बुंदी : भारताच्या राजस्थान राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भूतपूर्व बुंदी संस्थानाची राजधानी. लोकसंख्या ४८,०५२ (१९८१). हे कोटा शहराच्या वायव्येस ३८ किमी.वर वसलेले आहे.
हे शहर प्रथम मीना जमातीच्या अखत्यारीत होते. या जमातीचा प्रमुख ’बुंदा’ याच्या नावावरूनच शहराचे ’बुंदी’ हे नाव रूढ झाले.१३४२ च्या सुमारास बुंदाच्या नातवाचा हाडा राजपूत रावदेव याने पराभव केला. या तटबंदीयुक्त शहरास चार प्रवेशद्वारे आहेत. येथील राजवाडा प्रेक्षणीय आहे. चौदाव्या शतकातील तारागड (किल्ला), शाहजहानकडून छत्रसाल राजास भेट म्हणून मिळालेला शिवप्रसाद हत्ती व राजा उम्मेदसिंहाचा घोडा यांचे राजमार्गावरील पुतळे सुंदर आहेत. सूरज छत्री, फुलसागर व जेटसागर तलाव, जेटसागर काठचा सुखमहाल, नवलसागर तलाव व त्याच्या काठावरील मोतीमहाल ही शहरातील आणखी काही आकर्षणे होत. शहराजवळच ८४ खांबांची धाबाई देवाची छत्री व शिकारीसाठी प्रसिद्ध असलेला शिकारबुर्ज, नजीकची बुंदी राजघराण्यातील मृतांच्या छत्र्या असलेली केशरबाग, बाणगंगेच्या तीरावरील शिवमंदिर, बुंदी रोड रेल्वे स्टेशन, केंशोराय पाटण येथील विष्णुमंदिर (१६५९),हिंडोली नगरातील लक्ष्मीनारायण मंदिर व वराहावताराचा पुतळा (दहावे शतक) तसेच शहरातील जैन मंदिरे ही प्रेक्षणीय आहेत.
आसमंतातील शेतमालाची बाजारपेठ म्हणूनही बुंदीस महत्त्व असून येथे हातमागाचे कापड, सिमेंट उत्पादन इ. उद्योग चालतात. शहरात राजस्थान विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालयही आहे.
पंडित, नीला
“