुंज (कॅल्शियम कार्बोनेटाचे पुंजके) नसतात.फुले पांढरी, शेंडयाकडे किंवा बाजूस परिमंजरीय वल्लीवर [⟶ पुष्पबंध ] डिसेंबर – जानेवारीत येतात. अश्मगर्मी (आठळीयुक्त) फळे तळाकडे गोलसर, वर टोकदार असून एप्रिल-मेमध्ये येतात. ती शामक (दाहनाशक), कफोत्सारक (कफ पाडून टाकणारी) व स्तंभक (आकुंचन करणारी) असून श्वासनलिकाविकार व मूत्रमार्गातील आग यांवर उपयुक्त असतात. लाकूड व इतर उपयोग याच्याच वंशातील ⇨भोकराप्रमाणे व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨बोरॅजिनेसी कुलात (भोकर कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. भारतात बुरगुंडाच्या कॉर्डिया या वंशातील सु.१४ जाती आढळतात. गुजराती भाषेत बुरगुंड हे नाव भोकराला (सं. बहुबारक) दिलेले आढळते.
जमदाडे, ज. वि.
“